दक्षिणी कन्नडिगांचा कौल कुणाला?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2018   
Total Views |



दि. १२ मे रोजी कर्नाटक विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. आता कर्नाटकात विविध राजकीय पक्षांचा प्रचारही शिगेला पोहोचला आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’चे प्रतिनिधी निमेश वहाळकर आणि जयदीप दाभोळकर हे सध्या कर्नाटकातील या एकूणच निवडणूक प्रचाराचे, तिथल्या घडामोडींचे दैनंदिन वार्तांकन करत असून आज निमेश वहाळकर यांचा लेख प्रकाशित करत आहोत.

कन्नडिगांच्या मनात नेमकं काय चाललंय, याचा थांगपत्ता लावणं ही तशी अवघडच गोष्ट. दक्षिण भारताचं प्रवेशद्वार असलेलं कर्नाटक राज्य उत्तरेला बेळगाव-विजापूर, बीदरपासून दक्षिणेत म्हैसूर-चामराजनगरपर्यंत पसरलेलं देशातील एक मोठं राज्य आहे. कानडी माणूस लोकसभेला ज्या पक्षाच्या पारड्यात आपलं वजन टाकेल, त्याच्याच पारड्यात विधानसभेलाही टाकेल, याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. २०१३ मध्ये अंतर्गत संघर्षामुळे भारतीय जनता पक्षाला कर्नाटक विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव स्वीकारावा लागला खरा, पण २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ‘मोदी लाटेत’ कर्नाटकातील २८ जागांपैकी सर्वाधिक १७ जागा या भाजपला मिळाल्या. विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवणार्‍या काँग्रेस पक्षाला लोकसभेसाठी मात्र अवघ्या ९ जागा मिळू शकल्या. असं हे काहीशा अवघड, अनाकलनीय स्वभावाचं कर्नाटक राज्य. दक्षिणेकडील तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगण आदी राज्यांत काँग्रेस-भाजपसारखे राष्ट्रीय पक्ष कमकुवत असताना आणि प्रादेशिक पक्षांचीच मिजास अधिक असताना (केरळमधील कम्युनिस्ट पक्षांचं कडबोळं हेही आता प्रादेशिकच!) कर्नाटकात मात्र काँग्रेस आणि भाजप हे दोन राष्ट्रीय पक्षच प्रमुख पक्ष आहेत. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे ९-१० दिवस उरलेले असताना या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी व त्यांच्या नेत्यांनी हे राज्य जिंकण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावल्याचं दिसत आहे.

कर्नाटक राज्यातही आपल्याकडील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा-विदर्भाप्रमाणे प्रादेशिक विभागणी आणि अर्थातच, प्रादेशिक असमतोल आहे. दक्षिण कर्नाटक हा प्रदेश उत्तर वा मध्य वा किनारी कर्नाटकापेक्षा तसा सधन, समृद्ध मानला जातो. राजधानी बंगळुरू व त्या खालोखाल कर्नाटकातील दुसर्‍या क्रमांकाचं मोठं शहर म्हैसूर हे याच भागात येतं. बंगळुरूचा अपवाद वगळता बंगळुरूच्या दक्षिण-पश्चिमेकडे असलेले मंड्या, हासन, म्हैसूर, चामराजनगर हे सारे भाजपसाठी आव्हानात्मक जिल्हे. काँग्रेस व कर्नाटकातील तिसरा मोठा पक्ष जनता दल (सेक्युलर) या दोघांचा हा भाग बालेकिल्ला. त्यातही विशेषतः मंड्या-हासन हा भाग माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या जनता दल (सेक्युलर) पक्षाचा जीव की प्राणच. तर म्हैसूर, चामराजनगर ही काँग्रेसची शक्तीस्थानं. या जिल्ह्यांव्यतिरिक्त कोडागू (कुर्ग) हा एकमेव जिल्हा भाजपसाठी अनुकूल आहे, ज्या जिल्ह्यातून केवळ दोन आमदार निवडले जातात (जे दोन्ही भाजपचे आहेत) आणि या जिल्ह्यासाठी स्वतंत्र लोकसभा मतदारसंघही नाही. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेलं जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ, तसंच बंगलोरखालोखाल दुसरं मोठं औद्योगिक केंद्र असलेल्या म्हैसूर शहरातील एकूण ४ मतदारसंघांपैकी सध्या जागा काँग्रेसकडे तर एक जनता दलाकडे आहे. तसेच, म्हैसूर ग्रामीणमधील ७ पैकी ५ जागा काँग्रेसकडे तर २ जनता दलाकडे आहेत. यातील चामुंडेश्वरी मतदारसंघातून यावेळी विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामैय्या निवडणूक लढवत आहेत, तर म्हैसूर ग्रामीणमधील वरुणा मतदारसंघातून त्यांचे पुत्र डॉ. यतींद्र रिंगणात उतरले आहेत. वरुणासाठी भाजप उमेदवार म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री खा. बी. एस. येडीयुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र यांचं नाव चर्चेत होतं. भारतीय जनता युवा मोर्चामध्ये कार्यरत असलेले विजयेंद्र यांची एक ‘डॅशिंग’ नेता म्हणून प्रतिमा असून तरुणांमध्ये ते बर्‍यापैकी लोकप्रिय असल्याचंही आढळतं. मात्र, मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असलेल्या येडीयुरप्पा यांच्या मुलाला तिकीट न देण्याचा निर्णय केंद्रीय भाजपकडून घेण्यात आला. विजयेंद्र यांना वरुणामधून तिकीट मिळतं तर सिद्धरामैय्यापुत्राची काहीच खैर नव्हती, असं भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आत्मविश्वासाने सांगतात. त्यामुळे मित-मृदूभाषी आणि उच्चशिक्षित चेहरा असलेल्या डॉ. यतींद्र यांना सध्या तरी निवडून येण्यास काही अडचण दिसत नाही. मात्र, दुसरीकडे विद्यमान मुख्यमंत्र्यांना मात्र म्हैसूर शहरातील चामुंडेश्वरीतून निवडून येणं अवघड वाटत आहे, म्हणूनच त्यांनी थेट उत्तर कर्नाटकात बागलकोट जिल्ह्यातील बदामी या त्यांच्या कुरूबा (धनगर) समाजाच्या मतांचं आधिक्य असलेल्या मतदारसंघाचीही निवड केली असून त्यामुळे सिद्धरामैय्या आता दोनदोन ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. कन्नडिगांना बहुधा हीच गोष्ट फारशी रूचलेली दिसत नाही, म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्याच्या दक्षिण टोकावर असलेल्या संथेमरळ्ळी गावात घेतलेल्या जंगी प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांचा ‘२+१’ चा फॉर्म्युला असल्याची टीका करताच उपस्थित जनसमुदायाने टाळ्यांचा एकच कडकडाट केला.

