राजकारणात न रुजणारा खेळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
खरे तर समूह भावना, विजय मिळविण्यासाठी करावी लागणारी मोर्चेबांधणी, पराजय पचविण्यासाठी असावी लागणारी खिलाडू वृत्ती हे सारे खेळातले गुण राजकारणातही उपयुक्त पडू शकतात. मात्र लक्ष्य दोन असू शकत नाहीत. ते एकच असावे लागते, हा खेळातला मूळ धडा विसरून खेळाडू राजकारणात येतात आणि तिथेच त्यांचा बळी जातो.
 
 
भारताचा कीर्तिवंत खेळाडू बायच्युंग भुतिया याने स्वत:चा ‘हमारो सिक्कीम’ नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला आहे. फुटबॉलपटू म्हणून भुतियाला सार्‍या देशाने डोक्यावर घेतले होते. राजकारण्यांनी खेळात शिरायला मनाई नसेल तर खेळाडूंनी राजकारणात गेले तर कुठे बिघडते?, असा युक्तीवाद करणारे अनेक आहेत. तत्त्वत: त्यात काही वावगेही नाही, पण राजकारणाच्या पटांगणावरची वस्तुस्थिती काही निराळीच आहे. राजकारणात शिरल्यावर यशस्वी झालेला कुठलाही खेळाडू आपल्याकडे नाही. भुतियाला राष्ट्रीय खेळाडू म्हणून देशाने वाखाणले असले तरी राजकारणात जाण्यासाठी त्याने जो पक्ष निवडला तो चुकीचाच होता. ममता बॅनर्जींच्या तृणमूल पक्षातून त्याने राजकारणाचा मार्ग निवडला होता. वावगे अशासाठी की, राजकारणात जायला हरकत नव्हती पण ज्या पक्षाची ध्येयधोरणे आता पूर्णपणे लांगूलचालन आणि मोदीद्वेषावर अवलंबून आहेत तिथे हा काय ‘गोल’ साध्य करणार होता? भुतियाने तृणमूल काँग्रेस सोडण्याची घोषणा फार आधीच केली होती. त्यावर ममता बॅनर्जींनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती, याचे मुख्य कारण राजकारणात अनेक पत्ते लागतात. कारण हा पत्ता कुठेही टाकून जिंकता येत नाही, हे त्यांच्या लक्षात आले होते. भुतियाने विधानसभा आणि लोकसभा दोन्ही निवडणुका लढविल्या आणि त्याच्या पदरी अपयशच आले. भारतात क्रिकेट सोडून अन्य कुठलाही खेळ क्रिकेटइतका रुजलेला नाही. बंगाल मात्र याला अपवाद राहिला. उर्वरित भारतापेक्षा क्रिकेटव्यतिरिक्त फुटबॉलची मुळे बंगालमध्ये चांगली रुजली. फुटबॉलपटू म्हणून जी काही लोकप्रियता मिळाली ती तृणमूलच्या खात्यावर जमा करण्यासाठी हा सगळा खटाटोप होता. एखाद्या राजकारण्याला शोभावा असाच वापर ममतांनी बायच्युंगचा करून घेतला. आपण वापरले जातोय, याचा अंदाज भुतियाला आला नाही, असे नाही पण त्याचाही राजकारणाचा सोस काही केल्या सुटत नव्हता.
 
