नाव गांधींचे, वाटचाल सावरकरवादाकडे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2018   
Total Views |
 
 
 
 
 
नाव गांधींचे घेतलं जात आहे, पण वाटचाल सावरकरवादाकडे होत आहे का? म्हणजे सावरकरवादाला गांधीवादाचे लेबल लावलं जात आहे का? मुखात गांधी, कृतीत सावरकर का? पण, वाटचाल सावरकरवादाकडे होऊनही नाव गांधींचे का घेतलं जात आहे? कारण, गांधींनी लोकांच्या भावनेला साद घातली, तर सावरकरांनी लोकांच्या बुद्धीला साद घातली व त्यात आपण भारतीय जरा जास्तच भावनिक! त्यामुळे गांधी श्रद्धेय विषय ठरले.
 
 
 
अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा नोव्हेंबर २०१० ला भारतभेटीवर आले होते. तेव्हा त्यांनी भाषणात महात्मा गांधींच्या अहिंसा तत्त्वज्ञानाचे गोडवे गायले होते. पण, याच अध्यक्ष ओबामांनी अमेरिकेत गेल्यावर सहा महिन्यांत मे २०११ ला लादेन हत्येची हिंसात्मक कारवाई यशस्वी करून दाखवली. पंतप्रधान मोदीसुद्धा स्वदेशात व परदेश दौर्‍यात महात्मा गांधींचे नाव घेतात, पण त्याचवेळी त्या त्या देशांशी संरक्षण व लष्करी तंत्र, सामग्री व शस्त्रास्त्राचे करार करून येतात तर स्वदेशात शत्रूचे हृदयपरिवर्तन न करता, सर्जिकल स्ट्राईक करून, शत्रूला धडा शिकवतात.
 
 
 
हे गांधीविचारांशी विसंगत नाही का? म्हणजे केवळ नाव गांधींचे घेतलं जात आहे का?
 
 
अधूनमधून बातम्या झळकत असतात की, कधी चर्चासत्रात, परिषदेत गांधीवादी विचारवंत, अमूक अमूक वक्ता म्हणाला, ’जगाला गांधींच्या अहिंसा विचारांची गरज आहे,’ मुळात कुठल्याच नैतिक व विवेकी माणसाचा अहिंसेला विरोध नसतो, त्याचा विरोध केवळ अतिरेकी व भोंगळ अहिंसेला असतो. गांधींच्या आधी व नंतर बऱ्याच विचारवंतांनी, राजकारण्यांनी अहिंसेचे महत्त्व सांगितले आहे. पण, फरक इतकाच आहे की त्यांची अहिंसा व्यक्तिसापेक्ष, कालसापेक्ष, परिस्थितीसापेक्ष होती, तर गांधींची अहिंसा व्यक्तिनिरपेक्ष, कालनिरपेक्ष, परिस्थितिनिरपेक्ष होती. सावरकरांनी स्वतः सशस्त्र क्रांतिकारक असून, अहिंसेचे महत्त्व सांगितले आहे, इतकेच नव्हे तर त्यांनी स्वतः ‘भागानगरचा निःशस्त्र प्रतिकार’ हे अहिंसात्मक आंदोलन उभारून यशस्वी करून दाखवले आहे. परकीय शत्रूच्या सशस्त्र अत्याचाराविरूद्ध लढताना आवश्यक नि न्याय्य असलेली क्रांतिकारक प्रवृत्ती आता घटनात्मक मार्गात रूपांतरित केली पाहिजे, असेही आवाहन त्यांनी स्वातंत्र्यानंतर सशस्त्र क्रांतिकारकांना केले होते. पण, ‘आम्ही कोणावर आक्रमण करणार नाही म्हणून आम्हाला सैन्याची गरजच नाही,’ अशी भंपक विधानं केली नाहीत. भारत अहिंसक असला, तरी कोणी हिंसा केलीच तर ती थांबवायला पोलीस दल आहेच तर मग परकीय राष्ट्रांनी आक्रमण करून, स्वकीयांची हिंसा केली, तर ती थांबवायला सैन्यदल का नको?
 
