अशी दगाबाजी म्हणजे केवळ अस्तित्व टिकविण्यासाठीचीच शिवसेनेची धडपड : रवींद्र चव्हाण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 

भारतीय जनता पक्षाचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी दि. २८ मे रोजी मतदान पार पडेल. ही जरी पोटनिवडणूक असली तरी अनेक कारणांमुळे ती सर्वपक्षीय प्रतिष्ठेचा विषय ठरत आहे. एकीकडे उमेदवारीची चर्चा सुरू असतानाच पाठीत खंजीर खुपसत वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने दिलेली उमेदवारी असेल किंवा बहुजन विकास आघाडीनेही ऐनवेळी रिंगणात उतरविलेला आपला उमेदवार असेल, अशा अनेक कारणास्तव ही पोटनिवडणूक चांगलीच गाजत आहे. तेव्हा, या पोटनिवडणुकीसंदर्भात भाजप नेते आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची दै. ‘मुंबई तरुण भारतने घेतलेली ही खास मुलाखत.
 

पालघर जिल्ह्यातील भाजपच्या एकूणच स्थितीविषयी काय सांगाल?

पूर्वीच्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नव्याने निर्माण झालेला असा हा पालघर जिल्हा. सागरी, डोंगरी आणि शहरी अशा तिन्ही भौगोलिक परिस्थितीची देण या जिल्ह्याला लाभली आहे. राजकीयदृष्ट्या विचार केला तर या जिल्ह्यात भाजपची स्थिती ही अतिशय चांगली आहे. केवळ आणि केवळ विकास हेच ध्येय डोळ्यापुढे ठेवून राजकारण करणारा पक्ष अशी भाजपची ख्याती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील विकासाभिमुख निर्णय घेत नागरिकांच्या मनात आपलं एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. त्यातच चिंतामण वनगा यांच्या नेतृत्वामुळे जिल्ह्यातील वनवासी भागांमध्येच नाही, तर वसई, नालासोपारा, विरार असेल किंवा डहाणू, पालघर अशा शहरी भागांमध्ये भाजपचा जोर वाढण्यास नक्कीच मदत झाली आहे. गेल्या निवडणुकीतही वनगा यांना मोठ्या फरकाने निवडणूक जिंकता आली होती. याचाच अर्थ पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि वनगा यांना मानणारा आणि त्यांच्या विकासाभिमुख निर्णयांचा आदर करणारा, असा वर्ग त्या ठिकाणी निर्माण झाला आहे. त्यामुळे खात्रीपूर्वक सांगता येऊ शकतं की, भारतीय जनता पक्षाची स्थिती ही अतिशय उत्तमच आहे.

पालघर जिल्ह्यात बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व आहे, असं म्हटलं जातं. पण, लोकसभा निवडणूक लढवण्याइतकी त्यांची ताकद आहे का?

पालघरमध्ये कोणाचा प्रभाव आहे किंवा नाही याबाबत मी काही सांगू शकत नाही. वसई-विरार महानगरपालिकेचा विचार केला तर नालासोपारा असेल किंवा वसई-विरारसारखे भाग असतील या ठिकाणी बहुजन विकास आघाडीला मिळणारा प्रतिसाद हा चांगला आहे, हे नाकारता येणार नाही, परंतु त्यांचा प्रभाव हा केवळ महानगरपालिकेच्या निवडणुकांपुरताच मर्यादित आहे. त्यांचं स्थानिक नेतृत्व म्हणा किंवा लोकांच्या मनात निर्माण केलेली भीती यामुळे तिकडचा मतदार हा पर्याय म्हणून त्यांच्याचकडे पाहतोय. ही वस्तुस्थिती आहे. लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका यांचा विचार केला तर दोन्ही निवडणुकांमध्ये जमीन- आसमानाचा फरक आहे. मतदार राजा हा अतिशय समजूतदार आहे. केंद्रातील आपल्या विषयांना न्याय मिळवून द्यायचा असेल, तर भाजपलाच मतदान करण्याची या ठिकाणच्या मतदारांची मानसिकता नक्कीच दिसून येते. त्यामुळे कोणताही पक्ष समोर उभा ठाकलेला असो, भाजपला नक्कीच चिंतामण वनगा यांच्या विजयातून यश मिळत आलं आहे आणि यापुढेही पक्षाला या ठिकाणी यशप्राप्ती होईल, असा मला विश्वास वाटतो.

श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विवेक पंडित यांनीदेखील भाजपला आपला पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या भूमिकेचा फायदा भाजपला होऊ शकतो का?

