वर्षपूर्तीनंतरही स्थानिक मूलभूत सुविधांपासून वंचित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2018
Total Views |



 

भिवंडी: भिवंडी महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक दि. २४ मे २०१७ रोजी संपन्न झाली होती. आज १ वर्षाचा कालावधी लोटूनही स्थानिक रहिवासी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. रस्ते, पाणी, स्वच्छता त्याचप्रमाणे अन्य सुखसोयी पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने प्रशासनाविरुद्ध तीव्र आक्रोश महापालिका कार्यक्षेत्रात व्यक्त होत आहे.

महापालिकेच्या तिजोरीमध्ये खडखडाट असल्याने शहराचा विकास पूर्णपणे खुंटलेला आहे. अशा परिस्थितीत रडतखडत एक वर्षाचा कालावधी लोटलेला आहे. शहराच्या विकासाचा मार्ग केव्हा मोकळा होणार आणि आर्थिक परिस्थिती केव्हा सुधारणार या क्षणाची प्रत्येक भिवंडीकर वाट पाहत आहेत.

एक वर्षात केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’मध्ये बराच कालावधी गेला. शहर स्वच्छता मोहिमेसाठी जवळपास सर्वांनीच स्वत:ला झोकून दिल्याने अमृत योजनेत भिवंडी शहराचा चौथा तर जलद प्रगती करणारे मध्यम शहर म्हणून प्रथम क्रमांक असा नावलौकिक या वर्षात मिळालेला आहे. ही जमेची बाजू आहे. त्याचे संपूर्ण श्रेय तत्कालीन आयुक्त डॉ. योगेश म्हसे आणि स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांना जाते. मेट्रो ट्रेनमुळे शहराचा झपाट्याने विकास होणार आहे. मात्र मार्ग बदलण्यासाठी रहिवाशांकडून आंदोलने झाली पण मेट्रोचा मार्ग निश्चित असल्याने यापुढे शहराचा विकास होणार, यात तिळमात्र शंका नाही. सार्वजनिक सुविधा पुरविण्यास महापालिका प्रशासन संपूर्ण अपयशी ठरलेले आहे. कारण तिजोरीत पैसाच नाही. उलटपक्षी ८०० कोटी रुपयांचे भलेमोठे कर्ज महापालिका प्रशासनाच्या डोक्यावर आहे. सदर कर्जाची परतफेड कशी करावी याचे कोणतेही नियोजन महापालिकेकडे नसल्याने कर्जाच्या रकमांवर व्याजाची रक्कम दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. अंजूरफाटा ते नारपोली आणि कल्याणरोड येथे सिमेंट काँक्रिट रस्ता तयार करण्याचे काम सोडले तर अंतर्गत रस्त्यांचे सर्वत्र तीनतेरा वाजलेले आहेत. शिवाय जागोजागी होत असलेल्या वाहतूककोंडीमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, कामगार, व्यापारी आदी त्रस्त आहेत. अनेक महिन्यांपासून विविध कार्यालयातील सॉफ्टवेअर बंद पडल्याने कराच्या रकमा भरून घेतल्या जात नाहीत. अशाही तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. अनधिकृत बांधकामांनी डोके वर काढले असून त्यावर कोणतीही परिणामकारक कारवाई होताना दिसत नाही. विविध प्रभागांत पदपथ, गटारे, छोटे रस्ते आदी कामे रखडलेली असल्याने नगरसेवकांना रहिवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे निवडून आलेले नगरसेवकदेखील अशा परिस्थितीत कंटाळलेले दिसत आहेत.

पावसाळा तोंडावर आल्याने नालेसफाईचे काम मजूर लावून आरोग्य विभागाकडून केले जात आहे. तरीसुद्धा सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील पूरपरिस्थितीला स्थानिक रहिवाशांना सामोरे जावे लागणार, अशी सद्य परिस्थिती आहे.

@@AUTHORINFO_V1@@