‘कोकण कॉन्क्लेव्ह’ची तयारी सुरू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2018
Total Views |

 
 
 
 
परदेशी उद्योजकांचे स्वागत करण्यासाठी कोकण सज्ज
 
 
मुंबई: रविवार दि. २० मे रोजी मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये ’कोकण कॉन्क्लेव्ह’चे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. या कॉन्क्लेव्हमध्ये जगातील ५० देशांचे उद्योजक सहभागी होणार असून त्यांच्या स्वागतासाठी कोकणवासी सज्ज झाले आहेत. कोकणातील पर्यटन, अन्न आणि अन्नप्रक्रिया उद्योगांना जागतिक व्यापार पटलावर आणण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील ५०० उद्योजक यात सहभागी होणार आहेत.
 
सहारा स्टार हॉटेलमध्ये होणार्‍या दोन दिवसांच्या कार्यक्रमात जगातील ५० देशांतील उद्योजक विविध विषयांवर आयोजित परिसंवादात सहभागी होतील, तसेच परदेशातून येणार्‍या उद्योजकांसोबत आणि भारतातून आलेल्या गुंतवणूकदारांसोबत व्यावसायिक चर्चाही करतील. दि. २१ मे रोजी कोकणातील उद्योजकांसाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉ. प्रेम जग्यासि यांच्या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण कॉन्क्लेव्हचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार असून केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री के. जे. अल्फोन्स, आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल, बंदरे-नौकानयन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, अतुल भातखळकर आमदार, अमित साटम, मसाला किंग धनंजय दातार आणि विविध विषयांचे तज्ज्ञ या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
 
परदेशातून आलेले उद्योजक २१ मे रोजी रायगड, २२ मे रोजी रत्नागिरी आणि २३ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भेटीवर जाणार आहेत. या भेटीत पर्यटनस्थळे आणि लघुउद्योगांना भेट देण्यात येणार आहे. ‘रीव्हर्स ऍण्ड माउंट्स’ने या उपक्रमाचे आयोजन केले असून कोकणातील अनेक सामाजिक संस्थांचे सहकार्य या उपक्रमाला लाभले आहे. परदेशातील पर्यटन क्षेत्रातील दिग्गजांनी कोकणच्या पर्यटनस्थळांना भेट दिल्यामुळे या क्षेत्रातील पर्यटनाला उत्तम चालना मिळणार असून अन्नप्रक्रिया उद्योगातील लोकांनाही जागतिक पातळीवरील उद्योगांशी थेट संपर्क साधण्याची संधी मिळणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक दिनेश कानजी आणि समीर गुरव यांनी दिली आहे.
@@AUTHORINFO_V1@@