कदाचित 'हे' पाहून सावरकरही थक्क झाले असते...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
 
 
 
दोन दिवसांपूर्वी बऱ्याच कालावधीनंतर आमचं कुटुंब एकत्र आलं होतं. त्यात मावशी, मामा, काका, काकू, आजी, आजोबा आणि त्यांची मुलं व नातवंडांचा समावेश होता. आधी बराच वेळ कौटुंबिक गप्पा झाल्या, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मग जेवणानंतर गप्पा चालू असतानाच आमच्या पिढीतील पोरा-पोरींचे लक्ष जरा 'डायव्हर्ट' होऊन ते स्मार्टफोन मध्ये गुंतू लागले. मग काय बहुतांश वेळा ऐकायला मिळणारा संवाद इथेही कानावर पडलाच. काकू मोठ्याने म्हणाली या व्हॉटस अॅप, फेसबूकपाई आजची पिढी वाया गेली आहे. चारचौघात बसलो तरी त्यांचं 'माणसांकडे' कमी आणि फोनमध्ये जास्त लक्ष असतं. एवढं असतं तरी काय त्याच्यावर कोणास ठाऊक...''
 
माझ्या पिढीतल्या काहींनी हे वाक्य ऐकून दुर्लक्ष केलं आणि पुन्हा स्वतःला 'स्मार्ट फोन' मध्ये 'एंगेज्ड' करून घेतलं. पण मला ते थोडं खटकलंच. कारण प्रत्येक वेळी आम्ही सोशल मीडियावर टाईमपास करण्यासाठी जात नसतो. बऱ्याचदा त्याचा फायदाही होते. काही वेळा यामुळे नवीन उपक्रमही कळतात. तर मी मनात ठरवलंच की आज एखाद उदाहरण देऊन घरच्यांना पटवूनच देऊ की सोशल मीडियावर चांगल्या गोष्टीही पाहायला मिळतात. मी त्यावेळी 'मी सावरकर' या युट्यूब चॅनेलवरील काही व्हिडिओ पाहत होतो. मी ते व्हिडिओ घरच्यांना दाखवले ते बघितल्या नंतर घरचे अवाक झाले आणि आजीची प्रतिक्रियातर खूपच लक्षात राहणारी होती. ती म्हणाली, ''आज स्वातंत्र्यवीर सावरकर असते तर ते देखील हे व्हिडिओ बघून थक्क झाले असते, त्यानांही आजच्या पिढीचा अभिमान वाटला असता''
 
आता वरचे दोन परिच्छेद वाचल्यावर तुमच्यातही उत्सुकता निर्माण झालीच असेल की नेमके हे व्हिडिओ कसले होते, की जे बघून खुद्द सावरकरही थक्क झाले असते. तर हे व्हिडिओ होते एका स्पर्धेतील सहा विजेत्यांचे, विजेत्यांमध्ये विविध वयोगटातील चार महिला व तीन पुरुष होते. थोडं या अनोख्या स्पर्धेविषयी जाणून घेणं यानिमित्ताने अत्यंत गरजेचे आहे असं मला वाटतं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १३५ वी जयंती येत्या २८ मे रोजी संपन्न होत आहे. त्यानिमित्त स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट, हिंदू हेल्पलाईन आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांचे विद्यमाने भारतीय नागरिकांसाठी एक मोठी वक्तृत्वस्पर्धा आयोजित केली होती. या वक्तृत्व स्पर्धेसाठी अबाल वृद्धांसाठी सहा वयोगट केले होते. तसेच सावरकरांच्या विविध गुणांच्या पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी सहा विषय दिले होते. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी व्हॉटस अॅपचा वापर करून भाषणाच्या प्रवेशिका ऑडिओ - व्हिडिओ स्वरूपात स्वीकारल्या होत्या. स्पर्धेसाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही माध्यमातील भाषणांना अनुमतीदिलेली होती. तसेच परदेशस्थ अनिवासी भारतीयांसाठी देखील ही स्पर्धा खुली होती. स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी आकारण्यात आली नाही.
 

 
नेटिझन्सचा उत्स्फूर्त प्रतिसाद
आनंदाची गोष्ट म्हणजे या स्पर्धेला सर्वच गटातून अत्यंत उत्साहवर्धक आणि भरभरून प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातून स्पर्धक या उपक्रमाला दाद देतील याची खात्री होतीच पण त्याशिवाय इतर राज्ये आणि विशेष म्हणजे थायलंड, अमेरिका येथून आलेल्या प्रवेशिका पाहून आयोजकांनाही आश्चर्य वाटलं. एकूण ३२१ स्पर्धक यास्पर्धेत सहभागी झाले. सर्व विषयांवर सर्व वयोगटातून स्पर्धेसाठी प्रवेशिका आल्या हे उल्लेखनीय. या स्पर्धेच्या निमित्ताने आणखी एक वैशिट्यपूर्ण बाब नमूद करावीशी वाटते आणि ती म्हणजे यामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या संख्येपैकी तब्बल ६४ टक्के स्पर्धक या महिला होत्या.
 
