समाजहिताची अंतस्थ प्रेरणा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2018   
Total Views |
 
 

 
यशस्वी डॉक्टर, समाजसेविका, मार्केर्टिंग कंपनीतील असोसिएट डायरेक्टर अशा तीन महत्त्वाच्या पदांचा डोलारा सांभाळणार्‍या डॉ. सना शेख यांचा प्रेरणादायी प्रवास नक्‍कीच समाजासमोर आदर्श निर्माण करणारा आहे.
 
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कामाच्या निमित्ताने किंवा इतर कोणत्याही कारणांसाठी आपल्या आजूबाजूला वावरणार्‍या लोकांशी आपली भेट होत असते. त्यांच्याशी संवाद साधला जातो. या भेटीच्या, संवादाच्या माध्यमातून त्या-त्या व्यक्तींच्या आयुष्यातील अनेक खासगी बाबी आपल्याला समजतात. म्हणजे काहींच्या आयुष्याची गाडी सुरळीत सुरू असते, पण काही व्यक्ती त्याला अपवादही ठरतात. त्यांच्या खासगी आयुष्यातील काही समीकरणं बिघडलेली असतात. त्या सतत संघर्ष करत असतात. अनेक हालअपेष्टा, कठीण प्रसंगांचा सामना त्यांना करावा लागत असतो. या अशा व्यक्ती भेटल्यानंतर आपण त्यांना तेवढ्यापुरता का होईना आधार देतो, सहानुभूती दर्शवतो खरी, पण मग आपण आपल्याच विश्‍वामध्ये रमून जातो, तर याउलट माणुसकीच्या नात्याने, सढळ हस्ते मदत करण्यासाठी काहीजण आपले संपूर्ण आयुष्य इतरांना मदत करण्यासाठी खर्ची घालतात. त्यापैकीच एक म्हणजे ३० वर्षीय सना शेख.
 
व्यवसायाने डॉक्टर असलेली सना शेख हिने नावाजलेल्या रुग्णालयातील नोकरी सोडून एका फाऊंडेशनच्या माध्यमातून एड्सग्रस्त रुग्णांची सेवा करण्याचा संकल्प केला आहे. एवढेच नव्हे, तर एड्सबाधित एका ११ वर्षीय मुलीचं पालकत्वदेखील डॉ. सनाने स्वीकारले आहे. खरंतर सध्या जोडीदाराच्या शोधामध्ये असलेल्या डॉ. सनाने मुलीला दत्तक घेण्याचा घेतलेला धाडसी निर्णय समाजाला खूप काही शिकवणारा आहे. वैद्यकीय क्षेत्राचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सना व तिच्याबरोबरच्या मित्र-मैत्रिणींनी खासगी रुग्णालयामध्ये काम करायला सुरुवात केली. लहानपणापासून डॉक्टर होण्याचे स्वप्न बघणार्‍या सनाने वैद्यकीय अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला होता. त्यामुळे तिची स्वप्नपूर्तीच झाली होती. पण, त्याचबरोबर समाजाचा घटक म्हणून तिला गरीब, आर्थिकदृष्ट्या असक्षम असलेल्या रुग्णांची मदत करण्याचा ध्यास तिने घेतला. नावाजलेल्या रुग्णालयातील तज्ज्ञ तसेच मोठ्या डॉक्टरांच्या हाताखाली काम करताना सनाला कामाचं समाधान मिळत होतं. तिच्या कामाची प्रशंसादेखील केली जायची. पण, तरीदेखील आपली वाट चुकली आहे का? असं सनाला सारखं वाटत होतं. अत्याधुनिक सोयी-सुविधा, चांगल्या पगाराची नोकरी असं सगळं व्यवस्थित असताना खेड्यापाड्यांमध्ये उपचारापासून वंचित असलेले, अशिक्षित रुग्णांच्या यातना तिला बघवत नव्हत्या. विशेष करून एड्सग्रस्त रुग्णांसाठी काम करायची सनाची इच्छा होती.
 
