कॅनडामधील भारतीय रेस्तराँमध्ये बॉम्बस्फोट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-May-2018
Total Views |



मिसिसागा : कॅनडामधील मिसिसागा येथे असलेल्या एका भारतीय रेस्तराँमध्ये बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. दोन अज्ञात हल्लेखोरांनी हा स्फोट घडवून आणला असून १०-१५ जण या स्फोटामध्ये जखमी झाले आहेत. यातील तिघांची प्रकृती अत्यंत नाजूक असून रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मिसिसागामध्ये असलेल्या 'बॉम्बे भेल' या रेस्तराँमध्ये हा स्फोट घडला आहे. स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर कॅनडामधील भारतीय दुतावासाने तातडीने घटनेची माहिती घेत नागरिकांना मदत करण्यास सुरुवात केली आहे. कॅनडामधील भारताचे राजदूत विकास स्वरूप यांनी स्वतः या घटनेची पाहणी सुरु केली असून भारतीय दूतावास नागरिकांना अवश्य असलेली सर्व मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी देखील या प्रकरणी लक्ष घातले असून घटनेचा सविस्तर अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश भारतीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.



दरम्यान रेस्तराँमध्ये स्फोट घडवून आणलेल्या त्या दोन अज्ञात हल्लेखोरांची सीसीटीव्ही फुटेज मिसिसागा पोलिसांनी जारी केली असून त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी जारी केलेल्या त्यांच्या छायाचित्रामध्ये हे दोघेही काळ्या रंगाचे जॅकेट परिधान करून रेस्तराँमध्ये प्रवेश करत असल्याचे दिसत आहेत. पोलिसांनी त्यांच्या छायाचित्रांबरोबरच त्यांचे वर्णन देखील प्रसिद्ध केले असून हे दोघे कोठेही आढळून असल्यास त्यांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.








@@AUTHORINFO_V1@@