भाषा भावनांची...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2018
Total Views |
 

 
"आजकाल खूप उद्धटपणाने बोलायला लागला आहे. आत्ताशी चार वर्षांचा आहे, पण सर्रास उलट उत्तरं देतो. राग तर सतत नाकावर बसलेलाच. शाळेतूनही तक्रारी यायला लागल्यात आता, की हा इतर मुलांना मारतो, ढकलतो, चिमटे काढतो म्हणून. खेळतानाही सारखी मारामारीची आणि लढाईचीच भाषा. खेळण्यांची मोडतोड तर इतकी की आता मी नवीन खेळणी आणायचंच बंद केलंय. इतका हिंसक का वागतो कळतच नाही. आमच्या घरात तर कुणी सहसा आवाज चढवून बोलतही नाही.” माझी मैत्रीण मला तिच्या मुलाबद्दल सांगत होती. ती कुटुंबाबद्दल जे सांगत होती ते अगदी खरं होतं. तिच्या घरातले सगळेच लोक मृदुभाषी आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे इवलेसे युवराज त्यांच्या वागण्यातून प्रश्न निर्माण करत होते.
 
मुलांचे वर्तन ही खरेतर त्यांची प्रतिक्रिया असते; स्वतःच्याच भावनिक उलथापालथींना दिलेली. दोन ते सहा या वयोगटातील मुलेही खूप भावनिक टप्प्यांमधून जात असतात. अर्थात त्यावर प्रतिक्रिया देण्याची प्रत्येक मुलाची पद्धत वेगळी. अशावेळी योग्य प्रकारे भावना व्यक्त करण्याचे शिक्षण मुलांना देणे गरजेचे ठरते; नुसतीच शिक्षा कामाची नाही. या वयात स्वत्वाची जाणीव विकसित होऊ लागलेली असते. इतरांपेक्षा मला काहीतरी वेगळे म्हणायचे आहे हे मांडायचा प्रयत्न होतो. घराच्या बाहेरील जगात प्रवेश होतो. शाळेत वेगवेगळे अनुभव येत असतात. काही मुलांच्या आयुष्यात या काळात लहान भावंडांच्या जन्मासारखी मोठी घटना घडते. अशा अनेक गोष्टींतून मुलांच्या मनात भावनांचे कल्लोळ उठतात. ते समंजसपणे व्यक्त करण्याइतकी भाषा समृद्ध झालेली नसते. अशावेळी मुले विविध प्रकारे व्यक्त होतात. त्यामुळे केवळ त्यांच्या बाह्य वर्तनाला प्रतिक्रिया देणे प्रभावी ठरत नाही.
 
मुलांच्या भावनिक विश्वात शिरण्यासाठी पालक काहीवेळा खूप कल्पक गोष्टींचा वापर करतात. माझ्या ओळखीचा एक बाबा रोज रात्री त्याच्या मुलीबरोबर गोष्ट पूर्ण करण्याचा खेळ खेळतो. एक वाक्य बाबाने सांगायचे, एक वाक्य लेकीने. १०-१५ मिनिटांच्या या कार्यक्रमातून बर्‍याचदा दिवसभरात मुलीला आलेल्या बर्‍या-वाईट अनुभवांची नकळत उजळणी होते आणि आई-बाबाला मुलीच्या मनःस्थितीचा अंदाज येतो. त्यावरून तिच्या चिडचिडीला, घुमेपणाला योग्य दिशा देणे त्यांना जमते. मुलांच्या वर्तनापाठीमागची करणे समजून घेऊन, त्या वर्तनावर नोंदवलेले कौतुक किंवा नाराजी मुले जास्त सकारात्मकरीत्या स्वीकारतात. ’गुड गर्ल/बॉय’, ’बॅड गर्ल/बॉय’ यासारखे सरसकट शिक्का मारणारे शब्द फार तापदायक आहेत. कारण कालच ’गुड’ चा शेरा मिळाल्यावर आज आपण ’बॅड’ कसे झालो? हे कोडे मुलांना कसे सुटणार बरे? त्यापेक्षा ’तुझे हे वागणे मला आवडले नाही’ असे स्पष्ट सांगितल्यास लक्ष वागण्यावर केंद्रित होते आणि सुधारणेची शक्यता वाढते.
 
मुलांचा भावनिक शब्दसंग्रह वाढवण्यासाठी त्यांच्या भावनांना नाव देणे फायद्याचे ठरते. नुसताच आकांडतांडव करणार्‍या एखाद्या मुलाला ’बाप रे, तुला भलताच राग आलेला दिसतोय’ अशी प्रतिक्रिया दिली तर कालांतराने मूल आपल्या शरीरात-मनात चाललेला गोंधळ जाणून ’मला खूप राग आलाय’ असे व्यक्त होऊ शकते. मुलांना भावनांची भाषा शिकवण्याचा आणखी एक प्रभावी मार्ग म्हणजे, पालकांनी आपल्या भावना मोकळेपणाने मुलांसमोर व्यक्त करणे. यात मुलांविषयी वाटणारे प्रेम व्यक्त करणे इतकेच अपेक्षित नाही तर आपल्याला झालेले दुःख, वाटलेली भीती हेदेखील आवर्जून व्यक्त करावे. मध्यंतरी माझी सहा वर्षाची लेक आणि मी ’तोत्तोचान’ पुस्तक वाचत होतो. रोज एक-दोन गोष्टी असे करत पुस्तकाचा शेवट आला. या काळात आम्ही दोघीही ’तोत्तोचान’च्या भावविश्वात गुंतलो होतो. शेवटचा चॅप्टर वाचताना मला खूप भरून आले, माझा आवाज दाटून आला, डोळे ओलावले. लेकीने शांतपणे मला मिठी मारली आणि माझ्या गालावर तिच्या चिमुकल्या हाताने थोपटत राहिली. ‘अणुबॉम्ब,’ ‘बेचिराख’ हे शब्द तिला कळले नसतील, कदाचित पण त्यापाठीमागची भावना तिच्या मनाला भिडली हे निश्चित. पालकांच्या वर्तनाचे निरीक्षण करत मूल जे शिकते त्याचे माणसाच्या विकासात खूप महत्त्वाचे योगदान आहे.
 
 
 
 
 
- गुंजन कुलकर्णी 
(लेखिका नाशिक येथे बाल व कुटुंब मनोविकासतज्ज्ञ आहेत.)
 
@@AUTHORINFO_V1@@