स्वा. सावरकर आणि स्त्री सबलीकरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2018
Total Views |
 

स्वा. सावरकरांनी स्त्री स्वातंत्र्याबद्दल चिंतनपर लिहिले नाही अथवा स्त्री स्वातंत्र्यासाठी कोणतीही चळवळ केली नाही, असा त्यांच्यावर आक्षेप घेतला जातो. स्वा. सावरकरांनी स्त्री स्वातंत्र्याचा प्रश्न हा स्त्री जन्ममरणाचा किंवा तिच्या अस्तित्वाचाच ज्वलंत प्रश्न आहे, असे मानून लेखन वा चळवळी केल्या नाहीत, हे खरे आहे. परंतु, त्यामागील सावरकरांची दृष्टी विचार कारणमीमांसा समजून घेणे आवश्यक आहे.
दि. २८ मे १८८३ ते २६ फेब्रुवारी १९६६ असा ८६ वर्षांचा स्वा. सावरकरांचा जीवनपट न्याहाळला तर लक्षात येतं की, सावरकरांचं जीवन, त्यांची झुंज काही विशिष्ट ध्येयांसाठीची होती. विशिष्ट निष्ठांना जोपासण्यासाठीची होती. त्यांचं संपूर्ण आयुष्य त्याचं जीवितकार्य आणि त्यांची सहित्यसंपदा याचा एकत्रित, एकसंध अभ्यास केला, म्हणजे लक्षात येतं की, हिंदुत्वनिष्ठा, स्वातंत्र्यानिष्ठा, विज्ञाननिष्ठा आणि बुद्धिनिष्ठा किंवा विवेकनिष्ठ या निष्ठा जोपासण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याचा होम केला. देशभक्ती आणि हिंदुत्वनिष्ठा ही त्यांच्या सर्व जीवन कार्याची प्ररेणा व कारकशक्ती होती. हिंदुत्वनिष्ठा केंद्रस्थानी ठेवून त्यांनी आपले राजकारण वाङ्मयकारण, समाजकारण, अर्थकारण, पक्षस्वीकार इ. गोष्टी केल्या. स्वातंत्र्यनिष्ठेची बीजे तर लहानपणापासूनच त्यांच्या मनात रुजलेली होती. बालपणी आपल्या कुलदेवतेपासूनच केलेली भीष्मप्रतिज्ञा हेच दर्शवते. मातृभूमीच्या रक्षणार्थ ‘मारिता मारिता मरेतो झुंजेन’ म्हणजे देशाचे स्वातंत्र्य हेच मूळ ध्येय, हीच मूळ निष्ठा! ‘हे मातृभूमी, तुजला मन वाहियले वक्तृत्व वाग्विभवही तुंज अर्पियले’ हे शब्द अक्षरशः सत्य आहेत. स्वा. सावरकरांचा प्रत्येक श्वास प्रत्येक विचार प्रत्येक कृती प्रत्येक निर्णय फक्त आणि फक्त देशहितास्तवच होता त्यांनी मांडलेलं हिंदुत्व, त्यांनी केलेला सैनिकीकारणाचा पुरस्कार, त्यांचे जात्युच्छेदन, त्यांची विज्ञाननिष्ठा, त्यांचे द्रष्टेपण आणि त्यांचा स्त्रीविषयक विचारही सगळे सगळे केवळ ‘राष्ट्रहित’ या एकाच ध्येयापोटी जन्माला आले.
