अचूक हवामानाच्या माहितीसाठी 'महावेध'चा आधार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2018
Total Views |

स्वयंचलित हवामान यंत्रणेचा शेतकऱ्यांना फायदा
२०६० स्वयंचलित हवामान यंत्रे कार्यान्वित

 
 
 
 
मुंबई : बदलत्या हवामानाचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फटका बसत होता. याचीच दखल घेत शासनाने 'महावेध' ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या मार्फत राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला हवामानाची अचूक माहिती, अंदाज उपलब्ध होणार असून त्यानुसार पिकांचे योग्य व्यवस्थापन करण्याचे तसेच होणारे नुकसान टाळण्याचे तंत्र सहज साध्य होणार आहे. दरम्यान, 'महावेध'द्वारे गावस्तरापर्यंतच्या शेतकऱ्याला हवामानाचा अचूक अंदाज आणि माहिती प्राप्त होणार आहे.
 
राज्यातील प्रत्येक महसूल मंडळात एक अशी २०६० स्वयंचालित हवामान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. तसेच हवामानाशी संबंधित सूचना आणि अचूक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी या उद्देशाने अशी एक विकेंद्रित व्यवस्था उभी करण्याची ही संकल्पना होती, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सध्याची हवामानविषयक यंत्रणा संपूर्ण राज्यातील हवामानाची एकत्रित माहिती देण्यापुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर हवामानाचे अचूक अंदाज वर्तविणे शक्य होत नाही. या स्वयंचलित हवामान यंत्रणेमुळे हवामानाशी संबंधित परिपूर्ण आणि अचूक माहिती मिळणार आहे. हवामानाची खरी स्थिती वेळेआधी प्राप्त होत असल्याने शेतकऱ्यांना पावसाचा, गारपीटीचा अंदाज आधीच मिळेल आणि त्यानुसार ते संभाव्य नुकसान टाळण्यासाठी उपाय योजना करू शकतील, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
 
यंत्रणा बसवण्यात स्कायमेटचे सहकार्य
राज्यात शेती हवामानावर आधारित आहे. गेल्या काही वर्षातील हवामानातील वाढत्या बदलामुळे अवेळी पाऊस, गारपीट, वादळ, यांचा तडाखा पिकांना बसून त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना देखील बसला आहे. ही स्वयंचलित हवामान यंत्रणा स्कायमेट या हवामानाचे अंदाज वर्तविणाऱ्या कंपनीच्या सहकार्याने पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप पीपीपी तत्वावर बसविण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच या स्वयंचलित हवामान यंत्रणेमुळे वाऱ्याची गती किती आहे आणि ते कोणत्या दिशेने वाहत आहेत ते कळेल, तसेच हवेतील तापमान, सापेक्ष आर्द्रता पावसाचे प्रमाण, याविषयीची माहिती शेतकऱ्यांना देखील गावनिहाय कळेल. ज्या ठिकाणी अशी यंत्रणा कार्यरत झाली आहे तेथे हवामानाची अचूक माहिती प्रत्येक दहा मिनिटांच्या अंतराने एकत्रित करण्याची व्यवस्था पुणे येथील कृषी महाविद्यालयात करण्यात आली आहे. ही माहिती लवकरच शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याची व्यवस्था करण्यासाठी योग्य ती पावले उचलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
ग्रामपंचायत कार्यालयात एलइडी स्क्रीनद्वारे हवामानच्या माहितीचा प्रस्ताव - कृषी मंत्री
 
सरकारने यापूर्वीच ‘एम-किसान’ सल्लागार यंत्रणा अमलात आणली असून त्याद्वारे ५० लाख शेतकऱ्यांपर्यंत मोबाईलच्या माध्यमातून हवामानासंबंधी सामान्य माहिती पोहचविली जात आहे. परंतु राज्यात १.३७ कोटी शेतकरी आहेत.त्यापैकी केवळ ५० लाख शेतकर्‍यांनीच नोंदणी केली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात एलइडी स्क्रीन उभारून त्याद्वारे हवामानाची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.
 
@@AUTHORINFO_V1@@