चिह्न निमित्त – निमित्त चिह्न भाग ७

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2018   
Total Views |


प्राचीन भारताच्या भूगोलात आणि संस्कृत साहित्यात, गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांना महत्वाचे मानले गेले. यापैकी सरस्वती नदी आज लुप्त झाली आहे. आजचा पंजाब म्हणजे सप्तसिंधू प्रदेश हा वैदिक काळातील आर्यांचे वसतीस्थान. याच प्रदेशात सरस्वती नदीचा उगम झाला होता असे मानले जात असे. डॉ. हरिभाऊ वाकणकर या जेष्ठ इतिहास अभ्यासक आणि पुरातत्व शास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनाखाली भारतीय वैज्ञानिकांनी, इस्रोच्या उपग्रहांच्या मार्फत उपलब्ध झालेल्या छायाचित्र आणि छायाचित्रणाचे विश्लेषण करून, लुप्त झालेल्या सरस्वती नदीच्या संदर्भात, या लोकमानसातील लोकश्रुतीचा विज्ञाननिष्ठ शोध घेतला. आज पाकिस्तानात असलेल्या उत्तर सिंध – दक्षिण सिंध प्रांत इथून कच्छ आणि राजस्थानातील वाळवंटी प्रदेशातून १७०० किलोमीटरचा प्रवास करत ही नदी अनेक मुखांनी (मार्गांनी) भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील अरबी समुद्रात विलीन झाली असावी असा निष्कर्ष भारतीय भूगर्भशास्त्रज्ञांनी काढला आहे.

संस्कृत व्याकरणात ‘सरस्वती’ हा शब्द ‘बहुविकल्पी’ म्हणजेच अनेक अर्थ असलेला शब्द म्हणून ओळखला जातो. मूळ संस्कृत ‘सृ’ या धातूपासून या शब्दाची व्युत्पत्ती झाली आहे. ‘सृ’ म्हणजे वाहणे – हलणे असा गतिमानतेचा संकेत ‘सरस्वती’ या शब्दांत दिला जातो. लुप्त झालेली सरस्वती नदी, जिचा विग्रह स्वरूप स्थूलदेह प्रतिमा म्हणून देवी सरस्वतीचा उल्लेख केला जातो. काही शतकांपूर्वी नदीच्या उगमस्थान प्रदेशात (आज पाकिस्तानातील) प्रचलित असलेल्या अशाच एका प्रतिमेत देवीच्या डाव्या हातात पाण्याचा कलश तिने धारण केला आहे आणि उजव्या हातात पुस्तक आहे. समृद्धी, औदार्य, निर्मितीक्षम सुपीकता देणारी (जमिनीची), निर्मलता, पावित्र्य (पाण्याची स्वच्छता) आणि रोगप्रतिकारक गुणवत्ता (पाण्याची) यासर्व वैशिष्ठ्यासाठी ही नदी लोकमानसात परिचित होती. याच समृद्ध भूमीत, सरस्वती नदीच्या काठावर वेदांची निर्मिती झाली.

प्राचीन संस्कृत साहित्यातील देवी सरस्वतीच्या यथार्थ वर्णनावरून तीला नदी देवता, वाग्देवता, विद्यादेवता अशा तीन प्रमुख भूमिकांमधे सादर केले गेले. अशा लिखीत शब्दातील वर्णनावरून देवी - देवतांना मानवी रूपांत निर्माण करण्यासाठी शिल्पकार - चित्रकार आणि मूर्तिकारांनी जो अभ्यास, चिंतन, मनन केले असेल त्याला मूर्तिविधान असे सुंदर संबोधन वापरले गेले. आपल्या विद्वान पूर्वजांमुळेच, या मूर्तिविधानावर म्हणजेच चित्र, शिल्प, मूर्ती या सर्व भौतिक - वास्तव स्वरुपातील देवी - देवतांच्या प्रतिमांचा आपण निश्चित अभ्यास करू शकतो. अशी मूर्तिविधाने म्हणजे वैदिक आर्यसंस्कृतीतून श्रेष्ठ, शास्त्रीय, निश्चित असा हिंदूधर्म संस्कृतीकडे झालेल्या प्रवासाचा आलेख आहे. या बरोबरच, भटके जीवन सोडून, शेती व्यवसाय आणि समाजरचनेच्या प्राथमिक मांडणीची सुरुवात आहे.


