BUCKET LIST REVIEW : 'टिक' होते पण 'क्लिक' होत नाही!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 
जानेवारी महिना अर्धा संपत होता आणि साधारण त्याच सुमारास एखादी आश्चर्यकारक पण तितकीच सुखावह बातमी कळली. 'दि माधुरी दीक्षित' तिच्या उभ्या आयुष्यात पहिल्यांदा मराठी चित्रपट करणार हे त्या दिवशी अधिकृतरीत्या तिनेच जाहीर केला. अगदी त्यादिवसापासून ते आजपर्यंत सतत एकच प्रश्न मनात घोळत होता की असं 'बकेट लिस्ट' या चित्रपटात नेमकं माधुरीला वेगळेपण काय जाणवलं की जे वेगळेपण घेऊन गेल्या तीस वर्षात तिच्याकडे मराठी मधला एकही दिग्दर्शक गेला नसेल..? अखेर खूप प्रतिक्षा केल्यावर आज (२५ मे) मला काही अंशी या प्रश्नाचं उत्तर मिळालं....
 
एका वाक्यात सांगायचं तर वयाची चाळीशी गाठलेली, संसारात आकंठ बुडालेली, स्वतःवरही प्रेम न करणारी आणि अशातूनच स्वतःच अस्तित्व पुन्हा शोधू पाहणारी नायिका (मधुरा साने) माधुरीने बकेट लिस्ट मधून रंगवलीये. आता हे एक वाक्य वाचल्यावर किंवा ट्रेलर बघितल्यावर तुम्हाला या चित्रपटाचं साधर्म्य श्रीदेवीच्या 'इंग्लिश-विंग्लिश'शी असल्यासारखं जाणवेलही कदाचित आणि दोन्ही चित्रपटांना अंतिम जे साध्य करायचं आहे ते अगदी आहेही तसच. फक्त ते मांडण्याची पद्धत वेगळी आहे. त्यातल्या त्यात बकेट लिस्ट मधून 'अवयव दान' या विषयी केलेली जागृती हे याच वेगळेपण म्हणता येईल. मी ज्या प्रश्नाचा वर उल्लेख केला त्याच समाधानकारक उत्तरही कदाचित याच वेगळेपणात सापडू शकत. पण माधुरीने हा चित्रपट स्वीकारण्यामागे हे एकमेव कारण असावं असं मला वाटत नाही. त्यामागे व्यावसायिक गणितं आणि हिंदी बरोबरच मराठीतही पुन्हा एकदा आपण नाणं चालतंय का हे पाहण्याचा तिने केलेला हा प्रयत्नही असू शकतो.
 
'बकेट लिस्ट' ची 'इंग्लिश-विंग्लिश'शी तुलना होणं साहजिक आहे. कारण दोन्ही चित्रपटांचा जॉनर एकाच धाटणीतला आहे. फक्त दोन्ही कडे कथा रचण्याचा पाया वेगळ्या आशयांवर उभारला गेला आहे. 'बकेट लिस्ट' मध्ये सुरुवातीलाच एका तरुणीचा (सई) मृत्यू होतो आणि तिने अगोदरच अवयव दान केले असल्याने तिचे हृदय मधुराला मिळते व मधुराच्या हृदयाचा आजार काही वर्षांसाठी शमतो. आता आपल्यावर एवढे मोठे उपकार ज्या तरुणीने केले आहेत ती कोण आहे याचा शोध घेताना मधुराच्या हाती सईची 'बकेट लिस्ट' पडते. यात तिने तिच्या २१व्या वाढदिवसापर्यंत अपूर्ण राहिलेल्या २१ इच्छांची नोंद केलेली असते. मग सईच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी मधुरा घेते. यात बाईक चालवणे, शेकडो प्रेक्षकांसमोर नाच करणे, सोशल मीडियावर व्हायरल होणे, रणबीर कपूरसोबत सेल्फी काढणे, बॉयफ्रेंडला किस करणे, दारू पिणे, एखादा गुन्हा करून अटक होणे अशा इच्छांची यादी असते.
 
