विशेष संपादकीय : वाघनखांचा आव आणि खंजीर खुपसण्याची वृत्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2018
Total Views |

 
एका निष्ठावान खासदाराच्या मृत्यूचा आपल्या घाणेरड्या राजकारणासाठी उपयोग करून घेण्याची शिवसेनेची ही वृत्ती गिधाडासमानच मानावी लागेल. गिधाडाला जसे कोण गेले, याच्याशी काहीच देणेघेणे नसते तसेच काहीसे शिवसेनेचे झाले आहे.
 

तोंडाने ‘आम्ही मर्द आहोत,’ असे म्हणत कृतीने ‘आपण किती बायकी आहोत?,’ हे शिवसेनेने पालघरमध्ये दाखवून दिले आहे. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नऊ वेळा निवडणूक लढविणार्‍या चिंतामण वनगांचे दुर्दैवी निधन झाले. भारतीय जनता पक्षासह संपूर्ण पालघर जिल्ह्यासाठीच हा धक्का होता. वनगांसारखा लोकहितासाठी विविध प्रकल्पांचा सातत्याने पाठपुरावा करणारा लोकप्रतिनिधी गमावल्याने पालघरमध्येही हळहळ व्यक्त झाली. साधेपणा आणि सचोटी, पक्षनिष्ठा ही वनगांची खासियत होती. त्यामुळेच ते लोकप्रियही होते. मात्र वनगांच्या निधनानंतर जे काही घडले, ते वनगांच्याही दिवंगत आत्म्याला वेदना देणारेच आहे. मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनगा कुटुंबीयांपैकीच कुणाला तरी तिकीट द्यायचा निर्णय घेतला. दोन तीन दिवसांत सर्वच पक्षांना विश्‍वासात घेऊन ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी त्यांचे प्रयत्न होते. अशा प्रकारचे राजकीय संकेत पाळण्याची रीत आहे. महत्त्वाचे म्हणजे अशी प्रथा पालघरचे आमदार कृष्णा घोडा यांच्या बाबतही पाळली गेली होती. विधानसभेला भाजप-शिवसेना वेगळे लढूनही कृष्णा घोडा यांचे चिरंजीव अमित घोडा यांच्या निवडीसाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घेतला होता. मुख्यमंत्री केवळ एवढे करून थांबले नाहीत तर त्यांनी अमित घोडा यांच्या विजयासाठी पालघर मतदार संघात सभाही घेतल्या होत्या. यामुळेच अमित घोडा यांचा मोठा विजय झाला. मात्र सध्या शिवसेनेला मित्राच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे उद्योग सुचत आहेत. त्यामुळे वनगांच्या मुलाला आपल्या पक्षाच्या माध्यमातून उभे करून शिवसेनेने मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.

 
 
सत्तेसाठी असले हीन राजकारण करण्याची सेनेची पहिली वेळ नाही. अनेकदा शिवसेना युतीच्या धर्माला जागलेली नाही. मात्र हा आता देवाघरी गेलेल्या मित्राच्या टाळूवरील लोणी खरडून खाण्याचा प्रकार मानला पाहिजे. शिवसेनेचा भाजपद्वेष किती टोकाला गेला आहे, हे या घटनांवरून लक्षात येईल. इतके असूनही भाजपशी सरळ लढाई घेऊन सरकारमधून बाहेर पडण्याची शिवसेनेत धमक नाही. कारण बाहेर पडताना सेनेचे कितीतरी लोक आतच राहतील, याची उद्धव ठाकरेंना पूर्ण कल्पना आहे. आज शिवसेनेला दिवंगत चिंतामण वनगा यांच्या चिरंजीवांचा कळवळा आला आहे. ज्या दिवशी चिंतामण वनगा गेले, त्या दिवशी शिवसेनेतले कुणीही त्यांच्यापर्यंत पोहोचले नव्हते. इतकेच काय तर आज ज्या उद्धव ठाकरेंना श्रीनिवास वनगांविषयी पान्हा फुटला आहे, तेदेखील वनगांच्या अंत्यविधीला पोहोचले नव्हते. आता केवळ भाजपचा पराभव व्हावा म्हणून शिवसेना हे गलिच्छ राजकारण खेळत आहे. ही निवडणूक झाली की श्रीनिवास वनगा यांच्याशी शिवसेनेचे कुठलेही नाते नसेल.
 
महाराष्ट्राने अनेक प्रकारची राजकारणे पाहिली आहेत, परंतु इतके हीन आणि गलिच्छ प्रकारचे राजकारण कुणीही केलेले नाही. एका निष्ठावान खासदाराच्या मृत्यूचा आपल्या घाणेरड्या राजकारणासाठी उपयोग करून घेण्याची शिवसेनेची ही वृत्ती गिधाडासमानच मानावी लागेल. गिधाडाला जसे कोण गेले याच्याशी काहीच देणेघेणे नसते तसेच काहीसे शिवसेनेचे झाले आहे. आता मतदारांनाच ठरवावे लागेल की, अशा घाणेरड्या राजकारणात शिवसेनेला साथ द्यायची की, आपल्या पक्षनिष्ठा भक्कम ठेवलेल्या चिंतामण वनगांचा भाजपच निवडून द्यायचा. कारण असल्या राजकारण्यांना मतदान करणे म्हणजेच त्यांच्या कारस्थानात सहभागी होण्यासारखेच आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@