 
दादरच्या भागिनी समाजात ऑक्टोबर १९५० मध्ये दिलेल्या भाषणात सावरकर म्हणाले, “स्त्री जीवनाचे ध्येय निसर्गानेच निश्चित करुन ठेवले आहे. स्त्रीची वाढ, विकास, परिणती इत्यादी गोष्ट लक्षात घेता, तिचे ध्येय संतान पोषण हे आहे...” झालं! लोकांना वाटलं सावरकर स्त्रीला ‘चूल आणि मूल’ यातच बांधून ठेवू पाहत आहेत. इतर सर्वत्र क्षेत्रात पुरोगामी आणि क्रांतीकारक विचार मांडणारे सावरकर स्त्रियांच्या बाबतीत मात्र प्रतिगामी ठरले. पण, असा विचार करणे केवळ अपरिक्वताच दर्शवते, कारण यामागेही सावरकरांचा राष्ट्रहिताचाच विचार आहे. ‘संतती’ हा शब्द ‘राष्ट्र’ या अर्थाने सावरकर वापरतात. केवळ घरे, पर्वत, माती या गोष्टी म्हणजे राष्ट्र नव्हेत. मागे होऊन गेलेले ते ’पूर्वज’ आणि पुढे होणारे संतान ते ‘वंशज’. या दोहोंशी परंपरेने, प्रेमाने, धर्माने इतिहासाने बांधलेला जो समुदाय त्याचे नाव ’राष्ट्र’. मग ‘संततीपोषण’ म्हणजेच ’राष्ट्रसंवर्धनाचं दायित्व’ म्हणजेच ’राष्ट्रकार्य’ अशी अर्थाची वलयं आपोआप उलगडत जातात. याच विचारातून सावरकर पुढे स्त्री जीवनाचे ध्येय आणि स्त्री शिक्षणविषयक मते मांडतात.
 
१९३३ मध्ये सावरकरांनी ’मनुस्मृतीतील महिला’ ही चार लेखांची लेखमाला ’स्त्री’ मासिकातून लिहिली. ही लेखमाला प्रधानतः माहितीपर असली, तरी सावरकरांच्या स्त्रीविषयक भूमिकेचे दर्शन या लेखमालेत घडते. १९३६ मध्ये ‘प्राचीन यहुदी योषिता’ ही तीन लेखांची लेखमाला लिहिली. तसेच ’रशियातील घटस्फोट - स्वातंत्र्याचा प्रयोग’, ‘ललनांच्या लावण्याचे हानी-लाभ’ हेही लेख लिहिले. काही विशिष्ट संदर्भांमुळे प्रसिद्ध असलेल्या तीन स्त्रियांवर सावरकरांनी लेख लिहिले. चीनचे सर्वाधिकारी चंग-कै-शेक यांच्या पत्नी चंग, इटलीचे सर्वाधिकारी मुसोलिनी यांच्या पत्नी मुसोलिनी आणि ऍबिसिनियाचे सम्राट रासतफारी यांची सम्राज्ञी या तिघींचा परिचय सावरकर भारतीयांना करुन देतात. थोर पुरुषाची स्त्री ती थोर स्त्री किंवा जी स्त्री स्वतःच्याच थोर गुणांनी वा कृत्यांनी थोरपणा पावते, ती थोर स्त्री या अर्थाने सावरकर या तिघींचा परिचय करुन देतात. यातील पहिली राजकारणधुरंधर आहे, दुसरी सुगृहिणी आहे आणि तिसरी निव्वळ धर्मभोळी आहे.
चंग एक अत्यंत बुद्धिमान आणि राजकारणधुरंधर स्त्री आहेत. आपल्या पतीच्या बरोबरीने त्या चीनचा राज्यकारभार करतात. चंग यांच्यातील या गुणांचीच सावरकर मुक्त कंठाने प्रशंसा करतात. चंग यांचे कौतुकही करतात. याचाच अर्थ राजकारणासारखा विषयही स्त्रियांना वर्ज्य नाही, याही क्षेत्रात त्या पुरुषांपेक्षाही अधिक तेजाने स्त्रिया तळपू शकतात, हेच सावरकरांना अधोरेखित करायचे आहे.
