लुप्त होणारे पवना धरणातील वाघेश्वर मंदिर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2018
Total Views |
 


पवना नदीवर अजस्त्र अशा धरणाचे काम सुरु झाले. इतिहासाच्या बाबतीत आपले दुर्दैव हे की, ढासळत असणार्‍या वास्तू वाचवल्या जात नाहीतच, तर धडधाकट प्राचीन वास्तू जेव्हा धरणात अथवा रस्ता रुंदीकरणात जातात तेव्हा त्यांचा वाली देवसुद्धा नसतो. असाच एक फटका या पवन मावळात एका आडवाटेवरील मंदिराला बसला.
 
विस्तीर्ण पसरलेला सह्याद्री आणि त्याच्या कुशीत छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळातील सर्वसामान्य लोकांना घेऊन निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य आजही आदर्शवतच आहे. मावळातील सर्वसामान्य लोक मराठेशाहीच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र आले आणि त्यांना ‘मावळे’ संबोधले गेले. स्वराज्यात पश्चिमेकडे असलेला हा प्रदेश म्हणजे सूर्याच्या मावळतीची दिशा म्हणून त्याला ‘मावळ’ म्हणतात, अशी कथा सांगितली जाते. हा मावळ विस्तीर्ण असल्यामुळे त्याचे बारा भाग करण्यात आले. पवन, हिरडस, गुंजन, पौड, मुठा खोरे, कानद खोरे, मुसे खोरे, वळवंड खोरे, रोहिड खोरे, आंदर मावळ, नाणे मावळ आणि कोरबारसे मावळ. पवन मावळ हा त्यातील पहिल्या क्रमांकावर आहे. या मावळांचे रक्षण करण्यासाठी उत्तुंग असे लोहगड, विसापुर, तुंग, तिकोणा इ. गडकिल्ले सीमेवर छातीचा कोट करून उभे ठाकले आहेत. या पवन मावळात येण्यासाठी चौफेर बाजूला तळेगाव, उर्से, बऊर, आपटी व दुधिवरे खिंड आपले स्वागत करतात. निसर्गाने संरक्षित केलेल्या या पवन मावळाला छत्रपती शिवाजी महाराजांनी साद घातली, त्याचे नैसर्गिकदृष्ट्या वेगळेपण ओळखले आणि म्हणूनच सुरतेच्या पहिल्या लुटीतील संपूर्ण खजिना लोहगडावर संरक्षित ठेवला, ही आहे खासियत मावळाची! या मावळातील भाजे, कार्ले आणि बेडसे लेणी म्हणजे सह्याद्रीची आभूषणं! तर असा हा पवन मावळ मंदिर स्थापत्यात मागे राहील का? तर त्याचे उत्तर कदापि नाही असे आहे.
 
कालांतराने सुजलाम् सुफलाम् महाराष्ट्रात औद्योगिकीकरणाचे वारे वाहू लागले, मानवी वस्ती वाढली आणि अतिशय महत्त्वाच्या ठरणार्‍या पाण्यासाठी मोठमोठाली धरणं बांधायला सुरुवात झाली. मग पवन मावळ कसा मागे राहील? पवना नदीवर अजस्त्र अशा धरणाचे काम सुरु झाले. इतिहासाच्या बाबतीत आपले दुर्दैव हे की, ढासळत असणार्‍या वास्तू वाचवल्या जात नाहीतच, तर धडधाकट प्राचीन वास्तू जेव्हा धरणात अथवा रस्ता रुंदीकरणात जातात तेव्हा त्यांचा वाली देवसुद्धा नसतो. असाच एक फटका या पवन मावळात एका आडवाटेवरील मंदिराला बसला. पवनानगरच्या पुढे वाघेश्वर नावाचे टुमदार गाव वसले आहे. कोणे एकेकाळी या गावामागून पवना नदीच्या ओढीने धावत जाणारा टुमदार नाला वाहत होता. याच नाल्याच्या काठावर गर्द अशा झाडीत इथे यादवांच्या काळातील वाघेश्वराचे मंदिर उभे राहिले. शुष्कसांधीच्या स्थापत्यात रचलेले महादेवाचे मंदिर बाजूने वाहणारा नाला, गर्द झाडी आणि थंड वार्‍यात इथे दर्शनाला येणारे भाविक, तर प्रवास करणारे वाटसरू क्षणभर का होईना, इथे विसावत असत. या शांत अरण्यात कोकिळाचे गान, तो घंटेचा हळूवार नाद आणि एका वर एक रचलेले ते काळेकभिन्न दगडसुद्धा रोमांचित होत असतील. दूरून तुंग, तिकोणा, लोहगड आणि विसापूर हे उत्तुंग गड या मंदिराला मनोमन वंदन करत असतील.
 
काळ बदलला आणि पवना धरणाने या मंदिराचा घोट घेतला. औद्योगिकीकरणाच्या वावटळीत हे मंदिर सापडले आणि धरणाच्या पसरत चाललेल्या व्यासाने हे मंदिर पाण्यात लुप्त झाले. चिरावर चिरा रचलेले मुकं दगड पाण्यात बुडत गेले. छोट्या नाल्याच्या काठावर असलेले मंदिर नाल्यासकट धरणात गेले. हिमालयावर तांडव नृत्य करणारे शंभो महादेव धरणाच्या पाण्यात विसावले. गोंडस गणपती बाप्पाच्या मूर्तीसुद्धा या पाण्यात खोलवर गेल्या. ना कोणाला सोयर, ना कोणाला सुतक..... आता धरणाचे पाणी आटल्यामुळे हे मंदिर मी पाहावयास गेलो.
 
