विशेष संपादकीय - हिंदुत्वाचे बेगडी शिलेदार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2018
Total Views |



 
पालघरमधील प्रचारावेळी शिवसेनेने आपल्या उमेदवाराला चर्चमध्ये घेऊन जात पाद्र्यांच्या-मिशनर्‍यांच्या झग्यांशी इमान राखण्याच्या शपथा दिल्या. यावरुन शिवसेनेचे हिंदुत्व पोकळ असून त्यांचे नेते-कार्यकर्ते याच बेगडी हिंदुत्वाचे शिलेदार असल्याचे स्पष्ट होते.

वाघाचे कातडे पांघरलेले लांडगे आणीबाणीचा प्रसंग आला की, आपली लायकी दाखवतात. शिवसेनेची सध्याची अवस्था अशीच झाल्याचे पालघरमधील तिच्या एकंदरीतच चालचलनावरून दिसते. पालघर हा प्रामुख्याने वनवासी समाजाची बहुसंख्या असलेला जिल्हा. व्हॅटिकनमधल्या म्होरक्यांच्या आदेशाने धर्मांतरासाठी पिसाटलेल्या मिशनर्‍यांसाठी जणूकाही नंदनवनच. आज याच मिशनर्‍यांच्या धर्मवेडापायी पालघर, वसई आणि ठिकठिकाणच्या वनवासी पाड्यांवर धर्मांतराचा धंदा राजरोस बोकाळल्याचे दिसते. पण, ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणार्‍या शिवसेनेला हा धर्मांतराचा धंदा दिसत नाही-दिसला नाही. त्यामुळेच सेनेच्या ‘दाढीवाल्या बाबां’नी श्रीनिवास वनगा यांना ठिकठिकाणच्या चर्चमध्ये जाऊन तिथले पाणी शिंपडून घ्यायला, तिथे डोके टेकवायला लावले. ज्या चिंतामण वनगांनी पालघरमधल्या पाड्या-पाड्यांवर, वस्त्या-वस्त्यांवर भाजप, रा. स्व. संघ आणि हिंदू सेवा संघाच्या माध्यमातून हिंदुत्वाचा जागर करण्याचा वसा घेतला, त्यांच्याच मुलाला सेनेने स्वतःच्या मतलबासाठी चर्चमध्ये नेले. हा खरे म्हणजे त्या हजारो, लाखो वनवासी-हिंदू समाजबांधवांच्या भाव-भावनांचा, श्रद्धा-आस्थेचा अपमानच, ज्यांनी कोणत्याही आमिषाला, अत्याचाराला बळी न पडता हिंदू धर्मातच राहणे पसंत केले. पण सेनेला त्याचे कसलेही सोयरसुतक नाही. कसे असणार म्हणा? मतांच्या लाचारीपायी कोणत्याही थराला जाण्याची सेनेची रीतच! त्याच रितीचे पालन करत शिवसेनेला पाद्र्यांच्या, मिशनर्‍यांच्या हातापाया पडण्यात काही वावगे वाटले नाही. नुकतेच दिल्लीच्या आर्चबिशप अनिल कोऊटो या पाद्य्राने २०१९च्या लोकसभा निवडणुकीत आध्यात्मिक बदलांसाठी, भाजपच्या पराभवासाठी प्रार्थना, उपवास करण्याचे आवाहन समस्त ख्रिस्ती समाजाला, चर्चेसना केले. आता कदाचित भाजपद्वेषाची राख माथी फासलेली शिवसेनाही या पाद्र्यांच्या हातात हात घालून आध्यात्मिक बदलांसाठी चर्चमधल्या घंटा वाजविण्यात हिरीरीने पुढाकार घेईल, कारण हाच शिवसेनेचा खरा चेहरा आहे. शिवसेनेचा हा चेहरा वेळोवळी उघडादेखील पडला. सुरुवातीला ७० च्या दशकात मराठी, मुंबई आणि भूमिपुत्रांच्या मुद्द्यांवर शिवसेनेने मराठी माणसाला गळाला लावण्याचे उद्योग केले. दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीयांना मुंबईतून हुसकावून लावण्यासाठी सेनेने आंदोलनाची नौटंकी करत राडेबाजीही केली. पण, मराठीच्या मुद्द्यावर घरचे आणि दारचे भागेना, तेव्हा शिवसेनेने सत्तेच्या सोनेरी ताटावर ताव मारण्यासाठी हिंदुत्वाची झूल पांघरली. एवढे करूनही विकासाचा कोणताही ठोस मुद्दा हाती नसल्याने जनतेने सेनेच्या पारड्यात कधीही मतांचे भरभरून दान टाकले नाही. नंतरच्या काळात स्वतःला ‘राष्ट्रीय’ ओळख मिळवून देण्यासाठीही शिवसेनेने हिंदुत्वाचा वापर करून घेतला. पण, देशातल्या ज्या ज्या राज्यात शिवसेनेने हिंदुत्वाचे आपणच एकमेव राखणदार असल्याचे म्हणत उमेदवार उभे केले, त्या त्या राज्यात तिला सपाटून मार खावा लागला. मराठी आणि हिंदुत्वाच्या नावाने ठणाणा करूनही भरपेट मलिदा खायला मिळत नसल्याचे पाहून नंतर नंतर तर शिवसेनेने आपल्या भूमिकांवरून कोलांटउड्या मारण्याचाच उद्योग सुरू केला. आता पालघरमधील पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यानही शिवसेनेने आपली कोलांटउड्या मारण्याची परंपरा जपत हिंदुत्वाची झूल भिरकावून दिली. कधीकाळी मुस्लीम लीगशी घरोबा केलेल्या सेनेला गुजरात निवडणुकीवेळी राहुल गांधींच्या तथाकथित ‘सॉफ्ट हिंदुत्वाची’ही तळी उचलावीशी वाटली. त्याच ‘सॉफ्ट हिंदुत्ववाल्या’ काँग्रेसने कर्नाटक निवडणुकीआधी हिंदू धर्म तोडण्याचा, लिंगायतांना हिंदूंपासून वेगळे करण्याचा डाव रचला. शिवसेनेने मात्र त्यावेळी मूग गिळून गप्प राहण्याचेच काम केले. येडियुरप्पांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, त्यावेळीही शिवसेनेला हिंदुत्ववादी भाजपचा नव्हे, तर राहुल गांधी आणि टिपू सुलतानप्रेमींचाच उमाळा आला. यावरूनच शिवसेनेचे हिंदुत्व किती तकलादू आणि जिकडे वारे असेल तिकडे फिरणारे आहे, हे लक्षात येते. शिवसेनेची ही हिंदुत्वाची ढोंगबाजी फक्त इथवरच थांबत नाही, तर मधल्या काळात शिवसेनेने केवळ भाजपद्वेषापायी धर्मांध मुसलमानांच्या दाढ्या कुरवाळणार्‍या ममता बॅनर्जींच्या पदराआड जाण्याचेही चाळे केले.

