'पालघरसाठी योगी आदित्यनाथांची सभा, वसई-विरारमध्ये नवचैतन्य'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2018
Total Views |

पालघरच्या रणमैदानात भाजपकडून आणखी एक हुकमी एक्का


 
 
मुंबई : पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे रणमैदान आता तापू लागलेले असतानाच, भारतीय जनता पक्षाने आपल्याकडील आणखी एक हुकमी एक्का बाहेर काढला आहे. देशभरात विविध निवडणुकांच्या प्रचारसभा गाजवणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचारसभा विरारमध्ये घेतली जाणार आहे. दि. २३ मे रोजी होणाऱ्या या सभेच्या निमित्ताने वसई-विरारमधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसत आहे.
 
बुधवार, दि. २३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता विरार (पूर्व) येथील मनवेल पाडा तलाव भागात योगी आदित्यनाथ यांची ही सभा होणार आहे. पालघर पोटनिवडणुकीची तारीख आता जवळ येऊ लागली असून भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरला आहे. रविवारी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारसंघात दोन सभा घेतल्या. तसेच, इतरही अनेक बड्या नेत्यांच्या सभा येथे होणार आहेत. भाजप पूर्ण ताकदीनिशी रणमैदानात उतरल्याने विरोधकांच्या गोटात काहीशी चलबिचल असल्याचे जाणवत आहे. त्यातच, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही प्रचारासाठी येणार असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
  
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला व त्यानंतर योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनले. त्यानंतर गेल्या वर्षभरात आपल्या 'डॅशिंग' प्रतिमेमुळे योगींनी स्वतःची वेगळीच 'क्रेझ' निर्माण केली आहे. केवळ उत्तर प्रदेशातच नव्हे तर संपूर्ण देशभरात योगींची ही क्रेझ दिसत असून त्रिपुरा, कर्नाटक आदी राज्यांच्या निवडणुकीतही भाजपला याचा मोठा फायदा झाला आहे. कट्टर हिंदुत्ववादी नेते म्हणून प्रतिमा असलेले योगी आपल्या संस्कृतप्रचुर हिंदी भाषणाद्वारे जनसभा गाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळेच भाजपने योगींना पालघरमध्ये उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, वसई-विरार तसेच आसपासच्या प्रदेशात उत्तर भारतीय मतदारांची असलेली लक्षणीय संख्या पाहता 'योगी फॅक्टर' भाजपला फायदेशीर ठरू शकतो. आता या योगी आदित्यनाथांच्या खास गोरखपूरच्या मातीत घडलेल्या फर्ड्या वक्तृत्वाला वसई-विरारवासीय कसा प्रतिसाद देतात, हे येत्या बुधवारीच स्पष्ट होणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@