सावरकरांचे गो-विचार व भूमिका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
सावरकरांच्या सर्व तत्त्वज्ञानात जर सगळ्यात जास्त चर्चिलेला झालेला विषय असेल, तर तो ‘गाय’ हा आहे. त्या काळी आणि आजही या विषयाचे पडसाद वैचारिक जगात उमटतात. अगदी सावरकरांच्या इतर मतांशी सहमत नसलेले लोकही सावरकरांची गायीविषयीची मते हिंदुत्ववाद्यांना ऐकवत असतात. त्याविषयी...
 
गायीची निवड का?
सावरकर म्हणतात, “हा प्रश्न एका फुटकळ समजुतीचा नाही. अशा धार्मिक छापाच्या ज्या शेकडो खुळ्या समजुती आपल्या (हिंदू) लोकांची बुद्धिहत्या करीत आहेत, त्या भाकड प्रवृत्तीचा आहे. तिचे एक उपलक्षण म्हणून आम्ही गायीची गोष्ट तेवढी निवडली.” त्यांची ही निवड किती योग्य होती, याबद्दल ते दुसर्‍या एका लेखात म्हणतात, “धर्मभोळ्या भाबडेपणापायी आमची तारतम्य बुद्धी किती पंगू झाली आहे, हे चव्हाट्यावर आणण्याच्या कामी आम्ही निवडलेले हे गायप्रकरण अपेक्षेपेक्षाही आम्ही याची चर्चा पुढेही करीत राहू.” तेव्हा गायीचा प्रश्न फक्त गायीपुरता मर्यादित नसून, तो विषय बुद्धिवादाची लोकांना शिकवण देण्याचा प्रयत्न, माध्यम, साधन होता.
 
उपासनेची प्रतीके माणसाहून उच्च हवीत
 
सावरकर जड-बुद्धिवादी नाहीत. पण, उपासनेची प्रतीके मनुष्याहून उच्च हवीत याबाबत ते आग्रही होते.
सावरकर म्हणतात, “लिंगपूजा, वृक्षपूजा, पशुपूजा ही धर्माची तामस आणि निकृष्ट रूपे आहेत. जसे जसे मानवी तत्त्वज्ञान विकसित होत गेले, तशी तशी प्रतीकेही तात्त्विक बनत गेली. पण, धर्माचे परमोच्च सात्विक स्वरूप उपदेशणार्‍या वेदांत्यांनीही अपकृष्ट, तामस पशुपूजेस चिटकून राहावे, हा केवढा रूढींचा प्रताप.”
 
पुढे सावरकर उपदेश करतात, “जोवर मनुष्य मनुष्य आहे आणि गाय व बैल पशू आहेत, तोवर मनुष्याने त्याच्याहूनही सर्व गुणांत हीन असणार्‍या पशूस देव मानणे, म्हणजे मनुष्यास पशूहून नीच मानण्यासारखे आणि माणुसकीस कमीपणा आणणारे आहे. मनुष्यास सर्व गुणांत उच्च असणार्‍या प्रतीकास मनुष्याच्या देवाचे प्रतीक मानणे उचित. गाढवाने पाहिजे तर त्याच्याहून उच्च असणार्‍या गायीस देवी मानावे, पण मनुष्याने तसे करण्याचा गाढवपणा करू नये.”
 
त्यामुळे गायीस देवता मानणे हा गाढवपणा आहे, अशा भाषेत सावरकर प्रहार करतात. गाय ही बैलाची माता आहे, मनुष्याची नाही असेही ते ठणकावून सांगतात.
किळसवाणी रूढी
गोमूत्र पिणे, पंचगव्य पिणे हे सावरकर किळसवाणे समजतात. ‘शेण खाणे’ ही शिवी आहे, संस्कार नाही. हिंदू धर्माच्या महान तत्त्वज्ञानास या रूढींनी कसा कमीपणा येतो हे ठणकावून सांगतात. ते म्हणतात, “हिंदू तत्त्वज्ञानाने भारलेल्या अमेरिकादी प्रगत लोकांस, हिंदू धर्माची दीक्षा देण्यास बसवून, आम्ही त्या दीक्षेचा पहिला विधी म्हणून त्यांच्या डोळ्यासमोर गायीचे मूत्र आणि शेण कालवून ते प्या, असे सांगितले, तर त्या आचाराची त्यांना इतकी किळस येईल की त्या धर्माचे परत ते तोंडही पाहणार नाहीत.”
 
