निवासी डॉक्टरांचा संप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2018
Total Views |

मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत माघार नाही
मार्डची भूमिका, आंदोलनाचा चौथा दिवस, रुग्णांचे हाल
 
 

 
 
मुंबई : जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांनी शुक्रवारी मारहाण केली होती. या मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टर शनिवार पासून संपावर गेले आहेत. या डॉक्टरांच्या मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक आश्वासन दिले आहे परंतु मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत संप मागे घेणार नाही, अशी भूमिका डॉक्टरांची संघटना मार्डने घेतली आहे. आज संपाचा चौथा दिवस असून रुग्णालयातील सेवा कोलमडून पडल्याने रुग्णांचे हाल झाले आहेत.
 
जेजे रुग्णालयातील दोन निवासी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना रुग्णाच्या नातेवाईकांनी शुक्रवारी रात्री मारहाण केली होती. या मारहाणीच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी शनिवारपासून संप पुकारला आहे. दरम्यान, चौथा दिवशीही संप सुरुच राहिल्याने जे. जे. रुग्णालयातील रुग्णसेवा कोलमडून रुग्णांचे हाल झाले आहेत. जे. जे. तील ४०० डॉक्टरांनी मागील तीन दिवसांपासून कामबंद केल्याने जेजेतील रुग्णांना वेळेत सेवा मिळत नसल्याचे काही रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले.
 
या संपावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत मार्डच्या प्रतिनिधींशी बैठक झाली. या बैठकीत मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा होऊन मागण्यांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन महाजन यांनी दिले. सुरक्षेचे सर्व उपाय करण्याचे आश्वासन महाजन यांनी यावेळी दिले. मात्र मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय मार्डने घेतला आहे. सोमवारीही शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांनीही काही तास काम बंद ठेऊन निषेध नोंदवत संपाला पाठिंबा दिला. शीव, केईएम, नायर येथील निवासी डॉक्टरांचाही संपाला पाठिंबा असल्याने संप चिघळण्याची शक्यता आहे. रुग्णालयातील सुरक्षेच्या मुद्द्यावर मागील दीड वर्षापासून दिरंगाई सुरुच आहे. त्यामुळे फक्त आश्वासनावर माघार न घेण्याचा निर्णय़ मार्डने घेतला आहे. डॉक्टरांच्या या पवित्र्यामुळे प्रशासनासह रुग्णांचीही कोंडी झाली आहे.
 
वरिष्ठ डॉक्टरांकडूनच वैद्यकीय सेवा
 
संपादरम्यान आपत्कालीन परिस्थितीत 'जेजे'मध्ये आलेल्या रुग्णांचे हाल झाले आहेत. 'आयसीयूमध्ये जागा नाही, संप सुरू आहे', असे रुग्णांना सांगण्यात येत होते. त्यामुळे रुग्णांना तिष्ठत थांबावे लागले. त्यामुळे काही रुग्णांच्या नातेवाईकांनी केईएम, सायन, नायर या रुग्णालयांत धाव घेतली. जेजेतील परिचारिका आणि वरिष्ठ डॉक्टरांकडून रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळत असली तरी निवासी डॉक्टरांची सेवा मिळत नसल्याचे चित्र होते.
 
अंमलबजावणी झाल्याशिवाय़ माघार नाही
 
आमच्या मागण्यांबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन देत तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आश्वासन मिळाले. परंतु असे असले तरी यापूर्वी दिलेल्या आश्वासनानंतरही मागील दीड वर्षापासून सुरक्षेचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे अंमलबजावणी झाल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी आमची भूमिका आहे. संप करून रुग्णांना वेठीस धरण्याचा आमचा हेतू नाही. महत्वाच्या सेवा सुरू आहेत, त्यामुळे रुग्णांचे हाल होणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे.
 
डॉ. अमोल हेकरे, मार्ड प्रवक्ते
 
@@AUTHORINFO_V1@@