धुळे जिल्ह्यात १५ मे पासून डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा - ना . दादाजी भुसे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2018
Total Views |
धुळे जिल्ह्यात १५ मे पासून डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा - ना . दादाजी भुसे
धुळे. २ मे
महसूल विभागाचा चेहरा- मोहरा बदलविणारा व अत्यंत दूरगामी परिणाम करणारा राज्यातील सर्वांत मोठा ऑनलाइन सातबारा प्रकल्प असून धुळे जिल्ह्यात ६७८ गावांपैकी ६५० गावांच्या सातबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित २८ गावांचे सातबारा संगणकीकरणाचे कामही अंतिम टप्प्यात असून १५ मे २०१८ पासून जिल्ह्यातील सर्व खातेदारांना डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी येथे केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त आज सकाळी पोलिस कवायत मैदानावर मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभ झाला. पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी महापौर कल्पना महाले,जि.प. सदस्य कामराज निकम, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी गंगाथरण डी., पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, राज्य राखीव पोलिस दलाचे समादेशक चंद्रकांत गवळी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे (भूसंपादन), राजेंद्र पाटील (प्रशासन), तुकाराम हुलवळे (निवडणूक), प्रभारी उपविभागीय अधिकारी शुभांगी भारदे (धुळे), तहसीलदार अमोल मोरे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, नागरिक, वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील गुणवंतांचा ना.भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेच्या अंमलबजावणीस सुरवात. यामुळे भारतीय सैन्यातील कर्तव्यावर वीर मरण प्राप्त झालेल्या शहीद जवानाच्या वीर पत्नीस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बससेवांमधून आजीवन मोफत प्रवास करता येईल.
सर्वांसाठी पाणी
टंचाई मुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या तिसर्‍या टप्प्यात जिल्ह्यातील ९५ गावांचा समावेश केला आहे. आतापर्यंत ३३६ कामे पूर्ण झाली असून ७४५ कामे प्रगतीपथावर आहेत. उर्वरीत कामे ३० जून २०१८ पर्यंत पूर्णत्वास येतील. या अभियानाच्या चौथ्या टप्प्यात पात्र १६३ गावांची निवड करण्यात आली आहे.
२१ कोटी २१ लाख रुपयांचा निधी
साक्री आणि शिंदखेडा तालुक्यातून वाहणारी बुराई नदी बारमाही करण्यासाठी शासनाने २१ कोटी २१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून बुराई नदीवर बंधारे बांधण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील ११ गावांमध्ये ११ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
खरीप हंंगामात कापसाची लागवड अधिक
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी ४ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रात पेरणीचे लक्ष्य निश्चित केले आहे. या पार्श्वभूमीवर कापूस वगळता विविध पिकांच्या वाणांची ४८ हजार ९७० क्विंटल बियाण्याची मागणी नोंदविली आहे. कापसाच्या सुधारीत वाणाची १ लाख ७५ हजार व बीटी कापसाची ६ लाख ६५ हजार पाकिटांच्या पुरवठ्याचे नियोजन आपल्या कृषी विभागाने केले आहे. तसेच १ लाख २ हजार ७१० टन खत पुरवठ्याचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात कापसाच्या लागवडीखालील क्षेत्र मोठे आहे. गेल्या वर्षी कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला होता. बोंड अळीचे जीवनचक्र नष्ट होण्यासाठी आणि उन्हाची वाढती तीव्रता पाहता २० मेनंतरच कापूस लागवडीला शेतकर्‍यांनी सुरवात करावी, असे ना. भुसे यांचे आवाहन .
१ हजार १७६ कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा
जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सुमारे १ हजार १७६ कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून आतापर्यंत २७ हजार ८१६ शेतकर्‍यांना ७२ कोटी ९६ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.
१२ शाळांना आयएसओ मानांकन प्राप्त
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे यांच्या कार्यक्षेत्रात २२ शासकीय आश्रमशाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये ८५७७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या आश्रमशाळांपैकी तीन आश्रमशाळांमधील पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक वापराच्या वस्तूंच्या खरेदीसाठी डीबीटी प्रणालीने निधी थेट त्यांच्या बँक खात्यात १ कोटी ४१ लख ६८ हजार ५०० जमा करण्यात आला आहे. तसेच उर्वरीत १९ आश्रमशाळेतील सात हजार १८६ विद्यार्थ्यांना दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदीसाठी ४ कोटी ५३ लाख ४ हजार ३५० रुपयांचा लाभ डीबीटी अंतर्गत देउण्यात आला आहे. याशिवाय सन २०१७- २०१८ या शैक्षणिक वर्षात १२ शाळांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले .
ना. भुसे यांनी पथसंचलनाची पाहणी केली. उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप वसावे यांनी संचलनाचे नेतृत्व केले. ना. भुसे यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान आजीवन मोफत प्रवास सवलत योजनेचे पास शहिदांच्या वीर पत्नींना प्रदान करण्यात आले. तसेच विभागीय आयुक्त, नाशिक यांनी जिल्हास्तरीय आदर्श तलाठी पुरस्कारासाठी निवडलेले अनिल अशोक भामरे, सजा करवंद, ता. शिरपूर यांना पाच हजार रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र देण्यात आले.
या पोलिसांचा झाला सन्मान
पो.नि. मंगल देवचंद भारुडे,पोउनि चुनीलाल त्र्यंबक सैंदाणे, सपोउनि राजेंद्र हिरालाल सूर्यवंशी,पोहेकॉ जगन्नाथ सखाराम नेहते, पो.ना. योगेश अशोक सोनवणे, नीलेश बन्सी पाटील यांना प्रशंसनीय सेवेबद्दल प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
खेळाडूंचा सन्मान
नीरज दिलीप चौधरी, तायक्वांदो, आयुषी भाऊसाहेब सोनवणे, रायफल शूटिंग, दिनेश संभाजी बागूल, ज्युदो यांना अनुक्रमे जिल्हा गुणवंत खेळाडू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच जिल्हा युवा पुरस्कार प्रणेता रवींद्र देसले, रा. दहिवेल, अश्विनी राहुल माळी, रा. कबीरवाडी, दोंडाईचा, नेहरू युवा मंडळ, म्हसाळे, ता. साक्री यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले.
स्मार्ट ग्रामपंचयात
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातर्फे वडगाव, ता. धुळे, कुडाशी, ता. साक्री, बाम्हणे, ता. शिंदखेडा, भाटपुरा, ता. शिरपूर यांना स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्कारांचे वितरण
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, पंकज चौबळ (भूसंपादन), तुकाराम हुलवळे (निवडणूक), राजेंद्र पाटील (प्रशासन), प्रभारी उपविभागीय अधिकारी शुभांगी भारदे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रमोद भामरे आदींसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@