अवशेष, अवशेष आणि अवशेष... चोहीकडे पाहताना नकळत अश्रू तरळले. तरीसुद्धा देव आहे, हे तिथे गेल्यावर कळले. तो शांत, निपचित स्वरूपात हे सर्व पाहतोय, असा भास होत होता. काय वाटत असेल त्याला?
 
 
 
 
संपूर्णतः दगडी चिर्‍यांत रचलेले हे मंदिर धरणात पूर्ण बुडत असल्यामुळे ते काही वर्षांचे सोबती आहे, हे पाहूनच वाटते कारण दगडी चिरांना चहू बाजूंनी क्षाराच्या थरांनी गाठले आहे. कळस उद्ध्वस्त झाला असून, मंडप फक्त बाकी आहे. चौकट वितानात असलेल्या या मंदिराच्या वितानाच्या शिळा आज जागोजागी हाललेल्या असल्यामुळे फटी निर्माण झाल्या आहेत. मंदिराच्या चहू बाजूंना प्रचंड प्रमाणात अवशेषांचा ढिगारा झाला आहे. अप्रतिम अशी दीपमाळ तिथे नक्की असेल हे आता तिथे पडलेल्या अवशेषांवरून कळते. नाल्याला छोटासा घाट त्यानंतर वाहनमंडप त्यात अगाध कोरीवकामाचा नमुना असलेला नंदी त्यानंतर मुखमंडप पुढे रंगमंडप असण्याची दाट शक्यता, पुढे सभामंडप, अंतराळ आणि त्यानंतर दोन पायर्‍या उतरून, गर्भगृह असे परिपूर्ण रचनात्मक भव्य मंदिर असेल, अशा खुणा दिसून येतात. प्रवास करणारा वाटसरू नक्कीच इथे काहीवेळ विसावत असेल यात शंका नाही. काय सांगता येते, छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगडवरून जाताना इथे दर्शन घेतले असेल?
 
आज वाहनमंडपातील नंदी पूर्ण भग्न झाला असून, त्याच्या मुखाची शिळा तात्पुरती रचलेली दिसली. परंतु, त्यालासुद्धा आधार द्यावा लागला आहे. वाहनमंडप तर पूर्णतः नेस्तनाबूत झाला आहे. प्रवेशद्वारावर रत्नशाखा आहे, देव तिथे वास करतो असे म्हणतात. उंबरठ्यावर किर्तीमुख असून एक रत्न मध्यभागी आहे. द्वारललाटबिंबावर पार्वती असून, दुसर्‍या शाखेतील द्वारललाटबिंब भग्न झाले आहे. आतमध्ये स्तंभ काही चौकोनी तर काही गोलाकार आहेत. सभामंडपात रंगाशिला आहे की नाही ? हा प्रश्न अनुत्तरित राहतो. कारण, चार महिने पाण्याबाहेर दर्शन देणार्‍या मंदिरात लादी लावली असून, रंगशिला असल्यास ती गाडली गेली असावी, असे वाटते. सभामंडपातील देवकोष्ठ भग्न झाले आहेत, तर एका बाजूचे देवकोष्ठ अस्तित्वात नाही. याच सभामंडपात बारीक नजरेने पाहिल्यास एका बाजूला वितानमध्ये दैत्य आहे. हो! रागाने नाकपुड्या फुगवलेला, सुळे बाहेर आलेला आणि मोठी कर्णफुले परिधान केलेला हा दैत्य आजही आपल्याला घाबरवतो. अंतराळात गोंडस गणपती बाप्पांच्या दोन मूर्ती ठेवल्या आहेत. बहुतेक त्या बाहेरील देवकोष्टतील असाव्यात. दोन पायर्‍या उतरून आपण गर्भगृहात पोहोचतो तेव्हा शिवलिंगाचे दर्शन होते. लिगांवरील शाळुंका भग्न झाली असून, तिचा अर्धा भाग आतमध्ये तुटलेला दिसतो. समोरच देवता असून, तीसुद्धा जीर्ण होत चाललेली आहे. हे सर्व पाहता, त्या मंदिराची भव्यता डोळ्यांसमोर उभी राहते.
गावातील ज्येष्ठ लोकांच्या सांगण्यावरून या मंदिराच्या आजूबाजूला ७० वीरगळी होत्या, आज सातसुद्धा वीरगळ सुस्थितीत नाही, फक्त तुकडेच तुकडे! या मंदिराच्या परिसरात बर्‍याच समाधीशिळा दिसतात. ज्या या धरणातील गाळात अगदी रुतून बसल्या होत्या. समाजसेवक नवनाथभाऊ पायगुडेंच्या प्रयत्नामुळे या सर्व तत्परतेने काढून त्यांनी त्या मंदिराच्या जवळ आणून ठेवल्या आहेत. असे हे पवना धरणात लुप्त होणारे एके काळचे भव्य मंदिर व आपल्या पूर्वजांचा ठेवा म्हणून आपण एकदा तरी पाहावे म्हणून हा लेखप्रपंच!
 
 
 
 
 
- सागर सुर्वे

 
@@AUTHORINFO_V1@@