पंचवटी एक्स्प्रेस मुंबईत लवकर पोहोचण्यासाठी रेल्वेमंत्री प्रयत्नशील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2018
Total Views |

रवींद्र अमृतकर यांची माहिती

 
 
 
 
नाशिक : मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेसची मुंबईला पोहचण्याची वेळ १०.३५ ऐवजी १०.१५ करण्यासाठी गाडीचा वेग वाढवावा,”अशी मागणी इंटिग्रेटेड पॅसेंजर असोसिएशनचे रवींद्र अमृतकर यांनी निवेदनाद्वारे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली असून याबाबत शक्यता पडताळून पाहण्याचे आदेश मंत्रीमहोदयांनी रेल्वे अधिकार्‍यांना दिले आहेत.
 
रवींद्र अमृतकर यांनी याबाबत दै. ’मुंबई तरुण भारत’ला दिलेली माहिती अशी, पंचवटी एक्सप्रेस सव्वा दहा वाजता शासकीय कार्यालयांच्या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहचणे आवश्यक आहे. शासकीय कार्यालयात आता बायोमेट्रिक पद्धतीमुळे साडेदहाच्या ठोक्याला उपस्थित राहणे अनिवार्य आहे. पुणे आणि नाशिककर कर्मचार्‍यांना अप-डाऊन करण्यासाठी भारतातील विशेष बाब म्हणून दीडशे ऐवजी दोनशे किमी अंतराला मासिक पास सुविधा दिली आहे. मात्र डेक्कन क्वीन आणि पंचवटी या गाड्या अनुक्रमे १०.२५ आणि १०.४० ला पोहोचतात, पंचवटी तर रोज १० मिनिटे उशिरा पोहचते. यामुळे ११ वाजता पोहोचणार्‍या कर्मचार्‍यांचे दरमहा सुमारे ५ ते १० हजार रु. वेतनातून कपात होते. हे टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने (मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव) रेल्वेमंत्री आणि मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना या गाड्यांचा वेग वाढवून सव्वा दहाच्या सुमारास या गाड्या पोहोचविण्याची विनंती कर्मचार्‍यांच्या वतीने करण्यात आली आहे.
 
नाशिक येथून मोठ्या प्रमाणात शासकीय आणि खाजगी कामानिमित्त जाणारे प्रवासी अप-डाऊन करतात. शासकीय कार्यालये सुरू झाल्यानंतर पंचवटी एक्स्प्रेस पोहचत आहे. पंचवटी सध्या दररोज उशिरा पोहोचत असल्यामुळे आणि प्रशासनाला कदाचित काही तांत्रिक कारणांमुळे तोडगा काढता येत नसल्यामुळे कर्मचार्‍यांच्या कपाळावर लेटमार्कचा सध्या बसत असलेला ठप्पा टाळून त्यांच्या पगारातून होणारी कपात टळू शकते. मनमाड-मुंबई उडचढ राज्यराणी गाडीला सध्या आहे त्याच कोचेसमध्ये १ अतिरिक्त चेअरकार आणि १ द्वितीय वर्ग सिटिंग पासधारकांसाठी कोच लावण्याबाबतदेखील पत्रात विनंती करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाला २२१०२ मनमाड-मुंबई उडचढ राज्यराणी गाडीला पासधारकांसाठी कोच लावण्याबाबत आदेश द्यावा, असे पत्रात म्हटले आहे.
 
नाशिक-इगतपुरी दरम्यान पाडळी स्थानकाचा विकास
नाशिक इगतपुरी महामार्गावर शहरापासून सुमारे २२ ते २५ किमी अंतरावर असलेले पाडळी या स्थानकाचा विकास करून त्या ठिकाणी भुसावळ विभागाच्या आणि ज्या गाड्यांना वेळ कव्हर करणे शक्य आहे, त्यांना थांबा दिल्यास नाशिककर रेल्वे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. कसारा-इगतपुरी ते मनमाड- नांदगाव मार्गासाठी २ डेमू लोकलचे रेक उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. नाशिककर नागरिकांनी याविषयी आपले मत ट्विटरवर इंटिग्रेटेड पॅसेंजर असोसिएशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आपले मत नोंदवावे, असे आवाहन रवींद्र अमृतकर यांनी केले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@