‘अत्त दीप भव’- वनिता फाऊंडेशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2018   
Total Views |


शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा बाबासाहेबांचा विचार मला नेहमी प्रेरणा देतो. बाबांची जयंती करताना त्यांच्या नावाने होणार्‍या कार्यक्रमाला जाताना मी नेहमीच ऐकायचो की, बाबांनी आपल्याला नवजीवन दिले. त्यांनी आपल्याला, ’शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’चा मंत्र दिलाय. तो आपण जपला पाहिजे. त्यामुळे मी शिकलो, संघटन केले आणि संघर्षही केला,” वनिता फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे सांगत होते.

प्रभाकर कांबळे आणि त्यांच्या पत्नी वनिता कांबळे पूर्व उपनगरातले सुविद्य दाम्पत्य. सामाजिक बांधिलकी जपत नेहमी सामाजिक कार्यात तन-मनाने स्वतःला झोकून देणार्‍या या जोडप्याला खरे तर वैयक्‍तिक जीवन उरलेच नाही. सदा सर्वदा सामाजिक प्रश्‍नांना भिडत त्यांचा वेध घेत प्रभाकर आणि वनिता हे दोघे वनिता फाऊंडेशनच्यावतीने कार्य करताना दिसतात. प्रभाकर कांबळे यांनीही जातीय गरिबीचे चटके सोसले. ते म्हणतात,”वडील शेतकरी, शेतकरी म्हणण्यापेक्षा आम्ही शेतमजूरच. कोल्हापूरच्या डुक्‍करगावात आमचं घर. सामाजिक आणि आर्थिक बाबतीत अठरा विश्‍वे दारिद्य्र. सगळ्याच गोष्टींची वानवा. खरे म्हणजे शिकणं ही सुद्धा चैनच. पण मला वाटायचे की, आपण शिकले पाहिजे. अर्थात घरी, आजूबाजूला शैक्षणिक वातावरण नव्हतेच. त्यामुळे दहावी पर्यंत शिकलो पण दहावीला मात्र नापास झालो. त्यावेळी खूप वाईट वाटले. अपराधी वाटले. पण आता वाटते त्यात माझी चूक नव्हती. कारण शिकायला आवश्यक असणार्‍या गोष्टीच माझ्याकडे नव्हत्या, शेतात काम करत असल्यामुळे अभ्यासाला वेळही नव्हता. पण मी नापास झाल्यामुळे सगळ्यांचेच म्हणणे पडले. काय ते शिकायचं? बंद करा अन् काम करा. शिकायचं स्वप्न पाहणं मी बंद करावं, अशीच परिस्थिती झाली. पण त्यामुळेच मनात जिद्द निर्माण झाली की, कसंही करून शिकावंच आणि मी एम.ए. बी.एड. पर्यंत शिक्षण घेतलं. मी शनिवार-रविवार पूर्ण दिवस शेतात मजुरी करायचो आणि इतर दिवशी हॉस्टेलवर राहून शिकायचो.”

प्रभाकर कांबळेंनी अतिशय कष्टाने शिक्षण घेतले. समाजाच्या तथाकथित रहाटीत मागासवर्गीय कुटुंबात जन्माला येऊनही प्रभाकरांची विचारधारा स्पष्ट आहे. त्यांची ती स्पष्ट विचारधारा वनिता फाऊंडेशनच्या कार्यप्रणालीत पदोपदी जाणवते.

