लगीन लोकाचं आणि...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2018
Total Views |


 
 
आताही येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेला काँग्रेस आणि जेडीएसचा मुका घ्यावासा वाटला. कदाचित काँग्रेसी वा जेडीएससारख्या भंपकांच्या पायाचे तीर्थ घेतल्याने आपले दुखणे बरे होईल, अशी आशा शिवसेनेला वाटत असावी. त्यातूनच काँग्रेसला पाठिंबा देण्याची आणि भाजपला विरोध करण्याची सेनानेत्यांना बुद्धी झाली.
 
आपण आयुष्यात जिंकू शकणार नाही, याची ठाम खात्री पटली की, लोक दुसर्‍यांच्या पराभवात आपला विजय शोधतात. अशीच अवस्था कर्नाटकमध्ये भाजप नेते येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेची झाली. भाजपच्या पराभवासाठी देव पाण्यात बुडवून बसलेल्या शिवसेनेला येडियुरप्पांच्या राजीनाम्यामुळे आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. याच आनंदाच्या भरात “हुकूमशाही व मनमानीच्या अंताची ही सुरुवात आहे. कर्नाटकात जे घडले ते लोकशाहीविरोधी होते. आपण कोणत्याही मार्गाने निवडणुका जिंकू शकतो आणि सत्ता आणू शकतो, या विकृतीचा हा पराभव आहे,” अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी दिली.
 
आयुष्यभर हुजरेगिरी करणार्‍यांनी शेजार्‍यांच्या पोरांसाठी मांडव टाकायला जाणे म्हणजे काय, हे शिवसेनेच्या या तोंडपाटीलकीवरून लक्षात येते. काँग्रेसच्या सलाईनवर प्रारंभापासून तगून राहिलेल्या सेनेकडून यापेक्षा दुसरी काही अपेक्षाही करता येत नाही, हेही खरेच म्हणा. दुसरीकडे शिवसेना आज काँग्रेस आणि जेडीएसच्या आघाडीला पाठिंबा देत ती खरी लोकशाही असल्याच्या गमजा मारते, पण भाजपने नेहमीच जनादेशाचा आदर केल्याचे सेनेला स्मरत नाही. अटल बिहारी वाजपेयींनी फक्त एक मत कमी पडत होते, तरीही घोडेबाजार न करता पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याचे धाडस दाखवले. हे उदाहरणही २०-२२ वर्षांपूर्वीचेच आहे, पण भाजपद्वेषाने पछाडलेल्यांना ते दिसणार नाही. येडियुरप्पा यांनीही कर्नाटकचा जनादेश आपल्या बाजूने असूनही संख्याबळ जमले नाही म्हणून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणे पसंत केले. ही भाजपची लोकशाही आहे. पण शिवसेना आज ज्यांचे गोडवे गाते, त्या काँग्रेसचा इतिहासच लोकशाहीची हत्या करण्याचा आहे. गेल्या ६०-७० वर्षांत काँग्रेसने ३० पेक्षा जास्त सरकारे बरखास्त करून, सत्ताधारी वा बहुमत मिळालेल्या पक्षाचे आमदार फोडून, राज्यपालपदाचा गलिच्छ वापर करून आपली सरकारे स्थापन केली. गुजरात, हरियाणा, राजस्थान इथली अशी कित्येक उदाहरणे सर्वांसमोर आहेत. पण ज्यांना भाजपद्वेषाची कावीळ झाली आहे, त्यांना काँग्रेसचे हे लोकशाहीचा गळा घोटण्याचे कृत्यही संजीवनीसारखेच वाटणार.
 
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत यंदा मुख्यमंत्री सिद्धरामैय्या आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील १७ मंत्री सपशेल तोंडावर आपटले. जनतेने काँग्रेसी मुख्यमंत्र्याला सरळसरळ झिडकारले. कदाचित हे झिडकारणेही शिवसेनेला प्रशस्तिपत्रासारखेच वाटत असावे. कुमारस्वामींच्या जेडीएसची तर कर्नाटक निवडणुकीत १०४ जागांवर अनामत रक्कम जप्त झाली. त्या पक्षाचे फक्त ३८ उमेदवार जिंकून आले. एवढे होऊनही कुमारस्वामींनी मुख्यमंत्रिपदासाठी लगीनघाई सुरू केली. काँग्रेसचीही सत्तालोलुपता इथे उफाळली. ‘जहाँपनाह तुस्सी ग्रेट हो’ म्हणत काँग्रेसने कुमारस्वामींना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. इथे काँग्रेस आणि जेडीएसला जनतेचा कौल आपल्या विरोधात असल्याचे दिसले नाही का? की दिसत असूनही तो स्वीकारण्याची हिंमत झाली नाही? ही लोकशाहीची हत्या नाही का? उठसूट लोकशाही म्हणजे काय यावर प्रवचने झोडणार्‍यांना ही असली लोकशाही मान्य आहे का? शिवसेनेला लोकशाहीची हीच संकल्पना हवी आहे का? माना डोलावत काँग्रेस-जेडीएस आघाडीची हितचिंतक झालेल्या शिवसेनेने याची उत्तरे नक्कीच द्यावीत.
 
येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतेवेळी म्हटले की, “एकवेळ सत्ता मिळाली नाही तरी चालेल. आम्ही पुन्हा जनतेत जाऊ आणि बहुमत मिळवून लोकशाही मार्गानेच सरकार स्थापन करू.” यातून औटघटकेच्या सत्तेपेक्षा भाजपने संविधान आणि लोकशाही व्यवस्थेला महत्त्व दिल्याचेच स्पष्ट होते. पण ही सुसंस्कृतता शिवसेनेला दिसली नाही. कशी दिसणार म्हणा? कारण शिवसेनेचे खरे दुखणे निराळेच आहे. त्या दुखण्यावरचा नेमका उपाय सापडत नसल्याने सेनेने गेल्या तीन-चार वर्षांपासून कोणाच्याही मांडीला मांडी लावण्याचे उद्योग केले. आताही येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेला काँग्रेस आणि जेडीएसचा मुका घ्यावासा वाटला. कदाचित काँग्रेसी वा जेडीएससारख्या भंपकांच्या पायाचे तीर्थ घेतल्याने आपले दुखणे बरे होईल, अशी आशा शिवसेनेला वाटत असावी. त्यातूनच काँग्रेसला पाठिंबा देण्याची आणि भाजपला विरोध करण्याची सेनानेत्यांना बुद्धी झाली.
 
आपल्या मागून येऊन भाजपसारखा पक्ष राज्य काबीज करतो, देशावर एकहाती सत्ता स्थापन करतो आणि आपली अवस्था मात्र ‘ना घर का ना घाट का’ अशी होते, ही शिवसेनेची खरी सल आहे. शिवसेनेची ही रुखरुख नेहमीच दिसून येते. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याला विकासाच्या दिशेने वेगाने घेऊन जात असताना शिवसेना गेल्या चार वर्षांपासून फक्त विरोधासाठी विरोध करताना दिसते. फडणवीस सरकारने कोणताही निर्णय घेतला की सेनानेत्यांच्या तोंडातून विद्वेषाच्या गुळण्याच बाहेर पडल्या. समृद्धी महामार्गासारखा शेतकरी, लघुउद्योजक आदी सर्वांच्याच आयुष्याला कलाटणी देणारा प्रकल्पही शिवसेनेला नकोसा झाला. कोकणातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पालाही शिवसेनेने अगदीच बिनडोकपणे विरोध केला. त्यापासून कोकणची प्रगती होऊन रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध होतील हेही राडेबाजी करणार्‍या सेनेच्या लक्षात आले नाही. मुद्दा कोणताही असो, शिवसेना प्रत्येकवेळी भाजपला कसा अपशकुन होईल यासाठीच माकडउड्या मारताना दिसते. अशा उड्या मारण्याचा प्रयत्न शिवसेनेने दिल्ली, बिहार, गोवा, गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड अशा सर्वच ठिकाणी केला. पण नुसतं वाघ वाघ म्हणून उडी मारणं पुरेसं नसतं. जिंकण्याची इच्छाशक्तीही असावी लागते. जी सेनेकडे नाही, म्हणून त्या सर्वच राज्यांत वाघाची मनीमाऊ झाली. कर्नाटकच्या निवडणुकीतही सेनेनेअशीच ‘वाघ वाघ’ म्हणत उडी मारली. पण जे हाती लागण्याची अजिबातच शक्यता नसते, ते मिळवण्याची धडपड केली की, जे होते तेच सेनेचे झाले. शिवसेनेने ज्या ज्या ठिकाणी आपले उमेदवार उभे केले, त्या सर्वच ठिकाणी त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. परराज्यात १०० टक्के अयशस्वी होण्याची परंपरा शिवसेनेने इथेही जपली.
 
ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा एकमेव पक्ष, अशी शिवसेना स्वतःची ओळख सांगते. कर्नाटकात मात्र असंख्य हिंदूंच्या हत्या करणार्‍या, हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतानचे समर्थन करणार्‍यांचे, त्याची जयंती साजरी करणार्‍यांचे, हिंदूंमध्ये फूट पाडून लिंगायतांना वेगळे करण्याचा डाव रचणार्‍यांचे सरकार येण्याची शक्यता आहे. शिवसेना आता अशा लोकांच्या संगतीत राहण्यातच धन्यता मानायला लागल्याचे तिच्या एकूणच भूमिकेवरून दिसते. मागे सेनेने प. बंगालच्या मुख्यमंत्री, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचेही समर्थन केले होते. ममतांच्या राज्यात हिंदूंची अवस्था अतिशय वाईट झाल्याचे तिथे वेळोवेळी घडणार्‍या घटनांवरून नेहमीच उघड होते, पण शिवसेनेला ममतांच्या साथीने उभे राहणे, हीदेखील हिंदुत्वाची सेवा वाटत असावी. आता तर शिवसेनेला हिंदुत्वाची सेवा करण्यासाठी टिपू सुलतानाची जयंती साजरी करणार्‍यांच्या, लिंगायतांना हिंदूंपासून तोडणार्‍यांच्या पालखीचेही भोई व्हावेसे वाटले. यावरून शिवसेनेचे हिंदुत्वही बेगडीच असल्याचे कोणीही सांगू शकेल. अशावेळी शिवसेनेने स्वतःची हिंदुत्वाची व्याख्या तपासून पाहावी. त्यात टिपू सुलतानाची आरती गाण्याचाही मुद्दा ठेवावा. म्हणजे हिंदूंनाही शिवसेनेचे खरे रूप कोणते? हे नेमकेपणाने समजेल.
 
 
@@AUTHORINFO_V1@@