राष्ट्रपतींची रास्त अपेक्षा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2018
Total Views |



 

 
राष्ट्रपतींनी व्यक्त केलेली अपेक्षा रास्तच आहे. लोकोपयोगी संशोधनाची मोठी गरज आज आपल्यासारख्या विकसनशील देशाला आहे. नव्यातले नेमके आपण नवे काय केले, याचा विचार व्हायला हवा.
 

इंधन भरण्याचा नेहमीचा पेट्रोलपंप. इंधन भरले की मोटारीच्या टायरमध्ये हवा भरण्याची सवय अनेकांना असते. हवा भरणारा माणूस मागच्या आणि पुढच्या टायरमधील हवेसाठी धावत यंत्राजवळ जातो. आकडे बदलतो आणि पुन्हा धावत येतो. हवा भरण्याचे जे पुढचे टोक आहे, त्याच ठिकाणी जर का दाब बदलण्याचे लहानसे यंत्र लावले तर? कितीतरी मानवी श्रम आणि त्यापेक्षा जास्त मानवी तास यामध्ये वाचू शकतात. हा झाला तंत्रज्ञानाचा लोकोपयोगी उपयोग. यासाठी संशोधनासाठी संशोधन नव्हे, तर लोकोपयोगी संशोधन असा दृष्टिकोन जोपर्यंत स्वीकारला जात नाही, तोपर्यंत काहीच करता येणार नाही. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संशोधकांकडून काही अपेक्षा व्यक्त केली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च या संस्थेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा सर्वच विज्ञानविश्‍वाला अंतर्मुख करायला लावणार्‍या आहेत. विज्ञानाचा उपयोग राष्ट्रउभारणीच्या कामासाठी झाला पाहिजे. राष्ट्र म्हणून आपण जसजसे उत्क्रांत होत जाऊ, तसतशा आपल्या गरजाही बदलणार आहेत. या बदलत्या गरजांनुसार आपल्याला संशोधन करावे लागेल, असा राष्ट्रपतींच्या भाषणाचा गाभा होता.

भारतासारख्या विकसनशील देशामध्ये जिथे गरजा आणि नवे शोध यांच्यात मेळ बसविला पाहिजे, तिथे अनेक प्रकारच्या मागण्या आहेत. राष्ट्र म्हणून या मागण्यांकडे पाहिले पाहिजे आणि व्यक्ती म्हणूनही या मागण्यांचा विचार केला पाहिजे. नव्या शतकाचा भारत म्हणून आज आपल्यासमोर प्रश्‍न आहे तो निरनिराळ्या प्रकारच्या पर्यावरणीय समस्यांचा. जागतिक स्तरावर आज या समस्येने भल्या-भल्यांना गतिमंद करून ठेवले आहे. कधीकाळी विकसित म्हणून ओळखल्या जाणार्‍या देशांनी केलेल्या पापांची शिक्षा आज आपल्या सगळ्यांनाच भोगावी लागत आहे. भारतासारख्या आशियायी देशाला यात स्वत:ची म्हणून काही परिमाणे निश्‍चित करून त्यावर संशोधन करावे लागेल. वायुप्रदूषण, जलप्रदूषण यासारख्या समस्यांच्या मुळाशी गेले तर आपल्याला असे दिसून येईल की, कचरा या सगळ्याच्या मुळाशी आहे. कचर्‍याची विल्हेवाट आपण योग्यप्रकारे लावू शकलो तर पर्यावरणासमोरचे मोठे प्रश्‍न टाळता येतील. येणारी पिढी अत्यंत पर्यावरणस्नेही आहे. त्याचे कारण या दशकभरात पर्यावरणीय प्रश्‍नांच्या बाबतीत झालेले संशोधन आणि विचार. याच पिढीतील बरीचशी मंडळी यापुढे विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या बाबतीत पुढे जाऊन काम करणार आहे. त्यांच्याच लहानमोठ्या संकल्पनांनाच यापुढे वाव द्यावा लागेल.