गोमूत्रात औषधी गुण आहेत, म्हणून ते घ्या या विज्ञानाच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवणार्‍यांवर ते कडाडून टीका करतात. ते म्हणतात, “गोमूत्रात औषधी गुण असतील तर त्या आजाराच्या वेळी ते घ्या, त्याचा संस्कार का करता? मानवी मूत्रात, ब्रँडीत काही औषधी गुण आहेत, म्हणून रोज तिन्ही त्रिकाळ त्याची आचमने करायची का?” हा प्रश्न ते विचारतात. “कोंबडीच्या विष्ठेत विषहारक गुण असतात, म्हणून कोंबडीची विष्ठा चटणी सारखी कुळधर्मास खायची का?” असा सणसणीत प्रश्न ते धर्मभोळ्या लोकांस विचारतात.
मग गोहत्याही पुण्य...
सावरकर म्हणतात, “हिंदू राष्ट्राच्या सैनिकी शक्तीचे मर्म असा एखादा किल्ला किंवा राजधानी शत्रूने वेढलेली, अन्न संपलेले, अशा प्रसंगी युद्धास निरुपयोगी ते पशू मारून, खाण्यावाचून उपाय नसला, तर तो दुर्ग अथवा राजधानी शत्रूच्या हाती पडू देण्यापेक्षा आणि तशी राष्ट्रहत्या होण्यापेक्षा वेढ्यातील आवश्यक त्या गायी मारून खाणे, हा खरा हिंदू धर्म.” इथे ते ‘हिंदू धर्म’ हा शब्द वापरतात. तो ‘हिंदू धर्म’ सावरकरांचा आहे, हिंदुधर्मवाद्यांचा नाही.
 
“गाय हा काही एकटा उपयुक्त पशू नसून, जगात इतरही उपयुक्त पशू आहे, मग त्यांची पूजा नको का?” असा स्पष्ट प्रश्न सावरकर विचारतात. त्यात कुत्रा, घोडा, म्हैस, बैल इतकेच नाही तर गाढव आहे. मग म्हैस हत्या, गाढव हत्या पाप का नाही? असा त्यांचा प्रश्न आहे. सावरकर विचारतात, “गाढव इतके उपयुक्त आणि प्रामाणिक इतके सोसाळू असते. म्हणून त्यास ‘पशू’ न मानता आजवर कोणी त्याची ‘देवता’ बनवली किंवा गाढवगीता रचून गाढवपूजनाचा संप्रदाय काढला आहे काय? कुंभार देखील गाढव पाळणे इतकेच कर्तव्य समजतो, गाढवपूजन नव्हे.”
अमेरिकेच्या गोमहात्म्याबद्दल आमच्या भ्रामक कल्पना
एकदा एका अमेरिकन वार्ताहराने एका वर्तमानपत्रात गो-दुधाची स्तुती केली, तर इकडे गोभक्तांना उधाण आले. त्यावर सावरकर म्हणतात, “बघा, पुढारलेले अमेरिकन पण गोरक्षण करतात. पण, अमेरिका गोरक्षण का करते? तर दुधासाठी, अन्नासाठी, म्हणजे उपयुक्ततावादासाठी. ती अमेरिका गायींचे मंदिर उभारून, तिला देवी करून, हळद-कुंकू वाहत नाही.” यावर सावरकर प्रश्न विचारतात-
 
