विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी सुधार कार्यक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2018
Total Views |

रोजगार मिळवण्यास उपयुक्त असल्याची विद्यार्थ्यांची भावना

 
 
 
पुणे : जागतिकीकरणाच्या काळात बाजारपेठेत टिकू शकतील असे समाजशास्त्राचे विद्यार्थी घडविण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून या विद्यार्थ्यांचे भाषिक कौशल्य वाढविण्यासाठी ६ दिवसांची ‘मराठी लेखन कौशल्य आणि शुद्धलेखन’ ही कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे. हा मराठी सुधार कार्यक्रम अतिशय उपयुक्त ठरत आहे, अशी भावना या विभागातील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
 
 
समाजशास्त्र हा विषयाकडे फारसे विद्यार्थी आकर्षित होत नसतात. तरीही हा विषय सामाजिक सुधारणेसाठी अतिशय आवश्यक आहे. मात्र, या विषयाची रोजगाराभिमुखता वाढवण्यासाठी आधुनिक काळातील आर्थिक घडामोडींचा वेग आणि समाजाची गरजांची सांगड घालण्याची आवश्यकता आहे. हे विद्यार्थी समाजातील समस्या व आव्हानांवर उत्तम भाष्य करू शकतात. पण त्यांच्याकडे भाषिक कौशल्यांचा अभाव असल्याने ते लेखन, संपादन किंवा संशोधनाची मांडणी करण्यात कमी पडतात. ही उणीव भरून काढण्यासाठी विद्यापीठाने यावर्षी नवा प्रयोग केला आहे. त्यानुसार या विद्यार्थ्यांसाठी मराठी सुधार कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती या विभागाच्या प्रमुख डॉ. श्रुती तांबे यांनी दिली.
 
 
विद्यापीठातील बहुतांश विभागांमध्ये सध्या विद्यार्थीकेंद्री कार्यक्रम राबवले जात आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकतानाच त्यांना व्यवहाराभिमुख आणि रोजगाराभिमुख शिक्षण मिळेल याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. हेच समाजशास्त्र विभागात मराठी सुधार कार्यक्रमाच्या माध्यमातून घडत आहे, असे डॉ. तांबे यांनी सागितले.
 
या विभागातील एम.फिल.चे संशोधक बालाजी नरवटे यांनी, या कार्यशाळेनंतर त्यांच्यात भाषिक जाणीव रुजल्याचे सांगितले. ते म्हणाले, “मराठी भाषेचे व्याकरण पहिल्या इयत्तेपासून अभ्यासक्रमाला आहे. पण तब्बल १२ ते १५ वर्षे हा विषय शिकून जी भाषिक जाणीव आमच्यात रुजली नाही ती या कार्यशाळे दरम्यान आमच्यात रुजली. अरुण फडके सरांनी ६ दिवसांमध्ये रोज व्याकरण, वाक्यांचे प्रकार, रचना आणि शब्दांची मांडणी, क्रियापदांची निवड करण्यामागील उद्देश असे अनेक विषय ओघवत्या शैलीत समजवले. त्यामुळे आता विविध लेख, पुस्तक किंवा कोणतेही लिखाण वाचताना त्यामध्ये झालेले भाषिक प्रयोग आणि त्याचवेळी झालेल्या चुका लक्षात येतात. तोच विचार स्वतःचे लिखाण करताना पुढे जाऊन महत्त्वाचा ठरेल. माझ्यासारखाच विचार माझ्या बरोबरीने इतर अनेक विद्यार्थ्यांच्या मनात आहे.”
 
मराठी सुधार कार्यक्रमासाठी मराठी भाषेच्या व्याकरणाविषयी दीर्घकाळ कार्यरत असणाऱ्या अरुण फडके यांनी सहा दिवस विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यशाळेला समाजशास्त्र विभागासह इतर विभागातील अनेक विद्यार्थी सहभागी होते.
 
@@AUTHORINFO_V1@@