वृक्षांना ‘सलाईन’द्वारे जीवदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2018
Total Views |
 
वृक्षांना ‘सलाईन’द्वारे जीवदान
जळगाव, २ मे
जिल्ह्यात रणरणत्या उन्हाची झळ वृक्षांना बसत आहे. त्यांना वाचविण्यासाठी वृक्षप्रेमींची धडपड सुरु आहे. वृक्ष लावलेल्या ठिकाणी सभोवतालच्या जाळीला झाकून तर काहींनी वृक्षांना चक्क सलाईनद्वारे पाणी देण्याचा प्रयत्न सुरु ठेवून जीवदान मिळत आहे. यासाठी सामाजिक संस्थांनाही पुढाकार घेण्याची गरज आहे.
अत्याधुनिक साधनांचा प्रभाव
शहरीकरणाचा विस्तार झपाट्याने होत आहे. त्यासाठी वृक्षांच्या मुळांवरच घाव घातला जात आहे. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्यास सुरवात होऊन त्याचे परिणाम आता तापमान वाढीने दिसू लागले आहेत. दिवसेंदिवस फ्रिज आणि वातानुकूलित यंत्रांचा वापर बेसुमार वाढला आहे. या दोन्ही वस्तूंच्या वापरातून कार्बन डायऑक्साईडची निर्मिती होते. त्याचा परिणाम वातावरणाचे तापमान वाढविण्यावर झाला. या सर्व कारणांमुळे पृथ्वीचे तापमान वाढू लागले आहे. त्याचे परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. अशावेळी अत्याधुनिक साधनांच्या प्रभावाखाली न येता वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समजून भविष्यातील संकट टळण्यास मदत होऊ शकते.
वृक्षलागवड
जनमोहीम ठरावी
शासन जरी वृक्ष लागवडीवर कोटींच्यावर निधी खर्च करीत असले तरी वृक्षसंवर्धन होणे गरजेचे आहे. वृक्ष लागवड न होऊन संवर्धन न झाल्यास भविष्यात तापमानाचे प्रमाण ५०च्याहीवर गेलेले राहील. जनतेने वेळीच हे गांभीर्य लक्षात घेऊन ही जनमोहीम करण्याची वेळ सर्वांवर येऊन ठेपली असल्याचे मत वृक्षमित्र अभय उजागरे यांनी व्यक्त केले.
स्वयंस्फूर्तीने वृक्षारोपणाची गरज
जिल्ह्यात उन्हाचा पारा ४५ अंशावर येऊन ठेपला आहे. त्याचा फटका जनतेसह मुक्या वृक्षांना पोहोचत आहे. पावसाळा सुरु होण्यापूर्वी काहींकडून वृक्षारोपण करुन केवळ चमकोगिरी केली जाते. मात्र, केवळ वृक्षारोपण न करता त्यांचे संगोपन आणि संवर्धन गरजेचे आहे. त्यासाठी स्वयंस्फूर्तीने वृक्षारोपणाची गरज आहे.
 
 
कारवाईचा केवळ देखावा
राज्य शासन वृक्षलागवडीच्या मोहीमेवर कोट्यावर्धीचा खर्च करते. मात्र, या मोहिमेकडे अनेक लाकूड तस्कर पाठ फिरवितात. स्वताःच्या आर्थिक फायद्यापोटी सर्रास वृक्षतोड करतात. जिल्ह्यात वृक्षतोडीचे प्रमाण सद्यस्थितीलाही मोठे आहे. त्याकडे वनविभागातील संबंधितांचे असलेले लागेबांधे पर्यावरणाला बाधक ठरत आहे. अवैधरित्या वृक्षतोड करणार्‍यांवर कारवाईचा देखावा दाखवून ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ असा प्रकार अनेकवेळा समोर येतो.
 
निसर्गावर मानवी अतिक्रमणाचा परिणाम
जिल्ह्यासह सर्वत्र दिवसेंदिवस होणारी वृक्षतोड आणि वृक्षांच्या जागेवर उभी राहणारी सिमेंटची जंगले, नवीन कॉलन्यांमुळे वर्षभरात तापमानात प्रचंड वाढ होत आहे. यामुळे निसर्गावर मानवी अतिक्रमण होत असल्यामुळे वनक्षेत्रात घट होत आहे. पंचवीस वर्षांपूर्वीचे जंगलक्षेत्र आता नाहीसे झाले आहे. नव्याने वृक्ष लागवडीअभावी ऋतुचक्र बदलल्यामुळेच तापमानवाढीचा त्रास जनतेला होऊ लागला आहे.
 
 
वृक्ष पेटविण्याचे प्रमाण वाढले...
वृक्षतोड वाढल्याने पृथ्वीवरील तापमान वाढीवर परिणाम जाणवू लागला आहे. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी उन्हाळ्यात झाडे पेटत असल्याचा आव आणला जातो. मात्र, अशा कुठल्याही प्रकारे झाडे जळत नसून तो जाळण्याचा लाकूड तस्करांनी घाट सुरु ठेवला आहे. त्यामुळे त्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ममुराबाद परिसरात झाडे पेटविण्याचे प्रमाण वाढले असून वृक्षप्रेमींनी ते कॅनद्वारे विझवून झाडांचा बचाव केला आहे. यासंदर्भात वनविभागाचे संबंधित अधिकारी ‘मूग गिळून गप्प’ बसून आहेत.
 
 
वृक्ष वाचविण्यासाठी खटाटोप
वृक्षप्रेमींनी वृक्षाला देव मानत अनेक ठिकाणी रणरणत्या उन्हापासून त्यांचा बचाव करण्यासाठी विविध क्लृप्त्या लढविल्या आहेत. त्यात वृक्ष लावलेल्या बाजूच्या जाळीला कपड्याने झाकले आहे. तसेच सलाईनद्वारे त्यांना वाचविण्याचा खटाटोप सद्यस्थितीला तरी सुरु आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@