याउलट मुसोलिनी यांना राजकारणात अजिबात रस नाही, ऐवढेच नाही तर पूर्णतः तिटकारा आहे. कुटुंबाच्या बाहेर पाऊलही न टाकणारी ही अक्षरशः एक गृहिणी आहे. उभ्या जन्मात तिने कधी प्रधान मंडळात पाय टाकलेला नाही. राजकारणाची कधी चौकशी केली नाही. सार्वजनिक कामांतही भाग घेण्याची त्यांना आवड नाही. त्यामुळेच मुसोलिनीनेही आपल्या पत्नीला कधी सार्वजनिक समारंभ, सभा वा भोजन समारंभांत नेले नाही. याचा अर्थ मुसोलिनी आपल्या पत्नीला उंबरठ्याच्या आतच डांबून ठेवतात असा होत नाही, उलट पत्नीची इच्छा आणि आवड याचा सन्मान ते करत. आपली इच्छा आणि प्रतिष्ठा तिच्यावर लादत नसत. असाच याचा अर्थ होतो.
स्वतः सावरकारांच्या पत्नी माई सावरकर यांनी रत्नागिरीला समाजसुधारणेच्या कार्यास हातभार लावला. महिलांचे सार्वजनिक हळदीकुंकू आणि सार्वजनिक सहभोजनही केले. पण, म्हणून त्यांच्यात चंग यांच्यासारखी राजकारणाचे डावपेच लढवण्याची क्षमता आहे असे होत नाही. स्वा. सावरकारांवर जेव्हा आरोप होतात की, ते आपल्या पत्नीला कधीही सार्वजनिक समारंभात व्यासपीठावर घेऊन जात नसत, सावरकर स्त्रियांना कमी लेखतात, स्त्रीने फक्त चूल-मूल सांभाळावी असे त्यांना वाटते, तेव्हा आरोप करणार्‍यांनी हे लेख बारकाईने वाचण्याची आणि त्यावर चिंतन-मनन करण्याची गरज आहे, असे मला वाटते. ‘सुज्ञ पत्नीने उचलले तेच कर्तव्य करीत राहावे’ हा सावरकरांचा खरा उपदेश आहे. थोर व्यक्तिमत्व अंगी नसतानाही केवळ आपली पत्नी जगापुढे यावी यासाठी उठाठेव करणे त्यांना पसंत नव्हते. मुसोलिनी यांच्याच गटातील माई सावरकर होत्या. त्यांची कार्य करण्याची क्षमता ओळखूनच सावरकरांनी त्यांना महिला हिंदू सभेच्या व्यासपीठावर बसवले नाही.
 
सावरकरांनी ओळख करून दिलेली तिसरी स्त्री धर्मभोळेपणाचा अतिरेक करणारी आहे. स्वातंत्र्य मिळावे म्हणून देवाची प्रार्थना करण्यात ती दंग आहे. हिंदुस्थानातल्या असंख्य धर्मभोळ्या, देवभोळ्या आणि अंधश्रद्ध महिलांसारखी आहे. राष्ट्रहितदृष्ट्या स्त्री कशी असू नये, हे दर्शविण्यासाठीच सावरकर ऍबिसिनियाच्या सम्राज्ञीविषयी लिहितात. थोडक्यात, स्त्रीच्या वैयक्तिक गुणवत्तेवरून तिचं थोरपण आणि तिचे कार्यक्षेत्र सावरकर ठरवतात. संपूर्ण स्त्री जातच कनिष्ठ आहे किंवा संपूर्ण स्त्री जातीचे चूल आणि मूल एवढेच मर्यादित कार्यक्षेत्र आहे, असे त्यांना कदापि म्हणावयाचे नाही. ज्या स्त्रीच्या ठिकाणी निर्भेळ गुणवत्ता आणि कर्तृत्व असेल, तिने अवश्य चंगसारखे बनावे, पण जर तशी योग्य गुणवत्ता आणि कर्तृत्व नसेल, तर मुसोलिनीसारखी उत्तम गृहिणी बनून, आपली जबाबदारी पार पाडावी असे ते सांगतात. मात्र, ऍबिसिनियाच्या सम्राज्ञीप्रमाणे अंधश्रद्धा आणि देवभोळेपणाच्या अती आहारी जाऊन, राष्ट्रकर्तव्याचा विसर पडू देऊ नये, असे तीन महत्त्वाचे संदेश देण्यासाठीच सावरकरांनी हा लेखनप्रपंच केलाय.