अशी होती स्पर्धा
द्रष्टे सावरकर, योद्धा सावरकर, समाज सुधारक सावरकर, हिंदुत्ववादी सावरकर, विज्ञाननिष्ठ सावरकर, साहित्यिक सावरकर या सहा विषयांवर वक्तृत्व करण्याची स्पर्धकांना मुभा होती. स्पर्धा अधिक पारदर्शी व्हावी यासाठी इयत्ता ५ – ८, इयत्ता ९ – १२, महाविद्यालयीन विद्यार्थी, वय वर्षे २२ ते ४५, वय वर्षे ४५ ते ६०, वय वर्षे ६० आणि पुढे असे सहा वेगळे ग्रुप करण्यात आले होते. स्पर्धेसाठी शरद पोंक्षे, नितीन भारद्वाज, राहुल सोलापूरकर, प्रवीण जाधव, प्रवीण तरडे, योगेश सोमण, श्रीरंग गोडबोले यांच्यासारखे नावाजलेल्या कलाकारांनी या स्पर्धेचे परीक्षण करून त्यातून अंतिम सहा विजेत्यांची निवड केली आहे.
 
 
'हे' ठरले विजेते
या स्पर्धेला सर्वस्तरातून चांगला प्रतिसाद मिळाला. प्रत्येकानेच सावरकरांबद्दलचे भारावून टाकणारे विचार सादर करण्याचा कसोशीने प्रयत्न केला त्यामुळे यातील अंतिम विजेत्यांची निवड करताना परीक्षकांना अधिक कष्ट घ्यावे लागले. अंतिम सहा विजेत्यांबरोबरच प्रत्येक गटात उपविजेते, उत्तेजनार्थ अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. वर उल्लेख केल्याप्रमाणे जे व्हिडिओ बघून जे विचार ऐकून थक्क व्हायला होतं ते अंतिम सहा विजेत्यांचे व्हिडिओ तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून बघू शकता.
 
 
 

ओजस अमोघ जोशी

 
 स्वप्नजा शरदराव वालवडकर
 
 स्वरदा चंद्रशेखर फडणीस
 
 हेमांगिनी जावडेकर
 
 अभिजित फडणीस
 
 
 विनय वसंत वाटवे
 
पारितोषिक वितरण समारंभ
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ येत्या रविवारी २७ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता फर्ग्युसन महाविद्यालयाच्या 'अँफी थिएटर'मध्ये रंगणार आहे. स्वा. सावरकर हे यामहाविद्यालयाचे माजी विद्यार्थी त्यामुळे ही बाब औचित्य पूर्ण आहे. सभेसाठी मा. खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित राहणार आहेत तर अध्यक्षपद डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे भूषविणार आहेत. 'राष्ट्रभक्त वीर सावरकर' ह्या विषयावर डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी ह्यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमात यशस्वी स्पर्धकांचे वक्तृव देखील सादर होणार आहे.

 
 
असा होईल विजेत्यांचा गौरव
स्पर्धेतील विजेत्यांसाठी प्रत्येक गटात प्रथम क्रमांकाचे बक्षीस रुपये दहा हजार, दुसऱ्या क्रमांकाचे रुपये पाच हजार आणि एक हजाराची पाच उत्तेजनार्थ बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. उपरोक्त बक्षिसांखेरीज सहा गटातील सहा प्रथम क्रमांकाचे स्पर्धकांमधून एक सर्वोत्तम विजेता निवडण्यात येणार आहे आणि सदर स्पर्धकाला अंदमानचे पर्यटन पुरस्कृत करीत आहोत. कॅप्टन निलेश गायकवाड पुरस्कृत एका विजेत्यास अंदमान येथे फेब्रुवारी २०१९ मधे आपले वक्तृत्व सादर करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. सर्व स्पर्धकांना सावरकरांचे माझी जन्मठेप हे ऑडिओ पुस्तक भेट दिले जाणार आहे. या स्पर्धेसंदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही www.MeSavarkar.com या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
 
गेल्या काही दिवसांपासून संगीतकार सलील कुलकर्णी यांनी अशाच प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतलेली 'अभिजात' ही स्पर्धा अतिशय लोकप्रिय ठरत आहे. त्यांनतर आता 'मी सावरकर-२०१८'ला मिळालेले यश पाहता किमान काही टक्के तरी सोशल मीडियाचा चांगल्या प्रकारे वापर होत आहे असं म्हणायला हरकत नाही. असे अनेक चांगले उपक्रम आपल्या आजूबाजूला घडत असतात 'अभिजात' व 'मी सावरकर' ही केवळ उदाहरणादाखल सांगितलेली नावं आहेत. हे सांगण्यामागचा उद्देश केवळ एवढाच की प्रत्येक नाण्याला दोन बाजू या असतातच त्या आधीच्या पिढीतही होत्या आणि अत्ताच्याही आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरून अशा पद्धतीचे 'लपून राहिलेले टॅलेंट' बाहेर पडत असेल तर या माध्यमाला व अशा उपक्रमांना आपण साथ दिलीच पाहिजे..! जग कितीही हायटेक झालं तरीही एखाद्या महापुरुषांचे विचार नष्ट होणार नाहीत किंबहुना त्या विचारांचा, संस्कारांचा अधिकाधिक प्रसार होण्यासाठी सोशल मीडिया हेच जास्त प्रभावी माध्यम ठरेल.
----
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@