वनिता फाऊंडेशनचे काम ’शिका, संघटित व्हा, संघर्ष करा,’ या तत्त्वावरच चालते. समाजातील वंचित-शोषित गटाच्या तसेच इतरही गरजू विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आर्थिक समस्या तर असतेच. त्याशिवाय मुलांच्या पालकांना आणि प्रत्यक्ष मुलांनाही शिक्षणात रस वाटणे आवश्यक आहे. शिक्षण ही आयुष्याची गरज आहे, असे त्यांना वाटणे आवश्यक आहे. कसेही करून आपण शिकायलाच हवे, असे मुलांना मनातून वाटले तरच ते शिकण्यासाठी तयारी करतात, अन्यथा कुणीतरी सांगितले म्हणून केले आणि केलेले वाया गेले, इतकेच त्याचे स्वरूप राहते. वनिता फाऊंडेशन मूलांना आणि पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देते. आर्थिक समस्या असलेल्या पालकांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करते. यातही पुन्हा लोकसहभागाचा मुद्दा विचारात घेतला जातो. वंचित तसेच प्रगत समाजातल्याही सामाजिक बांधिलकी जपणार्‍या लोकांची मदत या मुलांच्या शिक्षणासाठी घेतली जाते. इथे समाजासाठी काहीतरी करू इच्छिणार्‍या लोकांना गरजू मुलांच्या शिक्षणासंबंधीच्या मदतीसाठी आवाहन केले जाते. त्याचवेळी परिसरातल्या गरजू मुलांचा शोध घेतला जातो. त्यांना शैक्षणिक मदत केली जाते. यावर बोलताना वनिता फाऊंडेशनच्या वनिता कांबळे म्हणाल्या की, ”यामध्येही आम्ही असा प्रामुख्याने विचार करतो की, मदत कोणाला करायची? त्याचा पाया काय असला पाहिजे? तर कोणत्याही जातीच्या, धर्माच्या आणि भाषेच्या गरजू मुलांना शैक्षणिक मदत केली जाते. त्याचवेळी ज्यांच्याकडून मदत घ्यायची आहे त्या व्यक्‍तीही चौकटीतल्या नसतात.” यावर प्रभाकर म्हणाले की, ”शिका, असे बाबासाहेबांनी सांगितले. त्यामुळे शिक्षणासाठी आमच्यापरीने आवश्यक ती मदत आम्ही गरजू मुलांना शिक्षणासाठी देतो.” पुढे येते ‘संघटन’. वनिता फाऊंडेशन संघटन कसे करते? तर ती माहिती अशी की, वनिता फाऊंडेशन समाजाच्या वैचारिक संघटनाला महत्त्व देते. सकारात्मक विचारांची बांधणी समाजामध्ये व्हावी आणि या विचारांचे लोक एकत्र यावेत यासाठी वनिता फाऊंडेशन वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत असते. त्यासाठी विविध सामाजिक संस्थांशी संपर्क साधला जातो. त्या संस्थांच्या समन्वयाने उपक्रम राबवला जातो. विविध क्षेत्रांमध्ये काम करणार्‍या व्यक्‍तींची माहिती गोळा केली जाते. अशा गुणवान व्यक्‍तींचा सन्मान केला जातो. यावर्षी ’आदर्श मुंबई’ या भोईरांच्या संस्थेसोबत वनिता फाऊंडेशनने विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या व्यक्‍तींचा सत्कार केला. यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची की, ज्या व्यक्‍तींचा सत्कार केला जातो, ती व्यक्‍ती प्रसिद्धीच्या झोतात नसते. किंबहुना तिच्या कामाची दखल कुणीच घेतलेली नसते. अशा व्यक्‍तींच्या कर्तृत्वाची दखल वनिता फाऊंडेशन घेते. या अशा अनेक उपक्रमांमुळे वनिता फाऊंडेशनचे संघटन वाढत आहे. या संघटनामुळे समाजाच्या सकारात्मक शक्‍तीचेही संघटन होते.

मागेच वनिता फाऊंडेशनने संविधानाची माहिती देणारा एक उद्बोधक कार्यक्रम बुद्धविहारात आयोजित केला होता. संविधानाचे महत्त्व सामान्यातल्या सामान्य वस्तीपातळीवरील लोकांना व्हावा यासाठीचा हा प्रयत्न होता. थोरामोठ्यांची जयंती, स्मरणदिन यावेळीही वनिता फाऊंडेशन लोकांच्या जागराचा कार्यक्रम घेते. मागे घाटकोपर विभाग राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे ‘राष्ट्रोत्थान सेवा संगम’ हा कार्यक्रम घेण्यात आला होता. जिल्ह्यातील सेवाभावी संस्था आणि व्यक्‍तींच्या स्नेहमिलनाचा वैचारिक कार्यक्रम होता तो. वनिता फाऊंडेशनला असा कार्यक्रम होणार आहे, हे सांगोवांगी कळले. कुणाच्यातरी व्हॉटसअ‍ॅप मेसेजवर कळले. त्या कार्यक्रमात वैयक्‍तिकरित्या प्रभाकर कांबळे, वनिता कांबळे यांना जवळून ओळखणारे लोक असणे अशी शक्यता कमीच होती. पण तरीही हे दोघे या कार्यक्रमाला गेले. का? कारण शुद्ध राष्ट्रीय निष्ठेने आणि कल्याणाची भावना घेऊन काम करणार्‍या सामाजिक संस्था आणि व्यक्‍ती या कार्यक्रमाला येणार होत्या. या सर्वांच्या वैचारिक आणि कार्यशैलीच्या संकल्पनेच्या देवाणघेवाणाची माहिती होणार होती. समाजात कोणते प्रश्‍न आहेत? त्यावर इतर संस्था कशा काम करतात? याचे ज्ञान मिळेल, चार चांगल्या लोकांशी परिचय होईल, या हेतूने वनिता फाऊंडेशन त्या कार्यक्रमाला गेली होती. याप्रकारे संघटन केले जाते.

मात्र संघर्ष करण्याच्या बाबतीत वनिता फाऊंडेशनचे विचार वेगळे आहेत. हेच विचार समाजासाठी प्रेरक आहेत. वनिता फाऊंडेशनचे म्हणणे आहे की, संघर्ष कसा असावा? कुणाशी असावा? संघर्ष हा कोणत्याही माणसांशी, जातीशी धर्मांशी नाही तर संघर्ष हा समाजाला भेडसावणार्‍या समस्यांसोबत आहे. दारिद्य्र, निरक्षरता, व्यसन, अंधश्रद्धा यांच्याशी वनिता फाऊंडेशनचा संघर्ष आहे.

प्रभाकर कांबळे आणि त्यांची संस्था खरोखर या विचाराने समाजात काम करते. त्यांच्या कामाची दखल घेत महाराष्ट्र स्तरावरची कित्येक पारितोषिके त्यांना मिळाली आहेत. व्यवसायाने प्राध्यापक असलेले प्रभाकर वनिता फाऊंडेशनचे काम करतानाही अध्यापन क्षेत्राचे महत्त्व राखतच काम करत आहेत. प्रभाकर कांबळे, वनिता कांबळे आणि वनित फाऊंडेशनच्या समाजकार्याला शुभेच्छा.


- योगिता साळवी
@@AUTHORINFO_V1@@