सरकारी घर वाचवण्यासाठी मायावतीची धडपड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2018
Total Views |
 
 
लखनऊ : माजी मुख्यमंत्र्यांनी आपापले सरकारी निवासस्थान सोडण्याविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी आपले सरकारी निवासस्थान वाचवण्यासाठी धडपड करण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेश प्रशासनाने मायावती यांना घर सोडण्याविषयी नोटीस पाठवल्यानंतर मायावती यांनी तातडीने आपल्या घराबाहेर बसपा नेते कांशीराम यांच्या नावाचा मोठा फलक लावला आहे. जेणेकरून बहुजन समाजामध्ये पुन्हा एकदा भावनिक राजकारण करून हे सरकारी निवासस्थान बसपाचा अधिपत्याखाली यावे. दरम्यान मायावती यांच्या खेळीचा कितपत फायदा त्यांना होणार हे मात्र वेळच सांगेल.

उत्तर प्रदेश सरकारने न्यायालयाच्या आदेशानंतर तातडीने सर्व माजी मुख्यमंत्र्यांना आपापली निवासस्थाने सोडण्याची नोटीस पाठवली आहे. सरकारची ही नोटीस मिळाल्यानंतर मायावती यांनी आपल्या लखनऊ मॉल अॅवेन्यूमधील बंगला क्रमांक १३ ए बाहेर कांशीराम यांचा एक मोठा फलक लावला आहे. निळ्या रंगामध्ये हा भलामोठा फलक लावण्यात आला असून यावर कांशीराम यांचा एक फोटो देखील लावण्यात आला आहे. तसेच त्यापुढे हिंदीमधून 'श्री कांशीरामजी यादगार विश्रामस्थल' असा मजकूर लिहिण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांच्या मते मायावती यांनी हे मुद्दाम केले असून हे फलक लावण्याचा मूळ उद्देश म्हणजे हे एक वारसास्थळ आणि विश्रामगृह म्हणून घोषित केले जावे व यावर बसपाचे आधिपत्य यावे हा आहे. मायावती यांच्या या कृत्यानंतर मात्र अनेकांनी त्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.



दरम्यान मुख्यमंत्री निवासस्थानापासून काही अंतरावरच ९ मॉल अॅवेन्यू येथे मायावती यांचे स्वतःचे निवासस्थान असून त्यांचे हे निवासस्थान जवळजवळ ७० हजार चौ.फुटांमध्ये वसलेले आहे. या घराच्या देखील रंगरंगोटीचे काम जोरात सुरु झाले असून लवकरच मायवती याठिकाणी स्थलांतरी होणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशच्या सर्व माजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानांमध्ये मायावती यांचे हे निवासस्थान सर्वात मोठे असून सध्या त्याची किमत ही २५ कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे बोलले जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@