कुमारस्वामी सरकार किती काळ टिकणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-May-2018
Total Views |
 
 
 
कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून जनता दल सेक्युलर (जदसे) आणि कॉंग्रेस आघाडीचे नेते कुमारस्वामी यांनी बुधवारी शपथ घेतली. कुमारस्वामी यांच्यासोबत कॉंग्रेसचे अध्यक्ष जी. परमेश्वरन्‌ यांचाही उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. गुरुवारी विधानसभेत बहुमत सिद्ध केल्यानंतर कुमारस्वामी मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप होणार आहे. मंत्रिमंडळात कॉंग्रेसचे 22 तर जदसेचे 12 मंत्री राहणार आहेत. मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या दोन्ही पक्षांनी संख्याबळानुसार ठरवली असल्याचे दिसते. विधानसभेत कॉंग्रेसचे 78 तर जदसेचे 38 सदस्य आहेत. स्वत: मुख्यमंत्री कुमारस्वामी दोन विधानसभा मतदारसंघांतून विजयी झाल्यामुळे तसेच त्यांना एका ठिकाणचा राजीनामा द्यावा लागणार असल्यामुळे जदसेचे संख्याबळ 37 राहते.
 
 
राज्यातील कुमारस्वामी यांचे आघाडी सरकार किती काळ टिकणार, असा प्रश्न राज्यातील जनतेलाच नाही, तर त्यांना स्वत:लाही पडला आहे! त्यामुळे आघाडी सरकार पाच वर्षे टिकवणे आणि चालवणे हे माझ्यासमोरचे सर्वात मोठे आव्हान असल्याची कबुली कुमारस्वामी यांनी दिली आहे. मुख्यमंत्री म्हणून माझी जबाबदारी सहजपणे पार पाडता येईल, असे मला वाटत नाही, मलाच नाही तर राज्यातील जनतेलाही तसे वाटत आहे, असे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. याचाच अर्थ, कॉंग्रेस कधीही आपल्या सरकारचा पाठिंबा काढून घेईल, याची त्यांच्या मनात धास्ती आहे. कर्नाटकात कॉंग्रेस आणि जदसे यांनी सरकार स्थापन करण्यासाठी एकत्र येणे म्हणजे एकमेकांवर प्रेम नसताना लग्न करण्यासारखे आहे.
 
 
एकमेकांवर प्रेम आणि एकमेकांबद्दल विश्वास असेल तरच कोणतेही लग्न टिकत असते, या दोन्ही गोष्टी नसतील तर घटस्फोट अपरिहार्य असतो. भाजपाने जदसेला सरकार स्थापन करण्यासाठी जवळ घेऊ नये म्हणून कॉंग्रेसने जदसेला सरकार बनवण्यासाठी पाठिंबा देऊन टाकला. सोप्या शब्दांत सांगायचे, तर जदसेचे लग्न भाजपासोबत होऊ नये म्हणून कॉंग्रेसने स्वत:च जदसेसोबत घाईगर्दीने लग्न करून टाकले. त्यामुळे जदसे आणि कॉंग्रेस आघाडीचे सत्तेसाठी झालेले लग्न किती काळ टिकेल, असा प्रश्न त्यांच्या लग्नाआधीपासूनच सर्वांनाच काय, पण मुख्यमंत्र्यांनाही पडला आहे! राहुल गांधी यांनी कॉंग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून त्यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसचा झालेला हा सलग सहावा पराभव आहे. गुजरात, हिमाचलप्रदेश, नागालॅण्ड, त्रिपुरा, मेघालय आणि कर्नाटकमध्ये कॉंग्रेसचा पराभव झाला आहे. कॉंग्रेस फक्त आता देशातील पंजाब आणि पुडुचेरी या दोन राज्यांतच उरली आहे. ज्या राहुल गांधींनी आपल्या पक्षाच्या पंतप्रधानांची, म्हणजे डॉ. मनमोहनिंसग यांच्या सरकारचा एक अध्यादेश पत्रपरिषदेत जाहीरपणे फाडत बेइज्जती करायला मागेपुढे पाहिले नव्हते, त्यांना कुमारस्वामी सरकारचा पाठिंबा काढायला कोणतेही क्षुल्लक कारण पुरेसे आहे.
 
 
कर्नाटकात राहुल गांधी यांनी धुंवाधार प्रचार केला. पण, कॉंग्रेस 122 वरून 78 वर आली. तर मोदींनी कमी सभा घेतल्या तरी भाजपा 40 वरून 104 वर गेली. भाजपाच्या मतांच्या टक्केवारीतही लक्षणीय वाढ झाली. 2013 मध्ये भाजपाला 20 टक्के मते मिळाली होती, तर 2018 मध्ये 36.2 टक्के.
 
कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि जनता दल सेक्युलर हे दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध दंड थोपटून उभे होते. एकमेकांवर हल्ले चढवत होते. जनता दल सेक्युलर ही भाजपाची बी टीम असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला होता, तर याला प्रत्युत्तर म्हणून कॉंग्रेस निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन करत असल्याचा आरोप जनता दल सेक्युलरने निवडणूक प्रचाराच्या काळात केला होता. नुसता आरोप करून जनता दल सेक्युलर थांबला नाही, तर त्याने मुख्य निवडणूक आयुक्तांना एक निवेदनही दिले होते. एकमेकावर आरोप-प्रत्यारोप करण्यात या दोन्ही पक्षांनी कोणतीच कसर सोडली नव्हती. त्यामुळेच माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दूरध्वनी करताना, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आधी देवेगौडा यांची माफी मागावी लागली आणि नंतर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्या लागल्या.
 