नक्कीच. श्रमजीवी संघटना ही गेली अनेक वर्ष वनवासी भागांमध्ये आपल्या वनवासी बांधवांच्या समस्या सोडविण्याचं काम करत आहे. मग कोणतंही सरकार असो, विवेक पंडित यांच्या नेतृत्त्वात वनवासी बांधवांचे प्रश्न सरकारदरबारी पोटतिडकीने मांडण्याचे आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम श्रमजीवी संघटना करत आली आहे. श्रमजीवीसारख्या अतिशय मोठ्या संघटनेचाही पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वावरचा जो विश्वास आहे, तो या निमित्ताने दिसून येतो आणि त्या ठिकाणचे जे अनेक प्रलंबित प्रश्न होते, तेदेखील सोडविण्याचे काम खुद्द मुख्यमंत्रीच करत आहेत. वनवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचं कामदेखील ते करीत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास नक्कीच वाढला आहे. म्हणूनच श्रमजीवीने आपली संपूर्ण ताकद भारतीय जनता पक्षाच्या पाठिशी लावली आहे. त्यामुळे या निवडणुकीत याचा नक्कीच फायदा भाजपला होईल.

गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात माकपला मोठ्या प्रमाणात मतं मिळाली होती आणि काँग्रेसलाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. पण, यंदाही माकप आणि काँग्रेसचा हा प्रभाव मतपेटीत दिसून येईल का?

विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल किंवा अन्य कोणतीही निवडणूक असेल, एखाद्या विशिष्ट पक्षाला मानणारा मतदार हा असतोच. सर्वच पक्ष आपापल्या भागात आपापल्यापरीने काम करतच आहेत. त्यामुळे त्या त्या पक्षांना होणारं मतदान किंवा त्यांना मिळणारा प्रतिसाद हा नाकारता येणार नाही. ही पोटनिवडणूक आहे आणि विविध पक्षीय नेत्यांना आमच्या बाजूने, विकासाच्या दृष्टीने वळवण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न राहील. पालघरमध्ये सद्यस्थितीत ज्या समस्या आहेत, त्या सोडविण्याचे प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकारच्या स्तरावर सुरू आहेत आणि हीच बाब आम्ही इतर पक्षीय नेत्यांना पटवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. काही नेत्यांना हे पटवून देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत आणि त्यांच्यासोबत असणारी मतंही भाजपच्याच पारड्यात पडतील, अशी आम्हाला खात्री आहे.

भाजप आणि शिवसेना यांच्यात बोलणी सुरू असतानाही शिवसेनेने अचानक चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी जाहीर केली. मुख्यमंत्र्यांनीही प्रचारसभेत शिवसेनेच्या या खेळीवर टीका केली. याबाबत काय सांगाल?

यासंदर्भात मी एक कार्यकर्ता म्हणून आपलं मत व्यक्त करतो. अशाप्रकारे शिवसेनेने खेळी करून अतिशय चुकीचं काम केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमीच सर्वांना सांभाळून घेत आणि एकत्र घेऊन काम करणारे व्यक्तिमत्त्व आहे. याबद्दल एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने काम करायला सुरुवात केली. अनेक घटकपक्ष एकत्र असताना अनंत अडचणी येत होत्या. परंतु, अटलजींनी अतिशय सुयोग्य पद्धतीने परिस्थिती हाताळत सरकार यशस्वीरित्या चालवून दाखवलं. प्रभावीपणे काम करत असतानाही त्यांच्या कामात खो घालण्याचं काम अनेक घटकपक्ष त्यावेळीही करत होते. तसंच काहीसं या ठिकाणीही वाटतं. जेव्हा आमची सत्ता आली त्यावेळी शिवसेनेसारखा पक्ष आमच्यासोबत आला. अन्य घटक पक्ष भाजपला आजही उत्तम प्रकारे भाजपला साथ देत आहेत. आज अनेक पक्षातील अनेक नेते मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाला मानत आहेत. त्यामुळे कुठेतरी आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल, या भितीने सध्या शिवसेनेची धडपड सुरू आहे आणि याच भीतीपोटी त्यांनी उचललेलं हे पाऊल आहे, असं मला वाटतं.

या पोटनिवडणुकीला नियमित निवडणुकीपेक्षाही जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. याला काही विशिष्ट गोष्टी कारणीभूत आहेत का?

शिवसेना हा पक्ष सोडला तर इतर अन्य पक्षांच्या मनात ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशीच धारणा होती परंतु, अशाप्रकारे चाल खेळून शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं आहे. पूर्वीचा इतिहास पाहिला तर भाजपने घोडा यांच्या निधनानंतर आपला उमेदवार न देता युती धर्म पाळला होता. आणखी एक उदाहरण घेतलं तर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटल्या जाणार्‍या वांद्रेमातोश्रीपरिसरातील नेते बाळा सावंत यांच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी त्यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलं होते. त्यावेळीही शिवसेनेच्या पाठिशी भारतीय जनता पक्ष खंबीरपणे उभा राहिला होता. त्यामुळे त्यांना मोठं यश मिळालं होतं. आता मुंबई महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीतही भाजपने शिवसेनेला साथ देत आपला उमेदवार उभा केला नव्हता. पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनीही शिवसेनेचीच साथ दिली होती आणि त्यात त्यांना यशही मिळालं होतं. अनेकदा भाजपने युती धर्म असेल किंवा आपला मित्रधर्म पाळण्याचा प्रयत्न केला. परंतु, शिवसेनेच्या काही नेत्यांनी दगाफटका करण्याचं सत्र सुरू केलं. आता आम्हालाही त्याची सवय होत चालली आहे. त्यामुळे येणार्‍या काळात शिवसेनेला गृहीत धरूनच रणनीती आखणं आणि काम करणं यापुढच्या काळात अपेक्षित आहे.