 

जलकलशधारी देवी सरस्वती
 

नदी देवता स्वरूप जलकलशधारी देवी सरस्वतीची प्रतिमा (चित्र क्रमांक १). या प्रतिमेतील पार्श्वभूमी बर्फाने आच्छादित पर्वतरांगेची आहे. देवीचे वस्त्र पिवळ्या रंगाचे आहे. वसंत ऋतूचे आगमन आणि देवी सरस्वती पूजा हे या दिवसाचे महत्व. आजही देशभर, माघ महिन्यातील शुक्ल पंचमीच्या दिवशी वसंत पंचमी साजरी केली जाते. या दिवशी महिला पिवळ्या रंगाची वस्त्र-परिधान वापरतात.
 
 
भारतातील २२ अनुसूचित प्रादेशिक भाषांतील उत्तम साहित्य निर्मितीसाठी, भारतीय ज्ञानपीठ न्यासाद्वारे, ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो. अकरा लाख रुपये, मानपत्र आणि देवी वाग्देवीची प्रतिमा असे या सर्वोच्च साहित्य पुरस्काराचे स्वरूप आहे. यातील वाग्देवीची ब्राँझ धातूतील सुंदर प्रतिमा, मावळ प्रांतातील धार या शहरातील देवी सरस्वती मंदिरातील मूर्तीची प्रतिकृती आहे. ज्ञानपीठ पुरस्कारातील मूर्ती ही मूळ मूर्तिची विग्रह प्रतिमा आहे. महाराजा भोज यांनी इसवी सन १०३५ मधे या मंदिराची निर्मिती केली. मूळ मूर्ती भुऱ्या रंगाच्या स्पटिकापासून बनवलेली असून १९०२ मधे मेजर किंकेड याने ही मूर्ती लंडनला नेली, आज ही मूर्ती लंडनच्या वस्तुसंग्रहालयात आहे. शांत - ध्यानस्थ मुद्रेतील ही मूर्ती जगातील काही सुंदर मुर्तिमधील एक आहे असे मानले जाते. देवीच्या पुढल्या उजव्या हातात कमळाचे फुल, पुढच्या डाव्या हातात तिने कमंडलू धारण केला आहे. मागील उजव्या हातात जपमाळ म्हणजेच अक्षमाळ आणि मागील डाव्या हातात पुस्तक धारण केले आहे. ही चार चिह्न, अध्यात्मिक अनुभूती देतात अशी लोकश्रद्धा आहे. वाग्देवीच्या मूर्तितील ही चार चिह्नं म्हणजे देवी सरस्वतीच्या मूळ चतुर्भुज प्रतिमेचा विस्तारित विग्रह (extended form) आहे.
 


देवी वाग्देवी


देवी सरस्वतीच्या पुढील दोन हातात अन्य प्रतिमांमधे नेहमी दिसते तशी वीणा या प्रतिमेत दिसत नाही. देवीच्या अनेक रूपांपैकी वाग्देवी रूपातील प्रतिमेचे हे खास वैशिष्ट्य आहे. देवीच्या पुढील डाव्या हातातील पाण्याने भरलेला कमंडलू हे आयुध, वाग्देवीचे हे वेगळे रूप स्पष्ट करते. देवीची उभी शरीरमुद्रा हे या प्रतिमेचे दुसरे वैशिष्ट्य. भारतीय मूर्तिशास्त्रात या देवी-देवतांच्या उभ्या शरीरमुद्रेला विशेष चिह्नसंकेत आहे.


