धनंजय गावडेच्या तारणहारांना निवडून देणार का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-May-2018
Total Views |



धनंजय गावडे हा नगरसेवक म्हणून निवडून आलेला, पण प्रत्यक्षात ‘नगरभक्षक’ असलेला गावगुंड या खंडणीखोरांच्या टोळीचा म्होरक्या आणि त्यांचे तारणहार ‘वांद्रे महाला’त बसून टक्केवारी घेत बसलेले सेनापती. म्हणूनच वांद्य्राच्या या सेनापतींना गावडेचा बचाव करायला नेहमीच पुढे यावे लागते.

धनंजय गावडे हा शिवसेनेचा वसई-विरार महापालिकेतील नगरसेवक. नोटाबंदीच्या काळात कोट्यवधी रुपये गावडेच्या गाडीत सापडले. हा सगळा काळा पैसा, ज्यामुळे त्याची नंतर चौकशीही करण्यात आली. पण, या चौकशीत सापडलेल्या त्याच्या बेहिशेबी संपत्तीचे हिशेब अजूनही लागता लागत नाहीत, यावरुनच त्याचे काळे साम्राज्य किती प्रचंड असेल, याची कल्पना यावी. दरम्यानच्या काळात गावडेच्या काळ्या धंद्यांमुळे त्याच्याविरोधात आरटीआय कार्यकर्ते, पोलीस अशा कितीतरी मंडळींनी जंग जंग पछाडले. निरनिराळ्या वृत्तपत्रांनी त्याच्या पैसे उकळण्याच्या धंद्याविरोधात बातम्याही छापल्या. लोकांच्या मनात त्याच्याविरोधात आगडोंब उसळला, वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपही केले गेले. शेवटी स्थानिक आमदारांना त्याविरोधात विधानसभेत प्रश्‍न विचारावा लागला. त्यानंतर शिवसेनेने त्याला निलंबित केले. तोपर्यंत शिवसेनेने या इसमाविरोधात कोणतीही कारवाई करण्याचे धैर्य दाखवले नव्हते. पालघर, वसई-विरारमधल्या शिवसेनेच्या वाघरांना अशीच सावज हेरून पैसा उकळण्याची चटक लागल्याचे त्यांच्या बर्‍यावाईट धंद्यांवरून दिसते. शहरात कोणतेही बांधकाम असो, सेनेच्या वाघरांची वखवखलेली नजर नेहमीच सावजाच्या शोधात असते. एखाद्या बांधकामाला अनधिकृत ठरवायचे, त्याविरोधात आरटीआयअंतर्गत अर्ज दाखल करायचे आणि ’बांधकाम अधिकृत करून देतो,’ असे म्हणत सर्वसामान्य लोकांकडून, बिल्डर्सकडून लाखो रुपयांची खंडणी उकळायची, हाच सेनेच्या गावगुंडांचा धंदा. धनंजय गावडे हा नगरसेवक म्हणून निवडून आलेला, पण प्रत्यक्षात ‘नगरभक्षक’ असलेला गावगुंड या खंडणीखोरांच्या टोळीचा म्होरक्या आणि त्यांचे तारणहार ‘वांद्रे महाला’त बसून टक्केवारी घेत बसलेले सेनापती. म्हणूनच वांद्य्राच्या या सेनापतींना गावडेचा बचाव करायला नेहमीच पुढे यावे लागते. मुंबई महापालिकेवर 25 वर्षांपासून डल्ला मारून बसलेल्या सेनापतींची भूक तिथल्या मलिद्यावर भागेना, तेव्हा त्यांना आपले तोंड मुंबईजवळच्या भागांकडेही वळवावे लागले. कदाचित याच वळवलेल्या तोंडातून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना खंडणीखोरीचे आदेश दिले असावेत अन् ते झेलण्यासाठी सदैव तयार असलेल्या गुलामांनी त्याबरहुकूम कामाला सुरुवात करत आपल्या व आपल्या सेनापतीच्या तुंबड्या भरण्याचे उद्योग सुरू केले. म्हणजेच एकीकडे सर्वसामान्यांच्या नावाने कळवळा आल्याचे, दीनदुबळ्यांचे कैवारी असल्याचे नाटक वठवायचे आणि प्रत्यक्षात खरे काम वेगळेच करायचे, असा यांचा डबलढोलकी धंदा. परिणामी, नोटाबंदीच्या काळातही जेव्हा देशभरातल्या काळे पैसेवाल्यांवर धाडी पडत होत्या, तेव्हाही वसईतल्या गावगुंडाकडे कोट्यवधी रुपयांच्या नोटा सापडल्याचे प्रसिद्ध झाले. आता याच खंडणीखोरांच्या तारणहारांनी आपली पावले पालघरकडे वळवली. यामागे नक्कीच भोळ्याभाबड्या वनवासी समाजाला फसवून ओरबाडण्याचाच डाव असणार. म्हणूनच मित्राच्या पाठीत खंजीर खुपसत इथे उमेदवार उभा करण्यापर्यंत शिवसेनेने मजल मारली. पण, सर्वसामान्य मतदारांना त्यांचे खरे रूप चांगलेच ठाऊक असल्याने ते खंडणीखोरांच्या बाजूने उभे राहण्याची सुतराम शक्यता नाही, तर ही सर्वसामान्य जनता या खंडणीखोरांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठीच मतदानाला बाहेर पडेल, हेही नक्की.
@@AUTHORINFO_V1@@