उलगडले दारूच्या बेटाचे रहस्य!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2018
Total Views |


 
 
अनोखी ‘इंडस्ट्री’ पाहून वर्दीवालेही हैराण

अमित गिर्‍हेपुंजे
भंडारा,
सोशल मीडियाच्या पूर्णपणे आहारी गेलेलो आम्ही अशक्य वाटणार्‍या अनेक गोष्टी सहज नजरेखालून घालू लागलो आहोत. नदीतील रेती, अनेक जीवजंतू आणि बरेच काही आपण पाहून जातो. मात्र दारूचे विस्तीर्ण बेटच उजेडात आले आहे, असे सांगितल्यास कदाचित कुणाचाही विश्वास बसणार नाही. अहो, बेटच नव्हे तर 6 ते 7 किलोमीटरची नदीही दारूनेच व्यापलेली! पोलिस विभागालाही थक्क करून सोडणार्‍या या बेटाचा शोध लावलाय्‌ कारधा व भंडारा पोलिसांच्या संयुक्त पथकाने.
 
 
दारूचे बेट ऐकून जरा आश्चर्य वाटले, ना? पण हो, कारधा आणि भंडारा पोलिसांच्या संयुक्त पथकाने या बेटाचा शोध लावला, तो वैनगंगा नदीच्या विस्तीर्ण अशा पात्रात! गोसेखुर्दच्या बॅकवॉटरमुळे गाव पाण्याने वेढले जाणार होते. त्यामुळे भंडारा तालुक्यातील संगम गावाचे पुनर्वसन झाले. गावकर्‍यांचे स्थलांतर होऊन गाव रिकामे झाले अन्‌ संगम बेट म्हणून राहिले. कधीकाळी गाव असलेल्या या बेटाचा आकार विस्तीर्ण आणि प्रशस्त असा आहे. चारही बाजूने भल्यामोठ्या जलसाठ्याने वेढले गेल्याने संगम निर्मनुष्य झाले आहे. ओसाड पडलेल्या या बेटाचा फायदा मोहाची दारू गाळणार्‍यांनी घेतला. बेटापर्यंतचा दोन ते तीन किलोमीटरचा प्रवास करून बेटावर देशी दारूची जणू काही ‘इंडस्ट्री’ स्थापन केली गेली!
 
 
पक्की घरे, मोह सडविण्यासाठी सिमेंटचे टाके, तयार झालेला दारू साठा साठविण्यासाठी गोदाम, पाण्याचा उपसा करण्यासाठी डिझेल इंजिन, जळाऊ लाकडांचा प्रचंड साठा एवढेच नाही, तर या ठिकाणी गाई आणि बकर्‍याही पाळण्यात आल्या. पाण्यामुळे जिथे जिथे बेट तयार झाले, तिथे तिथे दारू गाळणार्‍यांनी हा उपद्व्याप केला. नदीच्या किनार्‍यालगत जवळपास 6 ते 7 किलोमीटरपर्यंत मोहफुले सडविण्यासाठी नदीत व्यवस्था करण्यात आली होती.
 
 
जिल्ह्याच्या ठिकाणाहून अवघ्या काही अंतरावर असले तरी पाण्याने वेढल्यामुळे संपर्क तुटलेल्या या बेटाचा फायदा घेत आपल्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवीत मागील अनेक वर्षांपासून येथे सर्रास दारू काढणे सुरू होते.
बुधवार, 16 रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास भंडारा येथील ठाणेदार मानकर आणि कारधाचे पोलिस निरीक्षक गजाजन कंकाडे यांनी संयुक्त कारवाई करीत या बेटाचे रहस्य उघड केले. बेटावरील ‘तो’ व्याप पाहून पोलिसही दंग राहिले. यावेळी पोलिसांच्या नजरेस पडलेले हजारो क्विंटल मोह सडवा, प्लॅस्टिक व लोखंडी ड्रम, जर्मन व मातीचे मोठमोठे हंडे, लाकडांचा भरमसाट साठा, शेकडो लिटर दारू, विटा, सिमेंटने बांधून टीनशेड केलेले पक्के गोदाम, सिमेंटचे मोठमोठे टाके आणि बरेच काही असे जवळपास 30 लाख रुपयांचे घबाड आढळले. दारूचे अड्डे नष्ट करता करता पोलिसांची दमछाक झाली. पहाटे 5 वाजता सुरू झालेली कारवाई दुपारी 4 ते 5 वाजेपर्यंत सुरूच होती. यावरून उद्योगाच्या विस्ताराची कल्पना येऊ शकेल. एवढे मोठ घबाड सापडल्यानंतर खुद्द अतिरिक्त पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी जोगदंड यांनाही ‘बेट’ पाहण्याचा मोह आवरला नाही.
असे हे अनोखे बेट माहिती झाल्यामुळे जिल्ह्यात नेमके काय सुरू आहे, याचा अंदाज येऊ शकतो.
चौकटीत घेणे

जवाहरनगर पोलिसांवर प्रश्नचिन्ह
खरे तर जवाहरनगर पोलिसांच्या हद्दीत येत असलेले हे दारूचे बेट भंडारा व कारधा येथील दोन पोलिस निरीक्षकांच्या कर्तबगारीने जगजाहीर झाले. त्यामुळे जवाहरनगर पोलिस अवैध धंद्यांवर आळा घालतात, म्हणजे नेमके काय करतात, हाही प्रश्नच आहे.
......
@@AUTHORINFO_V1@@