 
स्वा. सावरकरांनी स्त्री स्वातंत्र्याबद्दल चिंतनपर लिहिले नाही अथवा स्त्री स्वातंत्र्यासाठी कोणतीही चळवळ केली नाही, असा त्यांच्यावर आक्षेप घेतला जातो. स्वा. सावरकरांनी स्त्री स्वातंत्र्याचा प्रश्न हा स्त्री जन्ममरणाचा किंवा तिच्या अस्तित्वाचाच ज्वलंत प्रश्न आहे, असे मानून लेखन वा चळवळी केल्या नाहीत, हे खरे आहे. परंतु, त्यामागील सावरकरांची दृष्टी विचार कारणमीमांसा समजून घेणे आवश्यक आहे. ज्या काळात सावरकरांनी स्त्री स्वातंत्र्याच्या प्रश्नावर प्रकट चिंतन करावे, तो काळ होता त्यांच्या रत्नागिरीतील स्थानबद्धतेचा, म्हणजेच १९२५ नंतरचा. त्यावेळेस आणि त्यापूर्वीही सतत त्यांच्या मनचक्षूंसमोर एकच ध्येय होतं आणि ते म्हणजे स्वातंत्र्य! या एकाच ध्येयासाठी त्यांचे सारे चिंतन, लेखन कार्य आणि कृती होती. त्यामुळे केवळ स्त्री स्वातंत्र्यच नव्हे, तर अशा अनेक मानवी मूल्यांसंदर्भात सावरकर गप्प बसलेले दिसतात. मुख्य म्हणजे सावरकांच्या काळात बर्‍याच सामाजिक सुधारणा घडून आल्या होत्या. सतीचा प्रश्न पूर्णतः मिटला होता. मुलींच्या शिक्षणासाठी समाज अनुकूल झाला होता. फुले अथवा आगरकरांच्या काळात स्त्री शिक्षणाचा प्रश्न जेवढा ज्वलंत होता, तेवढा तो आता राहिला नव्हता. मुलीच्या लग्नाचे वय किती असावे हा वाददेखील मिटला होता. इतकेच नाही, तर मुलगी पसंत करताना ‘शिक्षण किती झालंय?’ हाही प्रश्न विचारला जात होता. विधवा विवाहही हळूहळू समाजात मान्यता पावत होते. तरीही या संदर्भात सावरकरांचे विचार किती पुरोगामी होते हे जाणून घ्यायचे असेल, तर त्यांनी वयाच्या १९ व्या वर्षी केलेली ‘बालविधवा दुःस्थिती कथन’ करणारी कविता वाचावी. सावरकर लिहितात-
 
धर्माभिमान म्हणजे काही सुविवेकशून्यता नाही
कालस्थितीवश धर्मही आहे हे तत्त्व मान्य मान्यांहि
सुज्ञाने सुविचारे स्थित्यनुसारे स्वधर्म सुधारावा
आपद्गतिचा धोपट मार्गचि हा हट्ट व्यर्थ न धरावा॥
साठीच्या पुरुषांनी नवे लग्न करायला हरकत नाही, तर तोच नियम स्त्रियांना का लावू नये? विधवा आणि विधूर यांमध्ये भेदभाव का? पुरुषाला केव्हाही दुसरे लग्न करता येते, निपुत्रिक असला तर तो मूल दत्तकदेखील घेऊ शकतो, मग स्त्रियांना मात्र वेगळे नियम का? असे प्रश्न त्यांनी मांडले आहेत. यावरून नक्कीच असे म्हणता येईल की, इतर सर्व क्षेत्रांबरोबरच स्त्रीविषयक विचारांच्या बाबतीतही सावरकर पुरोगामीच होते!