जनता दल सेक्युलरचे सर्वेसर्वा माजी पंतप्रधान खा. एच. डी. देवेगौडा आणि त्यांचे पुत्र, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी या पितापुत्रांसाठी हा दक्षिण कर्नाटकाचा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. देवेगौडा कुटुंबाचा बालेकिल्ला मानल्या जाणार्‍या हासन जिल्ह्यात ७ पैकी ५ आमदार जनता दलाचे तर २ काँग्रेसचे आहेत. हासन-म्हैसूरला लागूनच असलेल्या मंड्या जिल्ह्यातही ७ पैकी ४ आमदार जनता दलाचे तर २ काँग्रेसचे आहेत. भाजप आणि काँग्रेस या दोन ताकदवानांच्या लढतीत ‘किंगमेकर’ ठरविण्याची स्वप्नं कुमारस्वामी बघत आहेत आणि कदाचित पुन्हा एकदा थेट मुख्यमंत्रिपदाचीही लॉटरी लागण्याची त्यांना आशा आहे. मात्र, दुसरीकडे त्यांचे थोरले बंधू एच. डी. रेवण्णा व त्यांचे पुत्र प्रज्वल रेवण्णा या पितापुत्रांमध्ये आपल्या चुलत्याविषयी बरीच नाराजी आहे. त्यामुळेच महत्त्वाकांक्षी प्रज्वल यांना या निवडणुकीत उमेदवारीही नाकारण्यात आली. ही पक्ष आणि कुटुंबांतर्गत धुसफूस राजकीय कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात असलेल्या देवेगौडांना अस्वस्थ करत आहे. याशिवाय कुमारस्वामींनी भाजपशी अधिकच संधान बांधलेले असल्याची होणारी चर्चा जनता दलाला मारक ठरण्याची शक्यता आहे. या सगळ्या परिस्थितीत या दक्षिण भागात काँग्रेस व जनता दलाच्या बालेकिल्ल्यांना खिंडार पाडण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आठवड्यातील प्रचाराची सुरुवात राज्यातील दक्षिण टोकावर असलेल्या चामराजनगर जिल्ह्यात संथेमरळ्ळी या छोट्याशा गावातून केली. या जिल्ह्यातील खासदारही काँग्रेसचा तर सर्वच्या सर्व ४ आमदारही काँग्रेसचे. अशा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात झालेल्या मोदींच्या सभेला झालेली प्रचंड गर्दी, ‘मोदी-मोदी’चे घुमलेले नारे, यामुळे सिद्धरामैय्यांच्या मनात नक्कीच धडकी भरली असेल. भाजपची ही सभा संपताच सिद्धरामैय्यांनी धडाधड केलेली ट्विटस हेच सांगतात.

जसजशी १२ तारीख जवळ येऊ लागली आहे, तसतसं दिवसागणिक कर्नाटक बदलताना दिसतं आहे. येडीयुरप्पा आणि सिद्धरामैय्या या दोन चेहर्‍यांना डोळ्यासमोर ठेऊन मतदान होणार असलं तरी पंतप्रधान मोदींची ‘क्रेझ’ २०१४ नंतर ४ वर्षानंतरही कायम दिसते आहे. जनता दल-काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपने कडवं आव्हान उभं केलं असून त्यामुळे कमालीच्या चुरशीच्या बनलेल्या या लढतींमध्ये दक्षिणी कन्नडिगांचं मन कोण जिंकतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 
निमेश वहाळकर 
@@AUTHORINFO_V1@@