चित्रपटातील व्यक्तिरेखा आणि वरीलपैकी दोन-तीन इच्छा पूर्ण करण्याची गंमत या सगळ्यात मध्यंतरापर्यंत 'बकेट लिस्ट' तुमचं व्यवस्थित मनोरंजन करतो काही अंशी तो तुम्हाला बांधून ठेवण्यात यशस्वी होतो. रसिकांपैकी महिला वर्ग पहिला भाग स्वतःशी अधिक 'रिलेट' देखील करू शकतात. पण गडबड झालीये ती चित्रपटाच्या दुसऱ्या भागात. 'पब' मधला सीन खूप मोठ्या प्रमाणात फसल्याचे प्रकर्षाने जाणवते. कारण या एकाच सीन मधून दिग्दर्शकाने चार इच्छा पूर्ण करण्याचा चंग बांधला आहे. पब मध्ये जाऊन दारू पिणे, तिथेच रणबीर कपूर भेटणे आणि लगेचच त्याच ठिकाणी पोलिसांनी मधुराला अटक करणे या एका मागोमाग पूर्ण झालेल्या इच्छा 'अनरिअलिस्टिक' वाटतात. एक तर माधुरीला दारू पिऊन 'टूल' झाल्याचा अभिनय अजिबात जमलेला नाही त्याचबरोबर त्या सीन मध्ये मराठीच्या उच्चारांचीही तारांबळ उडाली असल्याचे दिसून येते. (बाकी संपूर्ण चित्रपट तिने चांगल्या प्रकारे मराठी भाषेतील उच्चार केले आहेत.) दुसरी गोष्ट एखाद्या पब मध्ये इतक्या सहजासहजी रणबीर सारख्या मोठ्या कलाकाराची भेट होणं हे देखील मनाला पटत नाही. या दोघांची भेट अधिक 'रिअलिस्टिक' वाटावी यासाठी अजून प्रयत्न होणे अपेक्षित होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या पब मध्ये गोंधळ घातल्यामुळे पबचा मॅनेजर पोलिसांना बोलावतो व तो तिला बेड्या ठोकतो. माझ्या माहितीप्रमाणे तरी अशाप्रकारच्या पब मध्ये दंगा घालणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी 'बाउंसर्स'ची नेमणूक केलेली असते. त्यामुळे एकूणच या सगळ्याच इच्छा ओढून ताणून पूर्ण केल्या असल्याचेच दिसून येते. एक एक करून सईच्या इच्छांच्या लिस्टवर 'टिक' केलं जातं पण प्रेक्षक म्हणून ती झालेली 'टिक' आपल्याला 'क्लिक' होत नाही याचीच खंत वाटत राहते.
 
मध्यंतरानंतर लगेचच हा मोठा सीन असल्याने आतापर्यंत कथेमधील जी गंमत होती ती थोडी इथूनच कमी होण्यास सुरुवात झाली आहे. पुढे मग हळूहळू चित्रपट दिग्दर्शकाच्या हातून निसटत चालल्याचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. त्या दोघांची मलेशियाची ट्रिप तिथलं गाणं या दोन्ही गोष्टी खरोखरच कथेला पुढे नेण्यासाठी आवश्यक होत्या का असा उगाच प्रश्न पडत राहतो. कारण पुण्यातून उठून मलेशियात गेल्यामुळे कथेला त्याचा फार मोठा फायदा झाल्याचे कुठेही दिसून येत नाही. चित्रपट शेवटाकडे जाताना कथेतील पात्रांची मधुराकडे बघण्याची तिच्याशी वागण्याची अचानक बदललेली भावना खटकते (विशेषतः तिची मुलगी, सासू आणि सईचा भाऊ). बाकी शेवट इकडच्या तिकडच्या गोष्टी जुळवून आणून गोड करायचा हे तर वर्षानुवर्षे चालत आलेलं चित्रपट सृष्टीचं गिमिक आहे आणि 'बकेट लिस्ट'ही त्याला अपवाद ठरलेला नाही. शेवटसुद्धा न पटणाऱ्या 'नोट' वरच केला आहे, आपली २० वर्षाची मुलगी सहा महिन्यापूर्वी गेली आहे आणि कोणीतरी तिची 'बकेट लिस्ट' पूर्ण करतय म्हणून तिचे कुटुंबीय तिचा २१वा वाढदिवस खूप धुमधडाक्यात साजरा करत आहेत असं दाखवण्यात आलं आहे. दिग्दर्शकांना हे कसं सुचलं असेल देव जाणे. असो.
 