एकदा स्त्रियांच्या सभेत बोलताना सावरकर म्हणाले, “आजच्या स्त्रियांत मुख्य उणीव धैर्याची आहे. देशकार्यार्थ घराबाहेर पडणार्‍या पुरुषाने दाराआड मुसमुसून रडणारी पत्नी पाहिली की त्याचे धैर्य खचते, म्हणून स्त्रियांनी माता विदुलेप्रमाणे आपल्या मुलांना पळून न येता, लढण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. झाशीच्या राणीचा पराक्रम हा आपला आदर्श असला पाहिजे. आपल्यात सामान्य समजूत अशी आहे की, मुलगा हवा, मुलगी नको. मुलींकडे माता फार थोडे लक्ष देतात, पण ही चूक आहे. मुलींची चांगली जोपासना केली पाहिजे. कारण, ती मुलगीच पुढच्या पिढीची जननी आहे. भावी पिढी तेजस्वी नि सामर्थ्यवान निपजावी आणि तिने देशाचे पारतंत्र्य घालवावे, अशी तुमची इच्छा असेल, तर मुलींच्या जोपासनेकडेही योग्य लक्ष दिले पाहिजे...” स्वा. सावरकरांचं हे वक्तव्य, त्यांनी स्त्रियांना दिलेला संदेश, “वनितांनो विदुला व्हा!” अर्थ, आशय आणि मार्गदर्शनाच्या दृष्टीने अतिशय मूल्यवान आहे. राष्ट्राच्या जडणघडणीत स्त्रियांचा वाटा किती महत्त्वाचा आहे, हे सांगणारं हे वक्तव्य आहे. शिवाजी घडवायचा असेल, तर आधी ‘जिजाऊ’ जन्माला यावी लागते, हे अधोरेखांकित करणारं हे वक्तव्य आहे. यात कुठेही स्त्रीला हीन दर्जा दिलेला नाही, अथवा स्त्रियांवर अन्याय्य जाचक बंधने असावीत याचे सूतोवाच नाही. याउलट, स्त्री राष्ट्राच्या हृदयस्थानी आहे, हेच यातून स्पष्ट होत आहे. “तुम्ही (स्त्रियांनी) आजची वृत्तपत्रे वाचून, देशाची आजची स्थितीसुद्धा समजून घेतली पाहिजे.” असे जाहीरपणे सांगणारे सावरकर ‘चूल आणि मूल’ हेच स्त्रीचं विश्व आहे, असे मानणारे नव्हते, हे नक्की!
परमेश्वराने मुळातच स्त्रीला पुरुषापेक्षा अधिक शक्ती दिली आहे. ती शक्ती आहे नवनिर्मितीची आणि हाच स्त्री-पुरुषांमधील नैसर्गिक भेद आहे. त्यामुळे ही नवनिर्मितीची क्षमता हे आपलं दौर्बल्य आहे किंवा निसर्गाने स्त्रीच्या मागे लावलेली कटकट आहे अथवा आपल्या प्रगतीतील खीळ आहे, असं न समजता हे आपल्याला मिळालेलं एक वरदानच आहे, असं प्रत्येक स्त्रीने समजावं, असं सावरकरांना वाटतं. मात्र, नवनिर्मिती, सृजन, संततीनिर्माण एवढं एकमेव स्त्री जीवनाचं ध्येय आहे, असं सावरकर कुठेही सांगत नाहीत. राष्ट्राकरिता स्त्रियांना काय करता येईल? या प्रश्नाच्या उत्तराचा हा केवळ एक पर्याय आहे. ते प्रथम आणि महत्त्वाचं कर्तव्य बजावल्यानंतर ती स्त्री इतर काहीही करू शकते. अर्थात तिच्या वैयक्तिक गुणवत्तेचा विचार करून! जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी पुरुषांसारखेच कर्तृत्व गाजवावे, या गोष्टीला सावरकरांचा तात्त्विक विरोध कधीही नव्हता.