 
बुद्धिवादी पण गांधीभक्त नरहर कुरूंदकरांनीसुद्धा गांधीमहिमा वर्णन करताना ‘शिवरात्र’ ग्रंथात असे विधान केले आहे की, “हाती शस्त्र घेणारे स्वातंत्र्यसैनिकसुद्धा गांधींचे नाव घ्यायचे, इतके गांधी मोठे व सर्वव्यापी होते.” या विधानातून बुद्धिवादी कुरूंदकरांचा गांधीभक्तीमुळे झालेला वैचारिक गोंधळ दिसून येतो. नक्की गांधी मोठे की गांधीतत्त्वज्ञान मोठे? राष्ट्राची उभारणी ‘गांधी’ या व्यक्तीवर करायची आहे की गांधीतत्त्वज्ञानावर? पण, व्यक्ती तिच्या कार्यामुळे किंवा तत्त्वज्ञानामुळे मोठी होते, पण येथे स्वातंत्र्यसैनिकांची कृती गांधीतत्त्वज्ञानविरोधी होती म्हणजे ‘गांधी’ ही व्यक्ती श्रेष्ठ असे म्हणायचे होते का कुरूंदकरांना? म्हणजे ‘गांधी’ या व्यक्तीवर राष्ट्रउभारणी करून, गांधीतत्त्वज्ञानाला हरताळ फासलेला चालणार होता का?
 
 
 
एखाद्याने गांधीवादाला विरोध केला तर त्याला लगेच ‘नथुरामवादी’ ठरवले जाते. गांधीवादी नसणारा किंवा गांधीविरोधक नथुरामविरोधीसुद्धा असू शकत नाही का?
 
‘जमात-ए-इस्लामी’च्या संमेलनात कुरूंदकरांनी केलेले भाषण विचारप्रर्तक होते. त्यात ते म्हणतात, “मी नास्तिक आहे. धार्मिक अर्थाने मी हिंदू नाही. पण मी मुसलमानही नाही. हे तुम्हाला मान्य आहे काय? मी मुसलमान नाही. पण माझा मुसलमान नसण्याचा हक्क तुम्हाला मान्य आहे काय?”
 
याचप्रमाणे मी कुरंदकर व इतर गांधीवाद्यांना विचारतो, “मी हिंदू आहे, मी नथुरामविरोधक आहे, पण मी गांधीवादी नाही,” हे तुम्हाला मान्य आहे काय? मी गांधीवादी नसताना माझा देशभक्त असण्याचा अधिकार तुम्हाला मान्य आहे काय? मी देशभक्त असताना माझा गांधीवादी नसण्याचा अधिकार तुम्ही मान्य करता काय?
 