कर्नाटकातील निकाल आणि त्यानंतर उद्भवलेल्या एकूणच परिस्थितीचा परिणाम पालघरच्या निवडणुकीत दिसून येईल, असे वाटते का?

कर्नाटकात अशी परिस्थिती का उद्भवली किंवा काय झालं, यात खोलवर मी जाणार नाही. त्या ठिकाणी सर्वाधिक आमदार हे भारतीय जनता पक्षाचेच होते. याचा अर्थ जनतेचा कौल हा भाजपच्याच बाजूने होता, ही वस्तुस्थिती आहे. हे यश आणि सत्ता यात फार मोठा फरक आहे. सत्तेत असलेल्या दोन नेत्यांनी घेतलेला निर्णय हा वेगळा आहे आणि कर्नाटकच्या जनतेने दिलेला जो कौल आहे, तो भाजपच्या बाजूने आहे. मतदार हा सुज्ञ आहे आणि तशाच प्रकारचा कौल भाजपच्या बाजूने या निवडणुकीतही लागेल, यात काही शंका नाही.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, खा. मनोज तिवारी हेदेखील प्रचारसभेत सहभागी होणार आहेत. याचा फायदा भाजपला होईल का?

हिंदुत्वाच्या विचारधारेला धरून चालणार्‍या व्यक्तिमत्त्वाच्या स्वरूपात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे पाहिले जाते. एखाद्या विषयाची अगदी वेगळ्याप्रकारे मांडणी करण्याचे कौशल्यदेखील त्यांच्यात आहे. त्यांच्या विषयाची मांडणी ही एवढी उत्कृष्ट असते की, त्यांचा एक मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे आणि हा केवळ उत्तर प्रदेशातच नाही, तर संपूर्ण देशात निर्माण झाला आहे. जो देशाला, राष्ट्राला प्रथम प्राधान्य देतो अशा व्यक्तींमध्ये योगी आदित्यनाथ हे अतिशय लोकप्रिय आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या कोणत्याही भाषणाकडे पाहिलं तर देशाला समर्पित जीवन काय असतं याची प्रचिती येत असते. त्यामुळे या निवडणुकीतही योगी आदित्यनाथ यांचा नक्कीच प्रभाव पडेल, यात कोणतंही दुमत नाही.

एकीकडे पालघर निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना-भाजपमध्ये दरी निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे ठाण्यात दोन्ही पक्षांचे नेते एकत्र दिसत आहेत. मग याचा नेमका अर्थ मतदारांनी कसा लावायचा?

गेली अनेक वर्षं आम्ही राजकारणात काम करत आहोत. त्यातच एक अनुभवलेली बाब म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कामाची मी पाहिलेली पद्धत ही फार वेगळी आहे. पूर्वीचा ठाणे जिल्हा हा विकासाबाबत दुर्लक्षित राहिला होता. मुख्यमंत्र्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर ठाणे जिल्ह्यात आणि आताच्या पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा आणि विकासकामं सुरू झाली आहेत. वाहतूककोंडीसारखे अनेक वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्याचं कामही मुख्यमंत्र्यांनी केलं. ज्या कोपरी पुलाचं उद्घाटन झालं, त्याविषयी जिल्ह्याचे पालकमंत्री अनेक वर्ष चर्चा करत होते. परंतु, चर्चेनंतर किंवा आंदोलनानंतरही मार्ग निघाला नाही. गप्पा मारणं, भाषण करणं किंवा आश्वासनांची खैरात वाटणं हे सोपं असतं, परंतु कामाची पूर्ती करणं हे कठीण असतं. कामाची पूर्तता केवळ दूरदृष्टी असलेला नेताच करू शकतो आणि त्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांकडे पाहिलं जातं. ठाण्यातल्या कार्यक्रमाचा विचार केला तर तो सरकारी कार्यक्रम होता. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते. विकासकामं करण्यात जे योगदान असलं पाहिजे, ते योगदान केवळ मुख्यमंत्र्यांचंच होतं. केवळ एक शिष्टाचार म्हणून सर्वपक्षीय मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती.

@@AUTHORINFO_V1@@