सावरकरांनी स्त्रियांच्या शिक्षणाविषयीही सांगितले आहे. स्त्रीला गृहशिक्षण मिळाले पाहिजे. पुढची संतती आजच्या पिढीपेक्षा अधिक बलवान, सुंदर आणि देशाभिमानी व्हावी, असे शिक्षण स्त्रियांना मिळावे. किंबहुना स्त्री शिक्षणाचे ध्येय हेच असले पाहिजे असे त्यांना वाटते. मुलींकरिता स्वतंत्र व त्यांच्या विशिष्ट मनोरचनेला अनुरूप अशा शिक्षण पद्धतीची योजना तयार करणे त्यांना आवश्यक वाटते. याबाबतीत स्त्री शिक्षणाचे महर्षी म्हणून आपण ज्यांना गौरवितो, त्या धोंडो केशव कर्वे यांच्या मताशी स्वा. सावरकरांचे विचार जुळतात असेच म्हणावे लागेल. कारण, कर्व्यांनी याच विचारावर आधारित स्वतंत्र विद्यापीठच काढले आहे आणि आज २१ व्या शतकात स्त्री अंतराळात गेली तरीही या ‘गृहविज्ञान’ आणि ‘गृहविज्ञान तंत्रज्ञाना’वर आधारित पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या तरुणींची संख्या झपाट्याने वाढतेच आहे. याचाच अर्थ सावरकरांनी मांडलेला विचार आज सार्थ आणि योग्य ठरतो आहे.
मात्र, एरवी विज्ञानयुगाचे स्वागत करणार्‍या सावरकरांना स्त्रियांचे दुःख कमी व्हावे म्हणून ‘नलिका बाळा’चा म्हणजे यांत्रिक मुले बनविण्याचा प्रयोग मात्र मान्य नाही. तसे झाले तर माया, वात्सल्य आणि ममताच शिल्लक राहणार नाही आणि राष्ट्रही शिल्लक राहणार नाही, अशी भीती त्यांना वाटते.
सावरकरांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन त्यांच्या साहित्यातूनही प्रकट होतो. स्त्री ही अबला नाही. मानसिक शक्ती जर एकवटल्या तर तिला अशक्य ते काय? हे सांगण्यासाठी सावरकरांच्या ‘उत्तरक्रिया’ नाटकातील ‘सुनीती’ पुरेशी आहे. जी खरा सतीधर्म पाळण्यासाठी बलात्कारित अवस्थेतही आत्महत्या न करता पापाच्या प्रायश्चित्ताची वाट पाहत बसते आणि संधी साधून, ज्याने तिची दुर्गती केली, त्या काळसर्पाला त्याच्या अनुयायांसह मारण्याची इच्छा धरून, त्याच कार्यात मरण पत्करते. तेही दुर्जनांचे भंजन करणार्‍या समरभूमीवर! ‘उत्तरक्रिया’मधली ‘सुशीलाही वीरांगना आहे. सैन्यात स्त्रियांना शिरता येत नाही, तर सुशीला म्हणते, “स्त्रीस मज्जाव नाही, स्त्रीवेषास मज्जाव आहे. मी पुरुषवेष करून जाईन.”
‘संन्यस्त खड्ग’ या नाटकातील सुलोचनाही अशीच आहे. जी पुरुषवेष धारण करून संग्रामात उडी घेते आणि शाक्यांची रणदेवताच बनते. तिच्या तोंडचे तेजस्वी उद्गार स्त्रीच्या मनोबलाचे सार्थ दर्शन घडविणारे आहेत. ती म्हणते, “मुळूमुळू रडत, मलीनवदन होऊन बसण्यापेक्षा शत्रूच्या रक्तात न्हाऊन, धुवून आपल्या पतीच्या सूडाची मशाल चेतवून, विरहाच्या अंधःकारातून प्रियकर गेला ती वाट काढावी आणि त्यास जाऊन भेटावे.”
‘उःशाप’ मध्ये अस्पृश्यतेच्या कलंकाला दूर करण्यासाठी प्रियकराने मुसलमान धर्म स्वीकारला, तर त्याची प्रिया कमलिनी, ‘स्वधर्मद्रोहीनीचता’ म्हणून त्याचा धिक्कार करते. कारण तिची प्रीती केवळ ऐहिक नाही. तिला प्रियकराचाच नाही तर त्याच्या मूल्यनिष्ठेचाही ध्यास आहे.