उत्पादकता वाढविण्याबाबतचे एक खूप मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. भारतीय शेतकरी मग ते कुठल्याही राज्यातून आलेले का असेनात, आज त्यांच्यासमोर कितीतरी प्रश्‍न उभे आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या खिशाला परवडेल अशा प्रकारच्या औषधांची व वैद्यकीय तंत्रज्ञानाची गरज हीदेखील महत्त्वाची असेल. अवकाळी पाऊस किंवा निसर्गाचा लहरीपणा हा आपल्यासमोरच्या शेतकर्‍यांसमोरचा सर्वात मोठा प्रश्‍न. हवामानाच्या अंदाजासंदर्भात मिळणारी अचूक माहिती ही आज काळाची गरज आहे. हवामान खात्याचे अंदाज हा आपल्याकडे चेष्टेचा विषय असतो. पाश्‍चिमात्त्य राष्ट्रांनी याबाबत जी अचूकता मिळविली आहे, ती कधीतरी आपल्यालाही मिळवावी लागेल. गुगलसारख्या सेवाही आज मोठ्या प्रमाणावर अचूक अंदाज वर्तवितात. ट्रॅफिक वगैरे तपासण्यासाठी गुगल नकाशाचा वापर इतक्या सर्रासपणे केला जात आहे की, त्याला तोड नाही.

आपल्याकडे काहीच चांगले घडत नाही, असे मुळीच नाही. गेल्या तीन ते चार वर्षांत आपण निर्माण केलेली शस्त्रास्त्रे, वीजपुरवठ्याचे तंत्र या आणि अशा कितीतरी विषयांमध्ये अनेक देश आपल्या सेवा मागत आहेत. अंतराळविज्ञानात तर आपला हात कुणीच धरू शकत नाही. त्यासाठी खर्च करण्याचीही त्यांची तयारी आहे. मात्र, प्रश्‍न असा उरतो की, याव्यतिरिक्त अशी अनेक क्षेत्रे आहेत, ज्यातील संशोधनासाठी आपल्याला तपशीलात जाऊन विचार करावा लागेल. नव्या जमान्याचे आणि आजच्या पिढीचे तंत्रज्ञान म्हणून ज्या गोष्टींकडे आपण पाहातो, त्यात भारतीय संशोधनाची स्थिती फारशी चांगली नाही. मोबाईल चालण्यासाठी लागणार्‍या आयओएस किंवा अ‍ॅण्ड्रॉईड या दोन्ही प्रणालींमध्ये आपले योगदान फारसे नाही. सिलिकॉन व्हॅलीत काम करणारे भारतीय ही श्रेणी आपण अभिमानाने सांगतो. मात्र, आज ग्राहकाभिमुख खरेदी-विक्रीचे सारे निकषच पूर्णपणे बदलणार्‍या अ‍ॅमेझॉन व फ्लिपकार्टसारख्या संकेतस्थळाची व त्याच्या अनुषंगाने सेवा पुरविणार्‍या व्यवस्थांची निर्मिती भारतीय नाही, हे वास्तव मानावे लागेल. या सार्‍यांमागची भारतीय मानसिकताच मुळी विचित्र आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे विशुद्ध संशोधनात न रमण्याची भारतीयांची वृत्ती. धातुशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र या विषयातले कितीतरी विद्यार्थी नंतरच्या काळात माहिती-तंत्रज्ञान, व्यवस्थापन शास्त्र यासारख्या विषयातले अभ्यासक्रम पूर्ण करून कुठल्याही कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर जाऊन बसलेले दिसतात; अन्यथा परदेशात जाण्याकडे त्यांचा कल असतो. यामुळे अनेकदा भारतीय करदात्यांच्या पैशावर शिकून परदेशात जाणारे आयआयटीचे विद्यार्थी टीकेचेही धनी होतात. जे काही तंत्रज्ञानविषयक संशोधन आपल्याकडे होते, ते सर्वसामान्यांच्या अवाक्यात कसे येईल, याचा आपल्याला विचार करावा लागेल. लोकाभिमुख संशोधन हाच पुढच्या काळातला परवलीचा शब्द मानला तरच आपल्याला पुढे जाता येईल.

@@AUTHORINFO_V1@@