कृषी विभागामार्फत २४ मे पासून उन्नत शेती, समृध्द शेतकरी पंधरवडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2018
Total Views |
जळगाव :
२०२२ पर्यत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्दिष्टपुर्तीसाठी राज्यात २४ मे ते ७ जून, २०१८ या रोहिणी नक्षत्राच्या कालावधीत उन्नत शेती, समृध्द शेतकरी पंधरवडा राबविण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाचे आयुक्त (पुणे) यांनी दिली.
 
 
कृषी विभागामार्फत शेती विकासाच्या तसेच शेतकरी कल्याणाच्या विविध योजना व कार्यक्रम राज्यात राबविल्या जातात. मागील वर्षापासून खरीप व रब्बी हंगामात उन्नत शेती, समृध्द शेतकरी मोहीम राबविण्यात येत आहे. प्रचलित योजनांच्या अंमलबजावणीत अधिक सुटसुटीतपणा तसेच सुसूत्रता आणुन योजना पारदर्शकरित्या अधिक प्रभाविपणे राबविण्याचा शासनाचा उद्देश आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात रोहिणी नक्षत्रातील पंधरा दिवस उन्नत शेती, समृध्द शेतकरी हा तंत्रज्ञान प्रचार व प्रसार पंधरवडा साजरा करुन आधुनिक कृषी तंत्रज्ञान राज्यातील सर्व शेतकर्‍यांपर्यंत पोहचविले जाणार आहे.
गावामधील कार्यक्रमाच्या आयोजनाकरीता गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कृषि विज्ञान मंडळ, सर्व शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषि विज्ञान केंद्रे, गावाशी संबंधित राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँक शाखा, आत्मा समितीतील सदस्य, इतर कृषि संलग्न विभागाचे ग्रामस्तरीय कर्मचारी/अधिकारी यांचेशी समन्वय साधून उपरोक्त उद्देशपूर्तीसाठी पंधरवडा दरम्यान विविध कार्यक्रम/चर्चासत्रे/बैठका/कार्यशाळा यांचे आयोजन करण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा, असे कृषी विभागामार्फत आवाहन केले आहे.
 
 
यांचा असणार सहभाग
महाराष्ट्र शासन, कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, महसूल विभाग, जिल्हा परिषद कृषि विभाग, पशुसंवर्धन विभाग, दुग्धविकास विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग, रेशिम व मधुमक्षिका विभाग, कृषि विज्ञान केंद्रे, आदिवासी विकास विभाग, वन विभाग, सहकार विभाग, शेतकरी उत्पादन कंपन्या, पिकनिहाय उत्पादक संघ, पणन विभाग, राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँका यांचा त्यात सहभाग राहणार आहे.
अशी राहील कार्यपद्धती
गावस्तरावरील कार्यक्रम प्रभावी होण्यासाठी तालुक्यातील प्रगतशील शेतकरी/ कृषि पुरस्कार प्राप्त/पीकस्पर्धा विजेते शेतकरी यांमधून काही शेतकर्‍यांची निवड करुन त्यांना प्रेरित करण्यासाठी तालुकास्तरावर एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेद्वारे प्रेरित शेतकर्‍यांच्या मार्गदर्शनाचा लाभ गावपातळीवरील कार्यक्रमांमधून इतर शेतकर्‍यांना मिळवून देण्यात येणार आहे.
 
पंधरवडा आयोजनाचा उद्देश :
* आधुनिक आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा प्रसार.
* जमिनीची सुपिकता वाढविण्याच्या दृष्टीने उपाययोजनांबाबत मार्गदर्शन.
* पीक विमा योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणार्‍या नुकसानीपासून पिकांना विमा संरक्षणाबाबत मार्गदर्शन.
* पीक उत्पादनात स्थैर्य राखत उत्पादन खर्च कमी करणे आणि प्रति थेंब अधिक पीक या संकल्पनाबाबत जनजागृती व मार्गदर्शन.
* कापसावरील शेंदरी बोंडअळी, भातावरील तपकिरी तुडतुडे आणि सोयाबीनवरील मोझॅक व पिवळा मोझॅक यांच्या एकात्मिक कीड/रोग व्यवस्थापनाबाबत जनजागृती व मार्गदर्शन.
* कापसावरील शेंदरी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी फेरोमन ट्रॅप (कामगंध सापळे) आणि ट्रायकोकार्डसचे महत्व व वापराबाबत जनजागृती व मार्गदर्शन.
* मोबाईलधारक शेतकर्‍यांना मोफत एस.एम.एस. सेवेचा लाभ व्हावा म्हणून एम-किसान पोर्टलवर शेतकर्‍यांची नोंदणी.
* गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सहभाग वाढविण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती.
* किडनाशके हाताळणी आणि फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत शेतकर्‍यांमध्ये जनजागृती व मार्गदर्शन.
* जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून तयार झालेल्या जलसाठ्यांमधील पाण्याच्या संरक्षित सिंचनासाठी वापराबाबत जनजागृती
* कृषि संलग्न व कृषी पूरक व्यवसाय जसे पशुपालन, मधुमक्षिका पालन, मत्स्यशेती, रेशीम उद्योग आदींच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे निव्वळ आर्थिक उत्पन्न वाढविण्याकरीता मार्गदर्शन.
* विविध योजना/अभियान/ उपक्रम आदींची माहिती, कार्यपद्धतीबाबत जनजागृती.
@@AUTHORINFO_V1@@