सामान्यतः दोन किंवा तीन प्रकारच्या मूर्ती किंवा प्रतिमा प्रचलित आहेत. हिंदू धर्मीयांच्या मंदिरे आणि देवळात स्थापित मूर्तिंना मूळ विग्रह मूर्ती असे संबोधले जाते. अशा मूर्ती एका दगडातून कोरून घडवलेल्या असाव्या असा उल्लेख काही मूर्तिशास्त्रांच्या पुस्तकात केला गेला आहे. विधिपूर्वक प्रतिष्ठापना झाल्यानंतर या मूर्तिंना कधीच हलवले जात नाही. देवळातील अशा प्रतिमांचा दैनंदिन पूजा विधी नियमित होणे आवश्यक असते. दुसऱ्या प्रकारच्या मूर्ती आणि प्रतिमांना उत्सव विग्रह मूर्ती असे संबोधले जाते. गणेशोत्सवातील श्री गणेशाच्या आणि नवरात्री उत्सवातील देवीच्या मूर्ती या प्रकारच्या असतात. पंचधातूपासून बनवलेल्या अशा मूर्तिंची उत्सवकाळात विधीपूर्वक स्थापना झाल्यानंतर अशा उत्सव विग्रह मूर्तिंमधे मूळ विग्रह मूर्तिची प्रेरणा आणि उर्जा प्रसारित होते अशी लोकश्रद्धा आहे. घरी पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या मुर्तिंना प्रतिमा म्हटले जाते. देवघरातील अशा प्रतिमा धातूच्या असाव्या आणि किमान पाच ते सहा इंच उंचीच्या असाव्या असा संकेत मूर्तिशास्त्राच्या अभ्यासात दिला गेला आहे.
 
 
प्राचीन भारतीय ग्रंथ पतंजली योगसूत्रानुसार, देवी - देवतांच्या मूर्ती आणि प्रतिमा हे विद्यार्थी आणि उपासकांसाठी, एखाद्या विषयातील अभ्यासासाठी ध्यानधारणा करताना, चित्त आणि वृत्ती केंद्रित करण्याचे एक पूर्ण प्रगत साधन आहे. दर्शक आणि मूर्ती यांचे अनोखे नाते, दर्शकाची (beholder) मानसिकता, मूर्तिच्या विविध शरीर मुद्रांमधून स्पष्ट होते. देवीच्या या उभ्या शरीरमुद्रेमधे दर्शकाच्या मनातील आत्मसन्मानाची (self-esteem) आणि आत्मविश्वासाची भावना निर्माण होते. मूर्ती आणि प्रतिमेच्या समोर योग्य त्या गांभीर्याने उपासना करताना, देवतेच्या दैवी, पवित्र, अपूर्व उर्जेची अनुभूती दर्शकाला अनुभवता येते. मूर्ती - प्रतिमा आणि दर्शकाची उपासना याचा चिह्नसंकेत असा की ज्या विषयातील अभ्यासाठी विद्यार्थी वाग्देवीची उपासना म्हणजेच त्या विषयाची ज्ञानसाधना करतो आहे, त्यात त्याला चित्त-वृत्ती केंद्रित करून निश्चित प्रगती करता येते.
 
 
नामवंत जर्मन मानसशास्त्रज्ञ डॉ. कार्ल गुस्ताव यंग यांनी पतंजली योगसूत्र या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी वाराणसी शहरातील संस्कृत पाठशाळेला नऊ वेळा भेट दिली होती. अनेक निबंधातून, पतंजली योगसूत्राच्या दुसऱ्या अध्यायातील प्रतिमा उपासना या मूळ भारतीय संकल्पनेचे मानसशास्त्रीय महत्व जगाला सांगण्याचे काम डॉ. यंग यांनी निश्चितपणे केले. मूर्तिपूजा ही भारतीय संकल्पना म्हणजे मागासल्या वृत्तीची Idol worship नसून, त्याला प्रतिमा उपासना म्हणावे असे विश्लेषण त्यांनी सतत आग्रहाने जगासमोर मांडले.
 
 
- अरुण फडके
@@AUTHORINFO_V1@@