माधुरी हा या चित्रपटाचा सर्वात मोठा 'यूएसपी' आहे. तिची लोकप्रियता आणि तिचा या क्षेत्रातला अनुभव हा या चित्रपटाला नक्कीच यश मिळवून देईल. पण माधुरी केंद्र स्थानी असूनही हा चित्रपट तिच्यासाठी 'Larger than life' ठरलेला नाही. सुमित राघवनने पुन्हा एकदा त्याच्यातील प्रतिभा यानिमित्ताने सिद्ध केली आहे, तो जेव्हा जेव्हा माधुरी सोबत स्क्रिन शेअर करतो तेव्हा तेव्हा माधुरीचा अभिनय फिका वाटू लागतो. सुमेध मुगदळकरचा 'मांजा' बघितल्यानंतर त्याच्या कडून खूप अपेक्षा होत्या, पण या चित्रपटात मुळात त्याची व्यक्तिरेखाच मला गोंधळलेली वाटल्याने त्याच्यातील चुणूक इथे दिसली नाही. तो मधुराचा आधी एवढा राग -राग का करत असतो आणि अचानक त्याला तिच्याबद्दल आत्मियता का वाटू लागते याचे उत्तर अखेरपर्यंत मिळाले नाही. विशेष लक्षात राहतात त्या शुभा खोटे. पणजी सासू रंगवताना त्यांनी चांगलीच धमाल उडवून दिलीये. आणखी एक गमतीशीर बाब म्हणजे यात रेशम टिपणीस सुद्धा आहे आणि योगायोग असा घडलाय की रेशमच्या तोंडीचे संवाद ऐकताना आपल्याला 'बिग बॉस मराठी'चे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. बाकी वंदना गुप्ते, ईला भाटे आणि रेणुका शहाणे यांनी छान काम केलंय. दिलीप प्रभावळकर यांना मात्र चित्रपटाने वाया घालवलं असच म्हणावं लागेल.
 
तेजस देऊस्कर याचा हा अजिंक्य आणि प्रेमसूत्र नंतरचा तिसरा चित्रपट. माधुरी सारखा मोठा ब्रँड, सुमित सारखा कसलेला कलाकार अभिनेता सोबत असतानाही यावेळी देखील तेजसला दिग्दर्शनातून आपली वेगळी छाप सोडता आलेली नाही. मध्यंतरानंतरच्या पटकथेवर अधिक काम केलं असतं तर मराठीमधला एक चांगला चित्रपट आज रसिकांसमोर आला असता. चित्रपटाचा चकचकीत लूक, खुमासदार संवादातून निर्माण होणारे नैसर्गिक विनोद, चित्रपटाची मूळ संकल्पना, लंकावी मधील लोकेशन या सगळ्या गोष्टींमुळे 'बकेट लिस्ट' काही काळ तुम्हाला गुंतवून ठेऊ शकतो पण आपण त्याच्या प्रेमात पडत नाही हे मात्र नक्की. एकूणच सांगायचं झालं तर माधुरी मराठीत व्यवस्थित बोलू शकते का नाही, एखाद्या श्रीमंत घरात अजूनही स्वयंपाकाला बाई न ठेवता हृदयाचा ऑपरेशन झालेल्या सुनेकडूनच स्वयंपाक कसा करून घेतला जातो, सध्याची पिढी आपल्या पालकांशी कशी तिरकस बोलते या व यासारख्या काही गोष्टी अनुभवायच्या असतील तर 'बकेट लिस्ट' अवश्य बघा!
----
बकेट लिस्ट
माधुरी दीक्षित, सुमित राघवन, सुमेध मुगदळकर
दिग्दर्शक : तेजस देऊस्कर
दर्जा : अडीच स्टार
----
 
 
@@AUTHORINFO_V1@@