‘कमला’, ‘गोमांतक’ सारखी काव्ये, ‘उःशाप’ ’संन्यस्त खड्ग’ व ‘उत्तरक्रिया’ सारखी नाटके किंवा ‘मोपल्यांचे बंड’ वा ‘काळे पाणी’ सारख्या कादंबर्‍या वा त्यांच्या इतर स्फुट कथांमधील स्त्रीपात्रांना नावे वेगवेगळी असली, तरी स्वरुप व स्वभावधर्म तेच आहेत. ही सर्व एकाच तेजस्विनीची विविध रुपे आहेत. सावरकर साहित्यातील स्त्री-विशेषांच्या दीप्तीने आपली मने दीपून जातात. ‘हिंदुत्वाच्या अपजयाचे दारुण दुःख मी जन्मभर सोसले, त्या मला मरताना तरी हिंदू धर्माच्या जयवाद्यांच्या निनादात सुखाने मरु द्यावे’, ही ‘उत्तरक्रियेतील सुनीतीची अखेरची इच्छा वाचून, आपल्या काळजाचे पाणी होते. स्त्रीला शस्त्र द्यावे; नव्हे तिने ते वापरुन आपल्या पावित्र्याचे, पर्यायाने राष्ट्रशक्तीचे रक्षण करावे हे सावरकरांचे स्वप्न त्यांनी आपल्या कलाकृतींमधून प्रत्यक्षात उतरविले आहे. सावरकरांची स्त्रीसृष्टी एका सुंदर बलशाली विचारस्वप्नाचे प्रतीक आहे. या स्त्रीपात्रांमधून सावरकरांनी हेच दाखवून दिले आहे की, वीरता, विचार, प्रीती आणि त्याग यात स्त्री पुरुषापेक्षा कुठेही कमी नाही, उलट काकणभर सरसच आहे.
भारतीय स्त्रीच्या मर्यादा आणि त्याबरोबरच तिची सहनशक्तीही सावरकर जाणून होते. म्हणून आपल्या वहिनीचा निरोप घेताना ‘माझे मृत्युपत्र’ या कवितेत पूजनीय वहिनीबरोबर साऱ्याच भारतीय स्त्रियांकडून असलेल्या काही अपेक्षा त्यांनी बोलून दाखविल्या आहेत-
‘ऐसे विवंचुनि अहो वहिनी व्रताते
पालोनि वर्धन करा कुल-दिव्यतेचे
श्रीपार्वती तप करी हिमपार्वती ती
की विस्तवात हसल्या बहु राजपूती
ते भारतीय अबला-बलतेज काही
अद्यापि या भारभूमित लुप्त नाही
हे सिद्ध होईल असेचि उदार उग्र
वीरांगने, तव सुवर्तन हो समग्र’
 
स्त्री-सबलीकरणाचा स्वा. सावरकरांचा हा विचार आजच्या स्त्रीसाठीही आवश्यक आहे. आता स्त्री स्वतःला अबला समजत नाहीच आहे. तिला तिच्या स्वतःच्या सबलीकरणाची जाणीव झाली आहे. किंबहुना, तिने स्वतःमधील सर्वशक्तीचे रुप दाखविण्यास सुरुवातही केली आहे. आज जेव्हा एखादी संजुक्ता पारशर किंवा स्वाती महाडिक पुढे येते, तेव्हा स्वा. सावरकरांची प्रकर्षाने आठवण होते. वाटतं, त्यांना अपेक्षित असं हे स्त्री-रुप पाहून स्वर्गात त्यांचा आत्मा नक्कीच प्रमुदित होत असेल. आज भारताच्या संरक्षण मंत्री पदी एक स्त्री आहे आणि सीमेवर प्रत्यक्ष शत्रूशी दोन हात करणारी ही रणचंडी आहे. स्वा. सावरकर म्हणतात त्यानुसार ज्या स्त्रियांना हे शक्य नाही त्यांनी इतर क्षेत्रे सांभाळून, सबल सशक्त, सुसंस्कारित आणि देशप्रेमी संतती अथवा पुढील पिढी घडविली, तर भारत बलशाही होण्याचे स्वप्न दूर नाही.
 
- डॉ. शुभा साठे, नागपूर (9422146864)
 
@@AUTHORINFO_V1@@