नाणारवरून कोकणी जनतेची सपशेल दिशाभूल : राज ठाकरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-May-2018
Total Views |



रत्नागिरी :
'नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द केलेल्यासंबंधी शिवसेनेनी केलेली घोषणा ही पूर्णपणे खोटी असून नाणार प्रकल्पावरून सेना आणि भाजप कोकणातील जनतेची सपशेल दिशाभूल करत आहे' असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केला. रत्नागिरी येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये आज ते बोलत होते.


'रत्नागिरीतील नागरिकांच्या विरोधानंतर सेनेनी 'आम्ही ती सूचना फाडून टाकली' अशी जी आवई उठवली होती, ती पूर्णपणे खोटी असून जनतेची दिशाभूल करण्यासाठी म्हणून सेनेनी हा कट रचला होता. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील नाणार संबंधीजी काही वक्तव्य अलीकडच्या काळामध्ये केलेली आहे, ती साफ खोटी असून जनतेनी या सरकारवर अजिबात विश्वास ठेवू नये' असे आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले. तसेच कोकणासारख्या नैसर्गिक साधनसंपत्ती समृद्ध असलेल्या प्रदेशात नाणारसारखा प्रकल्प हवाच कशाला ? असा प्रश्न विचारात, कोकणातील नागरिकांनी या प्रकल्पासाठी आपल्या जमिनी अजिबात देऊ नयेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

विरोधकांच्या युतीसाठी पहिला गियर माझ्याकडूनच

दरम्यान नुकत्याच कर्नाटकात कुमारस्वामी यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी जमलेल्या सर्व विरोधकांवर देखील त्यांनी यावेळी भाष्य करत, विरोधकांच्या युतीसाठी सर्वात पहिला गिअर आपणच टाकल्याचे ठाकरे यांनी यावेळी म्हटले. 'मोदी सरकारच्या तावडीतून देशाला सोडवण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यावे, असे पहिले आवाहन मी स्वतः माझ्या पाडव्याच्या भाषणामध्ये केले होते व त्यानंतरच सर्व विरोधकांनी एकत्र येण्यास सुरुवात केली असून याचे पहिले श्रेय हे मनसेला जाते', असे त्यांनी यावेळी म्हटले. .


गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे रत्नागिरी आणि आसपासच्या प्रदेशाच्या दौऱ्यावर आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या अनेक पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची ते गेल्या काही दिवसांपासून भेटी घेत आहेत. आज देखील रत्नागिरी येथील कोकण कृषी मंच आणि येथील जवळच्या गावांमधील मनसे पदाधिकाऱ्यांची आज त्यांनी भेट घेतली. या भेटी दरम्यानच त्यांनी पत्रकारांशी देखील संबंध साधला होता.
@@AUTHORINFO_V1@@