मुळात देवेगौडा यांचा कॉंग्रेसबद्दलचा अनुभव काही फार चांगला नाही. 1996 च्या लोकसभा निवडणुकीनंतर कोणत्याच पक्षाला जेव्हा स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते आणि भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता, तेव्हा कॉंग्रेसने जनता दलाला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिला होता. जनता दलाने कर्नाटकचे मुख्यमंत्री असलेल्या एच. डी. देवेगौडा यांची पंतप्रधान म्हणून निवड केली. कॉंग्रेसच्या पाठिंब्याने देवेगौडा पंतप्रधानही झाले, पण दहा महिन्यांतच कॉंग्रेसने देवेगौडा सरकारचा पाठिंबा काढून घेतला. कॉंग्रेसने आपल्या सरकारचा पाठिंबा का काढला, याचे उत्तर देवेगौडा यांना आतापर्यंत मिळाले नाही! त्यामुळे आपल्या मुलाचा म्हणजे कुमारस्वामी सरकारचा पाठिंबा कॉंग्रेस किती दिवस कायम ठेवणार, हा प्रश्न देवेगौडा यांना सतावत आहे.
 
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे कधीकाळी जनता दल सेक्युलरमध्ये होते आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे निकटवर्ती अशी त्यांची ओेळख होती. आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात लोकदलापासून करणार्‍या सिद्धरामय्या यांनी नंतर जनता दलात प्रवेश केला. जनता दलातर्फे त्यांना मंत्रिपद तसेच उपमुख्यमंत्रिपदही मिळाले. जनता दलात फूट पडल्यानंतर सिद्धरामय्या, एच. डी. देवेगौडा यांच्यासोबत गेले. जनता दल सेक्युलरमध्ये असताना सिद्धरामय्या यांच्याकडे, देवेगौडा यांचे राजकीय उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात होत. पण, देवेगौडा यांनी आपल्या मुलाला म्हणजे कुमारस्वामी यांना आपला उत्तराधिकारी घोषित केल्यावर सिद्धरामय्या यांचे देवेगौडा आणि कुमारस्वामी यांच्याशी फार काळ जमले नाही. त्यामुळे त्यांनी जनता दलातून बाहेर पडत ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह जनता दलाची स्थापना केली.
 
सिद्धरामय्या यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत आपला पक्ष त्यात विलीन केला. ज्या कुमारस्वामी यांच्यासाठी सिद्धरामय्या यांनी जनता दल सेक्युलरचा राजीनामा दिला, त्यांचीच मुख्यमंत्रिपदाची पालखी उचलण्याची वेळ आता सिद्धरामय्या यांच्यावर त्यांच्या पक्षाने आणली आहे! त्यामुळेच सरकार पाच वर्षे टिकवणे हे माझ्यासमोरचे सर्वात मोठे आव्हान असल्याचे कुमारस्वामी म्हणत आहेत. कारण त्यांना कॉंग्रेस पक्षातूनही सिद्धरामय्या यांच्यासारख्या छुप्या विरोधकांचा सामना करावा लागणार आहे.
 
देवेगौडा यांच्यासारखाच विश्वासघात कॉंग्रेसने कुमारस्वामी यांचाही केला आहे. कॉंग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन करण्याची कुमारस्वामी यांची ही पहिलीच वेळ नाही. 2004 मध्येही कुमारस्वामी यांनी कॉंग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन केले होते. पण, कॉंग्रेसने कुमारस्वामी यांच्या पक्षाचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कुमारस्वामी यांनी कॉंग्रेससोबतचे सरकार तोडून भाजपाच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. करारानुसार 20 महिने पूर्ण झाल्यानंतर कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रिपद भाजपाचे येदियुरप्पा यांच्याकडे सोपवायचे होते. पण, त्याला कुमारस्वामी यांनी टाळाटाळ केली, नंतर कसेतरी मुख्यमंत्रिपद सोपवले, पण विधानसभेत बहुमत सिद्ध करताना भाजपाला पाठिंबा द्यायचे नाकारले. त्यामुळे येदियुरप्पा यांचे सरकर पडले. पण, या घटनेतून भाजपाला जनतेची मोठी सहानुभूती मिळाली आणि 2008 च्या निवडणुकीत भाजपाने 110 जागा जिंकत स्वबळावर सरकार स्थापन केले.
 
 
भाजपाच्या विरोधात आज दोन विश्वासघातकी सत्तेच्या लोभाने एकत्र आले आहेत, त्यामुळे भाजपाला फार काळ काळजी करायची गरज नाही, कॉंग्रेस आणि कुमारस्वामी सत्तेसाठी एकत्र आले असले, तरी ते फार काळ एकत्र राहणार नाहीत, एकदुसर्‍याचा विश्वासघात करण्याची संधी ते पाहात राहतील आणि जशी संधी मिळेल आपल्या हाताने आपले सरकार पाडतील! भाजपाने तोपर्यंत संयमाने काम घ्यावे, जबाबदार विरोधी पक्ष म्हणून भूमिका पार पाडावी, दोन बोक्यांच्या भांडणात सत्तेचा गोळा आज नाही तर उद्या भाजपालाच मिळणार आहे...
 
श्यामकांत जहागीरदार
9881717817
@@AUTHORINFO_V1@@