१) अमेरिकेत गाय ही गोलोक देणारी देवता आहे, असे अमेरिका मानते काय?
२) स्वतःच्या धर्माच्या लोकांना दूर लोटून, गायीसारख्या पशूला पवित्र मानते काय?
३) अमेरिकन गायीचे दूध अनाथ बालकांच्या मुखात न देता तिचे दूध पवित्र म्हणून अग्नीत ओततात काय?
४) अमेरिकेचे शत्रू गायींचे कळप पुढे करून, अमेरिकन सैन्यास हतबद्ध करतात काय?
यावरून अमेरिकेचे गोरक्षण हे आर्थिक आणि उपयुक्त विचारांवर आहे, धार्मिक भाबडेपणावर नाही.
अद्वैत तत्त्वज्ञानाचा अपमान
अद्वैत तत्त्वज्ञान म्हणजे हिंदू चिंतनाचा सर्वोच्च अर्क ‘सर्वं खल्विदं ब्रह्मं’ अर्थात, ‘जे काही आहे ते सगळे ब्रह्म आहे,’ असे हा सिद्धांत सांगतो. आता हा सिद्धांत काही गोरक्षक गोरक्षणास लावतात, तेव्हा मोठा गोंधळ उडतो. गायीमध्ये पण ब्रह्म आहे, चराचरात देव आहे, मग तो गायीत नाही काय? यावर सावरकर म्हणतात, “मग ते ब्रह्म गाढवात पण आहे, तर गोमूत्र न पिता कोणी गाढवमूत्र पितो काय?” पुढे जाऊन सावरकर या भाबड्या गो-भक्तास फटकारत विचारतात की, “तुमचे ब्रह्म फक्त गायीसारख्या पशूत आहे काय? जे तुमचे धर्मबांधव आहेत त्यांस दूर लोटता, शिवाशिव पाळता, तुमचे हे ब्रह्म तुमच्या धर्मबांधवांत नाही काय?” असा रोकडा प्रश्न इथे सावरकर विचारतात.
ज्या गोष्टी विज्ञानाने, बुद्धीने ईश्वर नाहीत, त्या गोष्टींची प्रतीके ‘ईश्वर’ म्हणून वापरण्यास सावरकर कडाडून विरोध करतात.
‘देव’ या प्रतीकाचाही अपमान
काही उत्साही गोभक्त ब्रह्मा, विष्णू, शंकरासह सगळे तेहतीस कोटी देव गायीत आहेत, असे ठणकावून सांगतात. किती हा अपमान हिंदू देवांच्या प्रतीकांचा. सावरकर म्हणतात, “जर या गायीच्या पाठीत कोणी लाकूड घातले तर त्या देवांपैकी पाच-दहा देव लंबे झाल्याशिवाय राहणार नाहीत. गायीच्या शिंगापासून शेपटापर्यंत लोंबकळणारे देव म्हणजे कोणी गोचिडाची जात आहे काय?” पुढे सावरकर या गोभक्तास प्रश्न विचारतात की, “एखादा कसाई जेव्हा या देवतेच्या मानेवरून सूरी फिरवतो तेव्हा या तेहतीस कोटी देवांपैकी एकही पुढे येऊन गायीचे रक्षण का करीत नाही? की ते देव भंजकांसारखे मुर्दाड झाले आहेत? एका पशूला देवता करण्याच्या नादात देवांनाही पशूहून पशू बनवले.”
मग प्रतीके असावी तरी कोणती?
प्रत्येक समाजाची प्रतीके असतात जसे जर्मन गरुड, रशियन अस्वल. हिंदुत्वाचे प्रतीक गाय असू नये हे सावरकर सांगतात. “ज्या हिंदुत्वास गायीच्या पायावर उभे राहावे लागते, ते गायीच्या पायासारखे संकटाच्या पहिल्या झटक्यात खाली बसले पाहिजे. देवाचे गुण भक्तात उतरतात. गायीला ‘देव’ मानता मानता आपले हिंदुराष्ट्र ‘गाय’ होऊन गेले आहे. आपले हिंदुत्व उभारायचे असेल, तर ते सिंहाच्या पायावर उभे राहिले पाहिजे. मदोन्मत्त हत्तीची गंडस्थळे एका झटक्यात फोडणारी तीक्ष्ण नखाग्रे ज्याची आहेत, तो नरसिंह आता पूजला पाहिजे. हिंदुत्वाचे ध्येय ते आहे, गाईचे खूर नाही.”
गाय नाही, माणूस महत्त्वाचा...
“गायीची मंदिरे उभारून, तिला देवी बनवून, गायीवर मनुष्यबळ, आर्थिक बळ असा व्यर्थ खर्च करण्यापेक्षा ती साधने मनुष्यमात्राच्या हितासाठी उपयोग करावा,” असे सावरकर सांगतात. “अशी मंदिरे आता आश्रमचालकांस देऊन टाकावीत आणि अहिंदूंच्या तावडीत सापडणारी आपली हिंदू बालके पालन करण्याचा खरा धर्माचार करावा. आजचे ते खरे धर्माचरण.”
