वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदार संघात 99.72 टक्के मतदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
चार उमेदवारांचे भवीतव्य मतपेटीत

चंद्रपूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज 21 मे रोजी दुपारी 4 पर्यंत 99.72 टक्के मतदान झाले. आजच्या मतदानासोबतच चार उमेदवारांचे भवीतव्य मतपेटीत बंद झाले असून 24 मे रोजी मतमोजणी होणार आहे. 
 
 
सकाळी आठ ते सायंकाळी चार पर्यंत आज मतदान झाले असून सायंकाळी 4 पर्यंत एकूण 1059 मतदारांपैकी 1056 मतदारांनी मतदान केले. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या मतदार संघात अंतिम चार उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये जगदीश अचलदास टावरी-अपक्ष, सौरभ राजू तिमांडे-अपक्ष, रामदास भगवानजी आंबटकर-भाजपा, इंदकुमार सराफ-भाराकॉ यांचा समावेश आहे. आजच्या निवडणुकीत आर्वी, हिंगणघाट, चामोर्शी या मतदार केंद्रावर प्रत्येकी एक मतदाराने आपला हक्क बजावला नाही. अन्य 17 पैकी 14 मतदान केंद्रावर 100 टक्के मतदान झाले.
 
 
या स्थानिक प्राधिकारी मतदार संघासाठी वर्धा जिल्हयातील 308, चंद्रपूर येथील 469 व गडचिरोली जिल्हयातील 282 असे एकूण 1059 मतदार आहेत. या मतदानासाठी 17 मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. वर्धा जिल्हयात तहसिल कार्यालय आर्वी-(98.75 टक्के), वर्धा-(100 टक्के) व हिंगणघाट-(98.70 टक्के), चंद्रपूर जिल्हयात तहसिल कार्यालय चिमूर, ब्रम्हपूरी, वरोरा, मूल, चंद्रपूर, बल्लारपूर, गोंडपिपरी, राजूरा- (सर्व ठिकाणी 100 टक्के) व गडचिरोली जिल्हयात तहसिल कार्यालय कुरखेडा-(100 टक्के), देसाईगंज-(100 टक्के), गडचिरोली-(100 टक्के), चार्मोशी-(98.08 टक्के), अहेरी-(100 टक्के) व एटापल्ली-(100 टक्के) मतदान झाले. चंद्रपूरमध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी गोंडपिपरी येथे तर महापौर अंजली घोटेकर यांनी चंद्रपूर येथे मतदान केले. या निवडणुकीची मतमोजणी दिनांक 24 मे 2018 रोजी चंद्रपूर येथे होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी दिली आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@