ममताबानोच्या मुसलमान प्रेमापायी आज बंगालमधील हिंदूंना सण-समारंभ, मिरवणुका काढण्यावरही बंदीचा सामना करावा लागत आहे. पण, शिवसेनेला या बंदीतही हिंदुत्वाचा गौरव, सन्मानच वाटत असावा, म्हणूनच शिवसेनेने कधीही ममता बॅनर्जींविरोधात एक शब्दही काढला नाही. दुसरीकडे राज्याच्या राजकारणात जाती-जातीत कोणत्याही मुद्द्यावरून भांडणे लावून देणारे बिनचिपळ्यांचे नारद म्हणून शरद पवारांचे नाव घेतले जाते. पवारांचे राजकारणच हिंदू धर्मात फूट पाडण्याच्या पायावर आधारलेले. मधल्या काळात शिवसेनेला मराठी माणसाच्या मुद्द्यावरून शरद पवारांचेही पाय पकडावेसे वाटले. याच शिवसेनेने हार्दिक पटेल, अरविंद केजरीवाल, कन्हैय्याकुमार अशा सर्वच हिंदू आणि हिंदुत्व विरोधकांसाठीही झांजा वाजविण्याचे काम केले. म्हणजेच शिवसेनेच्या तनात भगवा रंग, हिंदुत्ववाद असल्याचे दिसते, पण सेनेचे मन, हृदय कधीचेच काँग्रेसी, हिंदूविरोधी झाल्याचे लक्षात येते. आता पालघरमधील प्रचारावेळीही शिवसेनेने आपल्या उमेदवाराला चर्चमध्ये घेऊन जात पाद्र्यांच्या-मिशनर्‍यांच्या झग्यांशी इमान राखण्याच्या शपथा दिल्या. यावरून शिवसेनेचे हिंदुत्व पोकळ असून त्यांचे नेते-कार्यकर्ते याच बेगडी हिंदुत्वाचे शिलेदार असल्याचे स्पष्ट होते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@