गडचिरोलीत मारलेल्या नक्षलवाद्यांना मुंबईतील लोकलमध्ये श्रद्धांजलीचे संदेश !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2018
Total Views |


 
मुंबई (विशेष प्रतिनीधी) : नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात आपल्या सुुरक्षा दलांनी धाडसी कारवाई करत तीसहून अधिक नक्षलवादी ठार केले होते. मात्र, या नक्षलवाद्यांना 'हुतात्मा' संबोधून चक्क श्रद्धांजली अर्पण करणारे संदेश मुंबईच्या लोकल रेल्वेमध्ये लिहिण्यात आले असल्याचे आढळून आले आहे.
 
गुरूवार दि. १७ मे रोजी मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पनवेलकडे जाणाऱ्या लोकलमध्ये प्रथम दर्जाच्या डब्यांमध्ये हा धक्कादायक मजकूर आढळून आला. रात्री ११-११.३० च्या सुमारास पनवेल डाऊन लोकलमध्ये प्रथम दर्जाच्या डब्यात 'रेड सॅल्यूट्स टू दि गडचिरोली मार्टियर्स' अशा शब्दांत नक्षलवाद्यांना श्रद्धांजली वाहणारे संदेश मार्करने लिहिलेले आढळले. ठळक अक्षरांत लिहिलेल्या वाक्याशेजारीच नक्षलवादी संघटनांची चिन्हेही काढण्यात आली असून 'लाँग लिव्ह द रेव्हल्युशन' हे घोषवाक्यदेखील तितक्याच ठळकपणे लिहिलेले होते. गेल्या काही दिवसांपासून शहरांमध्ये गुप्तपणे पाळेमुळे पसरू लागलेल्या नक्षलवादासंबंधी चर्चा सुरू असतानाच, मुंबईची 'लाईफलाईन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलमध्ये अशाप्रकारे अज्ञात व्यक्तींकडून थेट गडचिरोलीतील ठार नक्षलवाद्यांना श्रद्धांजली देणारे संदेश लिहिले जाणे आश्चर्यकारक ठरले आहे. हा संवेदनशील मजकूर कोणी लिहिला, कधी लिहिला, त्या व्यक्ती कोणत्या संघटनांशी संबंधित आहेत, याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही.
 
या घटनेबाबत रेल्वे पोलिसांशी संपर्क करून हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे पोलीस स्थानक तसेच छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे पोलीस नियंत्रण कक्ष आदींच्या ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली. रेल्वे पोलीसांनी या मजकुराचा शोध घेऊन, त्याबाबत अधिक तपासणी करण्याचे यावेळी आश्वासन दिले आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@