सावरकरांचा धर्म असा बुद्धिनिष्ठ आहे. समाजोपयोगी आहे. तो पारलौकिक कल्याणापेक्षा इहवादी आहे.
हिंदुद्वेष्ट्यांना प्रत्युत्तर
याउलट जे विचार प्रवाह आहेत, ते पूर्ण विकृत आणि हिंदू विरोधी आहेत. “हिंदू गायीस देव मानतात ना, मग आम्ही गायीस मारू, बीफ पार्टी करू,” हा विचार पण सावरकरविरोधी आहे. सावरकर अशा लोकांस खडसावतात आणि हिंदूंना सावध करतात.
ते म्हणतात, “गोरक्षणास हिंदूंनी दिलेले स्वरूप कितीही भाबडे असले तरी दुष्ट मात्र नाही. मनुष्यास उपयोगी असलेल्या गायी-बैलांच्या रक्षणाचा हेतू त्यामागे आहे. पण, ज्या अहिंदूंचा धर्मच गोहत्या आहे, तो धार्मिक वेडेपणा दुष्ट आहे.” पुढे सावरकर सांगतात, “अमक्या दिवशी गाय मारल्याने देव खुश होतो. त्या कारणांनी देवाच्या नावाने गायी मारणे म्हणजे देवास राक्षस बनवणे आहे. किमान हिंदूंच्या गोभक्तीत कृतज्ञता, दया तरी आहे, पण अहिंदूंच्या राक्षसी धार्मिक श्रद्धेत क्रूरपणा आणि असुरीपणा आहे, तो त्यांनी सोडावा असे सावरकर खडसावून सांगतात.
मग गोरक्षण करावे तरी कसे?
सावरकर बुद्धिवादी तर आहेतच, पण त्या बरोबर उपुक्ततावादी पण आहेत. गोरक्षण करावे तरी कसे सांगताना ते म्हणतात की, “गायींची उत्तम जात पैदा करून, जी जास्त दूध देईल, शेतीला उपयुक्त अशा बैलांची पैदास कशी वाढवता येईल, त्यांच्या शेण मूत्रापासून शेतीला अधिकाधिक उपयुक्त खते कशी बनवता येतील. थोडक्यात, गाय हा पशू उपयुक्त आहे म्हणून रक्षणीय आहे.”
थोडक्यात, ही गोरक्षणाची चळवळ सुस्पष्ट आणि आर्थिक तसेच वैज्ञानिक पायावर उभारावी, भाबडेपणा सोडून उपुक्ततावादावर ठेवावी, असे सावरकर मार्गदर्शन करतात.
उपसंहार
थोडक्यात सावरकरांचा या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बुद्धिवादी आणि उपयुक्ततावादी होता. ज्या गोष्टी विज्ञानाने असत्य ठरवल्या आहेत, त्यांना ‘देव’ मानू नये असे सावरकर मानत. उपासनेचे प्रतीक मानवाहून उच्च असावे हे त्यांचे मत होते. गोरक्षणाचा आर्थिक उपयोग हिंदू समाजाने करावा असे सावरकर सांगत. त्यामुळे सावरकर आज असते तर गोरक्षणाच्या नावे चालणार्‍या गोंधळाला त्यांनी नापसंती दर्शविली असती, तसेच याउलट विकृतपद्धतीने साजर्‍या होणार्‍या ‘बीफ पार्टी’चाही समाचार त्यांनी घेतला असता. कारण, हिंदूंची यामागची भावना भाबडी आहे, दुष्ट नाही हे सावरकर जाणत होते.
 
अशा उपयुक्त पशूचे रक्षण आणि त्याचे वैज्ञानिक पद्धतीने सुपालन, प्रजनन हे सावरकरांचे सांगणे होते.
कोणत्याही गोष्टीवर धर्माचा शिक्का मारून, त्याचे मंदिर बांधणे सावरकरांना मान्य नव्हते. यापुढे हिंदू जगभर जातील, त्यावेळी अन्नाचा प्रश्न त्यांच्या पुढे येईल, तर त्यांनी काय करावे यावर सावरकर सांगतात, “तुम्हाला परदेशी जावे लागले, तेथे कोणाच्याही पंगतीला बसून काहीही खावे लागले, त्यावेळी जे जे आरोग्यदृष्टया योग्य असेल, ते ते अन्न तुम्ही खाल्ले पाहिजे.” इतका हिंदुहिताचा, बुद्धिनिष्ठ विचार देणारा माणूस हिंदूंच्या इतिहासात दुर्मिळच.
 
 
 
 
 
- शिरीष पोळ  (8329801944)
 
@@AUTHORINFO_V1@@