पुढे काही काळ गेल्यानंतर तिने एक निर्णय घेतला आणि मग तिच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छेचा मार्ग मोकळा झाला. रुग्णालयातील नोकरी सोडून आपलं संपूर्ण आयुष्य एड्सग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी अर्पण करण्याचा निश्‍चय सनाने केला. खरंतर ज्यावेळेस सनाचे एमबीबीएसचे शिक्षण सुरू होते, त्यावेळेस एड्सच्या रुग्णांसाठी काम करणार्‍या फाऊंडेशनसोबत संपर्क आला होता. या फाऊंडेशनमध्ये वेश्याव्यवसाय करणार्‍या एड्सग्रस्त तरुणी, महिला दाखल करण्यात आल्या होत्या. या फाऊंडेशनमध्ये एका ११ वर्षांच्या मुलीकडे सनाचं विशेष लक्ष असायचं. स्वतःच्या जगामध्ये रमणारी ही मुलगी सहसा कोणाशी बोलायची नाही. तिचा हा अबोला सनाला खूप काही सांगून जायचा. त्यामुळे सना त्या मुलीशी रोज बोलायचा प्रयत्न करू लागली. हळूहळू ती मुलगीदेखील डॉ. सनासोबत संवाद साधू लागली. बघता-बघता त्यांची छान मैत्री झाली. त्या मुलीसोबत तिचं वेगळं नातं निर्माण झालं.
 
भावनिकरित्या सना त्या मुलीमध्ये गुंतल्यानंतर तिला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करण्यामध्ये काही अडचणी सनाला आल्यादेखील. पण, ‘जिथे इच्छा तिथे मार्ग’ याप्रमाणे सनाने त्या सगळ्या अडचणींवर मात केली. उपचाराबरोबरच प्रेमापासून वंचित असलेल्या ११ वर्षीय मुलीच्या आयुष्याची विस्कटलेली घडी नीट होत आहे. एड्ससारख्या गंभीर आजारावर तिने मात केली असून तिने तिचा नवीन प्रवास सुरू केला आहे. डॉ. सना शेखने हैद्रराबादच्या इंडियन बिजनेस स्कूलमधून मार्केटिंगमध्ये एमबीएची पदवीदेखील घेतली आहे. सध्या ती एका मार्केटिंग कंपनीमध्ये असोसिएट डायरेक्टरची धुरा सांभाळत आहे. एड्स या आजाराविषयी डॉ. सना म्हणते की, ”सुदैवाने आज या आजाराविषयी समाजामध्ये असलेले अनेक गैरसमज दूर झाले असले तरी ते पूर्णतः नष्ट झाले आहेत, असे म्हणता येणार नाही.” अशिक्षित तसेच ग्रामीण भागामध्ये या आजाराबाबत अजूनही अज्ञान आहे. ज्या रुग्णांना एड्सची लागण झाली आहे, त्यांना औषधोपचारासोबतच मानसिक आधाराचीही गरज असते. त्यामुळे केवळ उपचार करून रुग्ण बरे होतात, असे नाही तर त्यांना त्या काळात मानसिक आधाराचीही गरज आहे. आज ही अशी समाजहिताची कामे करताना तिला एक वेगळंच समाधान मिळत असतं.
 
अर्थात, हे सगळं करण्यासाठी तुमची सहनशक्ती दांडगी असायला हवी. तुम्ही करत असलेल्या कामाची पोचपावती देणारे लोक तुम्हाला भेटतील. त्यातून तुम्हाला नवीन प्रेरणा मिळेल. पण, तुमच्या कामाला नावं ठेवणारे, कामामध्ये अडथळा आणणारे लोकदेखील आहेत. त्यापासून तुम्हाला सावध राहाता आलं पाहिजे.
 
 
 
 
 
- सोनाली रासकर

 
 
@@AUTHORINFO_V1@@