गांधीजींचे स्वातंत्र्यलढ्यातील स्थान नाकारणे म्हणजे वास्तव नाकारणे होय. सामान्य लोकांना व विशेषतः स्त्रियांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी गांधींनी ‘सत्याग्रह’ हे एक महत्त्वपूर्ण साधन उपलब्ध करून दिलं. सावरकरी मार्गानुसार अल्प लोकांनी मोठा त्याग करून, बहुसंख्य लोकांना स्वातंत्र्य मिळवून द्यावं असा तो मार्ग होता; यात बहुसंख्य लोकांचा अप्रत्यक्षरीत्या सहभाग होता, पण तो खडतर मार्ग होता. गांधीमार्गानुसार प्रत्यक्षरीत्या बहुसंख्य लोकांचा सहभाग होता. म्हणजे थोडक्यात गांधीजींनी स्वातंत्र्यलढा ‘Global' केला व स्वातंत्र्यचळवळीतील सहभागेचे ‘Simplification’ केले. गांधीमार्गाने स्वातंत्र्यचळवळ उभी करता येऊ शकते व जनमानसात जागृती निर्माण करता येऊ शकते व याचे श्रेय गांधीजींनाच द्यायला हवे. पण, केवळ गांधीमार्गाने म्हणजे सत्याग्रह व अहिंसा या मार्गाने स्वातंत्र्य चळवळ जरी उभी करता आली, तरी त्यामुळे स्वातंत्र्य मिळवता येत नाही. गांधीजींनी कितीही प्रामाणिकपणे अहिंसक आंदोलन करायचा प्रयत्न केला, तरी गांधीजींची ‘खिलाफत,’ ‘असहकार’ व ‘चले जाव’ ही आंदोलने अहिंसक राहू शकली नाहीत हे वास्तव आहे. गांधीमार्ग जागृतीचा मार्ग होता, पण Result Oriented होता का? स्वतंत्र भारतामध्ये एखादे जनआंदोलन किंवा चळवळ ही अहिंसकच हवी. कारण इथे हा लढा आपल्याच माणसांविरुद्ध आहे. पण, शत्रूशी म्हणजे उद्या सीमेवर परकीय राष्ट्राशी लढण्याची वेळ आली, तर हाती शस्त्र घ्यायलाच हवे, कारण इथे अहिंसक चळवळ व सत्याग्रह आत्मनाश व राष्ट्रनाश करेल.
 
गांधी व गांधीविचार जगभर पोहोचले आहेत, पण कुठला देश गांधीविचार अथवा तत्त्वज्ञान आचरणात आणतोय? एखाद्या तत्त्वज्ञानाची लोकप्रियता ही त्या तत्वज्ञानाची उपयुक्तता व परिणामकारकता सिद्ध करत नाही. याउलट सावरकर व सावरकरविचार लोकप्रिय नाहीत, पण उपयुक्त व परिणामकारक आहेत. गांधी आदरणीय असतील, पण राजकीयदृष्ट्या अनुकरणीय नाहीत. अर्थात, सामाजिक लढ्यात गांधी नक्कीच अनुकरणीय आहेत, उदा. मार्टिन ल्यूथर किंग (ज्युनियर) यांचा लढा. इतकंच काय भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली सामाजिक क्रांतीही अनुकरणीय व अहिंसक होती.
 
आज भारताच्या सीमेवर असलेले शस्त्रसज्ज सैन्य व अण्वसत्रधारी भारत, क्षेपणास्त्र चाचण्या, नवनवीन यंत्र व तंत्रज्ञान शोध, सेवासुविधांचे होणारे आधुनिकीकरण हे सर्व गांधीतत्त्वज्ञानात बसते की सावरकर तत्त्वज्ञानात?
 
म्हणजे नाव गांधींचे घेतलं जात आहे, पण वाटचाल सावरकरवादाकडे होत आहे का?
 
म्हणजे सावरकरवादाला गांधीवादाचे लेबल लावलं जात आहे का?
 
मुखात गांधी, कृतीत सावरकर का?
 
पण, वाटचाल सावरकरवादाकडे होऊनही नाव गांधींचे का घेतलं जात आहे?
 
कारण, गांधींनी लोकांच्या भावनेला साद घातली, तर सावरकरांनी लोकांच्या बुद्धीला साद घातली व त्यात आपण भारतीय जरा जास्तच भावनिक! त्यामुळे गांधी श्रद्धेय विषय ठरले. आपण युद्ध रणांगणावर जिंकतो व टेबलावर हरतो ते याचमुळे. रणांगणावर आपण कूटनीती, व्यूहरचना इ. बुद्धिमय गोष्टींचा उपयोग करतो, म्हणून जिंकतो. पण, टेबलावर शत्रूशी तह, वाटाघाटी करताना भावनेच्या व सद्गुणविकृतीच्या आहारी जातो व हरतो. म्हणून नाव गांधींचं घेतलं जात आहे, पण वाटचाल सावरकरवादाकडे होत आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@