मुंबईत पाणी तुंबल्यास शिवसेनाच जबाबदार !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2018
Total Views |
 
 

 
 
मुंबई, (नितीन जगताप) : स्वतःचे अपयश लपविण्यासाठी इतरांना दोषी ठरवण्याचा उलटा उद्योग शिवसेना कायमच करत आली आहे. आताही नालेसफाईच्या बाबतीत पालिका प्रशासनाला, नालेसफाई कंत्राटदारांना जबाबदार न धरता, राज्य सरकारलाच दोष देण्याचा केविलवाणा प्रयत्न शिवसेनेने सुरु केला आहे. पण, कितीही आटापिटा केला, हात झटकले तरी परिस्थिती मात्र बदलणार नाही. त्यामुळे मुंबईची ‘तुंबई’ झाली तर त्याची जबाबदारी शिवसेनेचीच असेल...
 
मान्सूनपूर्व नालेसफाई वेळेवर आणि व्यवस्थित होत नसल्याने मुंबईत नेहमीच पालिकेच्या नालेसफाईचा फज्जा उडतो. दरवर्षी मुंबई तुंबते आणि हे महानगर ठप्प होते. पण, तरीही पालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि सुस्त प्रशासनाला अद्यापही जाग आलेली दिसत नाही. केरळमध्ये मान्सूनचे २९ मे रोजी आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तेथे मान्सून दाखल झाल्यानंतर सात ते आठ दिवसांत महाराष्ट्रातही मान्सूनचे आगमन होते. त्यातच मुंबईत कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे जागोजागी तुंबलेल्या पाण्यामुळे शहराची गतीही मंदावते. मुंबईत २६ जुलै २००५ चा महापूर आणि २९ ऑगस्ट २०१७ रोजी झालेली अतिवृष्टी या घटनांमध्ये निष्पाप नागरिकांचे बळी गेले. कारण, पाण्याचा निचरा न होणे, हे पाणी तुंबून राहण्यामागील मुख्य कारण मानले जाते. मुंबईतील विविध भागातील मलनिस्सारण वाहिन्यांतील मलजल वाहून, नाल्याद्वारे समुद्राला मिळते. परंतु, नाल्यातील कचर्‍यामुळे पाणी वाहून न जाता ते तेथेच जमा होते. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास पूरपरिस्थिती निर्माण होते.
 
२६ जुलैच्या महापुरानंतरही अनेकदा तशीच बिकट परिस्थिती उद्भवली तरीही मुंबई महापालिकेने यामधून धडा घेतल्याचे दिसत नाही. कारण, मुंबईवर ‘करुन दाखवले’ म्हणून सत्ता गाजविणारी शिवसेना नेहमीच सगळे खापर प्रशासनावर फोडण्यास धन्यता मानते. नालेसफाईसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. परंतु, त्या तुलनेत ‘सफाईदार’ काम मात्र कुठे दिसत नाही. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे आता कुठे धीम्या गतीने सुरु झाली आहेत. प्रामुख्याने कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार्‍या या कामांसाठी यंदा १५४ कोटी खर्च अपेक्षित आहे. यापूर्वी पावसाळ्याअगोदर ६० टक्के आणि पावसाळ्यात २० टक्के आणि पावसाळा संपल्यावर २० टक्के नालेसफाई करण्यात येत होती. परंतु, गेल्या वर्षी झालेली अतिवृष्टी पाहता यंदा पावसाळ्यापूर्वी ७० टक्के आणि उर्वरित नालेसफाईची कामे पावसाळ्यानंतर करण्यात येणार आहेत. या वर्षी मोठ्या नाल्यांमधून चार लाख ९४ हजार ७३९ टन एवढा गाळ काढण्यात येणार आहे. यापैकी ७० टक्के म्हणजे तीन लाख ४६ हजार ३१८ टन गाळ पावसाळ्यापूर्वी, तर उर्वरित ३० टक्के गाळ पावसाळ्यानंतर काढला जाईल. तसेच छोट्या नाल्यांमधून पावसाळ्यापूर्वी ७० टक्के म्हणजेच दोन लाख २३ हजार ५७० टन, तर उर्वरित ३० टक्के गाळ पावसाळ्यानंतर काढण्यात येणार असल्याचे पालिकेच्या आढावा बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
 
 
 
दि. १ एप्रिलपासून नालेसफाईच्या कामांना मुंबईत सुरुवात झाली आहे. पण, आज दीड महिना उलटला तरी नाल्यातील गाळ अद्यापही नाल्यातच दिसून येतो. त्यामुळे पालिकेकडून नालेसफाईचा केवळ दिखावा सुरु आहे का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. उलट, नालेसफाईवरून सत्ताधारी शिवसेनेने राज्य सरकारवर खापर फोडण्याचे काम सुरू केले आहे. त्यातच मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर नुकतेच बोलून गेले की, “मुंबई तुंबली तर ती मेट्रोच्या कामांमुळे.” त्यामुळे महापौर आणि शिवसेनेने मुंबई यंदाही तुंबणार हे जणू गृहीत धरुन त्याची जबाबदारी आधीच मेट्रोच्या कामांवर, पर्यायाने राज्य सरकारवर ढकलल्याचे दिसते. जर मेट्रो किंवा इतर प्रकल्पांमुळे नालेसफाईच्या कामात काही अडथळा निर्माण होत असेल, तर संबंधित प्राधिकरणाशी संवाद साधून, चर्चेतून मार्ग काढायला पाहिजे. पण, शिवसेना चर्चा न करता केवळ राज्य सरकारवर आरोप करत आहेत. त्यामुळे अजूनही नालेसफाईच्या कामाला अपेक्षित गती मिळालेली नाही.
 
पाऊस अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. जोरदार पाऊस झाला आणि पाणी साचले तर सामान्य नागरिकांचे हाल होणार आहेत. आपले काम कमी झाले किंवा आपण कमी पडलो, हे मान्य करून त्यांनी चूक सुधारायला हवी. परंतु, आपली चूक झाकण्यासाठी दुसर्‍यावर खापर फोडण्याचे काम शिवसेना करत आहे.
 
नालेसफाईच्या कामाचा पाहणी दौरा दीड महिन्यांनंतर आयोजित केला गेला. सुरुवातीच्या काळात तो आयोजित केला असता, तर कदाचित कामाला गती आली असती. दीड महिन्यांत ३० ते ४० टक्के नालेसफाई झाल्याचे खुद्द महापौरांनी सांगितले आहे. पालिकेतील सत्ताधारी पक्ष म्हणून शिवसेनेचा अधिकार्‍यांवर वचक असायला हवा, पण तो अजिबात दिसत नाही. त्यामुळे अधिकारी कामाकडे साफ दुर्लक्ष करतात. सध्या जी नालेसफाईची कामे सुरू आहेत, त्याचे कंत्राट काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारांना पुन्हा एकदा देण्यात आले आहे. त्यामुळे अशा कंत्राटदारांवर पुन्हा मेहेरबानी का, असा सवाल उपस्थित होतो. त्यातच कंत्राटदारांनी किती गाळ उपसला आणि तो कुठे टाकला, याची माहितीही पालिकेने जाहीर केलेली नाही. त्यामुळे उद्या मुंबई तुंबल्यास इतर कुणी नाही तर त्याला शिवसेनाच जबाबदार असेल!
 
@@AUTHORINFO_V1@@