चीनला राज्यातील गुंतवणूकीसाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2018
Total Views |

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आश्वासन

 
 
 
 
मुंबई : चीनमधील सिचुआन प्रांतातील उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणूकीसाठी पसंती दर्शविली आहे. ही आनंदाची बाब असून राज्यात गुंतवणूक करण्यासाठी राज्य शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृहात चीनच्या शिष्टमंडळाने उद्योगमंत्री देसाई यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
 
या बैठकीला सिचुआनचे उपाध्यक्ष पेन युसिंग, उपसचिव ज्यु जियाद, सिचुआन सायन्स ॲण्ड टेक्नालॉजी विभागाचे महासंचालक लियो डोंग, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, एमआयडीसीचे पाटील, सीआयआय या औद्योगिक संघटनेचे प्रतिनिधी निनाद करपे, इन्डो चायना फेडरेशनचे राजीव पोद्दार उपस्थित होते. देशात परकीय गुंतवणुकीत राज्य अग्रेसर असून राज्यात वीज, पाणी, जमीन आणि कुशल मनुष्यबळ मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे देसाई यांनी यावेळी सांगितले. तसेच पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारत असून दहा मेट्रो लाईन आणि राज्यभर असलेले महामार्गांचे जाळे यामुळे राज्यात उद्योग करणे अधिक सुकर झाले आहे. चीनने राज्याला गुंतवणुकीसाठी पसंती दिली त्याबद्दल त्यांचे स्वागत करत असल्याचेही ते म्हणाले.
 
चीनच्या शिष्टमंडळाची विधानमंडळाला भेट
 
चीनच्या सिचुआन प्रांताचे उप राज्यपाल पेंग युसिंग यांनी शिष्टमंडळासह विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची विधानभवनात भेट घेतली. यावेळी संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट, आ. संजय दत्त, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजगोपाल देवरा, विधानमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, महाराष्ट्रातील तसेच मुंबईमधील औद्योगिकदृष्ट्या वातावरणाची पाहणी करण्यासाठी तसेच गुंतवणुकीच्या संधीविषयी माहिती घेण्यासाठी दौऱ्यावर आल्याचे युसिंग यांनी स्पष्ट केले. तसेच चीन- भारत मैत्रीचे संबंध या माध्यमातून अधिक बळकट व्हावेत, असा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.
 
साखर, दुधाची महाराष्ट्रातून आयात करावी - बागडे
 
राज्यामध्ये साखर, दूध आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. तसेच चीन दौऱ्यादरम्यान चीनमध्ये साखर व दुधाचे उत्पादन कमी असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे या उत्पादनांची महाराष्ट्राकडून आयात करावी, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शिष्टमंडळाला केले.
 
@@AUTHORINFO_V1@@