 
आता बाहेर पडल्यानंतर त्याने आपल्याला बंगाली नसल्याचे ‘बाहेरचा’ असल्याचे सांगत कांगावा करायला सुरुवात केली आहे. दार्जिलिंग हा मूळचा सिक्कीमचा भाग. ब्रिटिशांनी दार्जिलिंग जिंकले आणि आणि तिथल्या राजाकडून हिसकावून घेत त्याने ते स्वत:च्या वसाहतीला जोडून घेतले. ३० एप्रिल १९5४ रोजी दार्जिलिंग जिल्हा पश्चिम बंगालला जिल्हा म्हणून जोडले गेले तेव्हा तिथल्या लोकांनी ‘काळा दिवस’ पाळला होता. आपली संस्कृती बंगाली संस्कृतीपेक्षा वेगळी आहे व आपल्यावर बंगाली संस्कृती लादली जाते, असा इथल्या लोकांचा समज आहे. तो बळकट करण्याचे काम स्थानिक नेते करीत असतातच. राजकारणातही आपल्याला प्रतिनिधीत्व दिले जात नसल्याची भावनाही ही मंडळी बोलून दाखवित असतात. आता भुतियाचे राजकारण इथे कसे रुजणार, असा मोठा प्रश्न आहे. कारण ज्या बंगाली राजकारण्यांवर या मंडळींचा रोष आहे. त्याच्या खांद्याला खांदा लावूनच भुतिया राजकारणाचे चषक भिडवित होता. तिथे यश नाही, असे लक्षात आल्यावर आता तो अस्मितेचे पोवाडे गाऊ लागला आहे. या राजकारणाचा शेवट गोड असणार नाही हे साहजिकच. गोरखालँडच्या मागण्या अत्यंत हिंसक पद्धतीनेही मांडण्यात आल्या आहेत.
 
 
राजकारणात जाऊन स्वत:चा पक्ष काढण्याचा प्रयत्न करणारा भुतिया हा काही पहिला खेळाडू नाही. याआधी अनेकांनी हे प्रयोग केले आहेत. अगदी १९२८ साली ऑलिम्पिक खेळांमध्ये हॉकीसाठी भारताचे प्रतिनिधीत्व करणार्‍या जयपालसिंग मुंडा यांनीही असाच काहीसा प्रयोग केला होता. १९३४ साली त्यांनी आदिवासी महासभा नावाचा राजकीय पक्ष काढून आजच्या झारखंड व तेव्हाच्या बिहारमध्ये राजकीय परिवर्तन आणण्याचे प्रयोग केले होते. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांचे काही भरीव योगदानही राहिले पण राजकीय नेता म्हणून काही त्यांची कारकीर्द बहरू शकली नाही. भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान मोहम्मद अझरुद्दीन यानेदेखील राजकारणात आपले नशीब आजमावले होते. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत अझरुद्दीन काँग्रेसच्या तिकिटावर उत्तर प्रदेशातील मोरादाबाद मतदार संघातून निवडून गेला होता. मात्र नंतर उत्तर प्रदेशातून काँग्रेसचाच गाशा गुंडाळला गेल्याने अझरुद्दीनची राजकीय कारकीर्दही संपुष्टात आली. आपल्या तर्‍हेवाईक शेर्‍यांमुळे चर्चेत राहिलेल्या नवज्योत सिंग सिद्धूची राजकीय कारकीर्दही अशीच मजेशीर राहिली. आधी लोकसभा नंतर राज्यसभा मग आमदार असा सिद्धूचा प्रवास झाला.
महाराष्ट्रात लोकभारती पक्षाचे एकमेव आमदार कपिल पाटील यांनीदेखील क्रिकेटपटू विनोद कांबळी याला हाताशी धरून आपला पक्ष रुजविण्याचा प्रयत्न केला होता. विनोद कांबळीला त्यांनी पक्षाचे उपाध्यक्षपद देऊ केले होते आणि २००९ साली विक्रोळी येथून विधानसभेची निवडणूकही लढवायला तिकीट दिले होते. या निवडणुकीत दुसर्‍या तिसर्‍या नव्हे तर चौथ्या क्रमांकावर विनोद कांबळी फेकला गेला होता. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणार्‍या सचिन तेंडुलकरची राज्यसभा खासदार म्हणून कारकीर्द टीकेची धनीच झाली होती. खासदार म्हणून त्याच्या राज्यसभेतील उपस्थितीबद्दलही माध्यमांनी प्रश्न उपस्थित केले होते. खरेतर समूह भावना, विजय मिळविण्यासाठी करावी लागणारी मोर्चेबांधणी, पराजय पचविण्यासाठी असावी लागणारी खिलाडू वृत्ती हे सारे गुण खेळातले गुण राजकारणातही उपयुक्त पडू शकतात. मात्र लक्ष्य दोन असू शकत नाहीत, ते एकच असावे लागते. हा खेळातला मूळ धडा विसरून खेळाडू राजकारणात येतात आणि तिथेच त्यांचा बळी जातो.
@@AUTHORINFO_V1@@