पाक विरुद्ध पश्तुनी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2018   
Total Views |
 

 
खैबर पख्तुनवा हा पाकिस्तानमधील एक प्रांत. पाकिस्तानी लष्कराच्या दंडुकेशाही आणि दहशतवाद्यांच्या बेबंदशाहीच्या आगीत होरपळलेला. पण, कालपरवापर्यंत पाकिस्तानी लष्कराच्या व दहशतवाद्यांचा अत्याचार मुकाट सहन करणार्‍या या प्रांतातील पख्तुनी लोकांनी आता त्याविरोधातच आवाज बुलंद केला. पाकिस्तानात जवळपास ३५ दशलक्ष एवढी लोकसंख्या असलेल्या पख्तुनी नागरिकांनी आता थेट लष्कराविरोधातच आघाडी उघडली आहे. कायम पश्तुनी टोपीत दिसणार्‍या मंजूर पश्तीन या २६ वर्षीय युवकाच्या नेतृत्वाखाली तिथे ‘पख्तून तहफूज मूव्हमेंट’ (पीटीएम) हे आंदोलन सुरू झाले आणि मंजूर पश्तीनच्या या आंदोलनाने सध्या दहशतवादाचा जनक असलेल्या पाकिस्तानच्या चांगलेच नाकी नऊ आणले.
 
‘सरहद गांधी’ वा बादशाह खान यांची प्रतिकृती समजल्या जाणार्‍या मंजूर पश्तीन याने २०१४ साली ‘पख्तून तहफूज मूव्हमेंट ही चळवळ सुरू केली. ही चळवळ सुरू करण्याच्या आधी इथे कित्येक घडामोडी घडल्या. १९८० च्या दशकात अफगाणिस्तानमध्ये रशियाविरोधात लढण्यासाठी पाकिस्तानने याच खैबर पख्तुनवा भागात दहशतवाद्यांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली, ज्यांना ’तालिबान’ म्हणून ओळखले जाते. आजही हा भाग तालिबानचा बालेकिल्ला मानला जातो. इथल्या नागरिकांचा मात्र दहशतवादी, तालिबान या सगळ्यांनाच विरोध असून त्यांनी आता आपला विरोध जाहीरपणे व्यक्त करायलाही सुरुवात केली. इथल्या नागरिकांना दहशतवाद्यांच्या अत्याचारांचा तर सामना करावाच लागतो, पण पाकिस्तानी लष्करही आपल्याच देशाच्या नागरिकांवर गोळ्या झाडायला मागेपुढे पाहत नाही. त्यामुळेच इथले लोक पाकिस्तानी लष्करावर नाराज असून याचवर्षी जानेवारी महिन्यात एका पख्तुनी व्यक्तीची हत्या झाल्यानंतर ‘पीटीएम’ने त्याविरोधात आंदोलन केले. मुख्य प्रवाहातील माध्यमांवर खैबर पख्तुनवात सुरू असलेल्या विरोध प्रदर्शनाचे वार्तांकन करण्यास अघोषित बंदी घातलेली असताना केवळ समाजमाध्यमांवर प्रचार-प्रसार होऊनही लाखो लोकांनी त्याला प्रतिसाद दिला.
 
दरम्यान, ‘पख्तून तहफूज मूव्हमेंट’च्या काही मागण्या आहेत. गेल्या १० वर्षांत मूलतत्त्ववाद्यांच्या विरोधात लढा देताना जे लोक बेपत्ता झाले, त्यांची नावे जाहीर करावी. अफगाणिस्तानच्या सीमेलगत कबिल्यांच्या भागात इंग्रजांच्या काळातला ‘फ्रंटियर क्राईम्स रेग्युलेशन’ हा कायदा लागू आहे, तो रद्द करण्यात यावा. कबिल्यांच्या भागातही पाकिस्तानची घटना लागू करावी. वझिरिस्तान आणि अन्य कबिल्यांच्या परिसरातल्या लोकांनाही अन्य पाकी नागरिकांप्रमाणे हक्क मिळावेत. तालिबानविरोधातल्या लष्करी कारवाईत ज्या ज्या सर्वसामान्यांची घरे व व्यवसाय उद्ध्वस्त झाले, त्यांना नुकसानभरपाई द्यावी. या भागातल्या चेकपोस्टवर इतल्या नागरिकांना चांगली वागणूक द्यावी आणि पाकिस्तानसोबतच्या कोणत्याही करारावेळी आंतरराष्ट्रीय निरीक्षक असावा, माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना अटक करून त्यांच्याविरोधात खटला चालवावा, या त्यांच्या मागण्या आहेत. त्या मान्य व्हाव्यात म्हणून त्यांनी आंदोलन पुकारले.
 
‘पख्तून तहफूज मूव्हमेंट’ अंतर्गत मंजूर पश्तीन याने पाकिस्तानी लष्करावरही गंभीर आरोप केले. आपल्याला माहितीच असेल की, भारताशी समोरासमोरच्या युद्धात जिंकण्याची शाश्‍वती नसल्याने पाकिस्तानने वेळोवेळी दहशतवादाचा आसरा घेतला. पाकिस्तानी लष्करानेही दहशतवादाला नेहमीच प्रोत्साहन दिले. पण, हा दहशतवादाचा राक्षस पाकवरच उलटल्याचे गेल्या काही वर्षांत तिथे झालेल्या हल्ल्यांतून स्पष्ट झाले. याच दहशतवाद्यांच्या गळाभेटी घेणार्‍या लष्कराला आणि दहशतवाद्यांना विरोध करत खैबर पख्तुनवा प्रांतातील लोक एकत्र आले. दहशतवादाला प्रोत्साहन देणे आणि दहशतवाद्यांना पंखाखाली घेण्याबद्दल त्यांनी थेट पाकिस्तानी लष्करालाच जबाबदार धरले. त्यांनी,’ये जो दहशतगर्दी है, इसके पिछे वर्दी है,’ अशा खुलेआम घोषणा देत पाकिस्तानी लष्कराचा खरा चेहरा जगासमोर उघडा पाडला.
 
भारताला गेल्या कित्येक वर्षांपासून दहशतवादी कारवायांनी भंडावून सोडलेल्या, दहशतवादाचा एखाद्या हत्याराप्रमाणे वापर करणार्‍या पाकिस्तानसमोर त्यामुळे मंजूर पश्तीन याचे आंदोलन एक मोठे आव्हान म्हणून उभे ठाकले. दहशतवादाविरोधात सुरू झालेले हे आंदोलन सध्या तरी अहिंसक आहे, पण पाकिस्तान सरकारने हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते हिंसकही होऊ शकते. त्यामुळे आता यापुढील काळात नेमके पख्तुनी नागरिकांचे आंदोलन कोणते वळण घेते, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@