एक देश का भाव जगे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2018   
Total Views |

 


४ मे २०१८ हा दिवस जनकल्याण रक्तपेढीसाठी एका वेगळ्या कारणाने महत्वपूर्ण ठरला. या दिवशी रक्तपेढीतून रेकॉर्ड ब्रेक रक्तघटक वितरित झाले. या एकाच दिवसात सुमारे ४५५ रक्तघटक वितरित केले गेले. अर्थात यातील महत्वाचा वाटा होता तो अन्य रक्तपेढ्यांना दिल्या गेलेल्या रक्तघटकांचा. यात डॉ. हेडगेवार रक्तपेढी, नागपूर (२०५), डॉ. हेडगेवार रक्तपेढी, अकोला (१०२) आणि फ़ोर्टीस हॉस्पिटल रक्तपेढी, मुलुंड (७०) या तीन रक्तपेढ्यांना मिळुन सुमारे ३७७ रक्तघटक या एकाच दिवसात वितरित झाले आणि अर्थातच पुण्यातील अन्य रुग्णालयांनाही सेवा देणे नेहमीप्रमाणे चालु होतेच.


शुद्ध सामाजिक भावनेतून रक्तपेढीसारखे प्रकल्प चालवताना येणारा सर्वांत क्लेशकारक अनुभव जर कुठला असेल तर तो म्हणजे गरजू रुग्णास ’आमच्याकडे तुम्हाला हवे असलेले रक्त उपलब्ध नाही’ हे सांगण्याचा. वाण्याच्या दुकानात वाण्याला ’साखर संपली’ हे जितकं सहजपणे सांगता येतं तितक्या निर्विकारपणे ’रक्त उपलब्ध नाही’ असे सांगता येऊ शकत नाही. कारण असे म्हणण्याचा अर्थ काय होतो, याची सांगणाऱ्यास कल्पना असते. असे उत्तर मिळाल्यानंतर गरजू रुग्णाच्या नातलगांची स्थिती साहजिकच केविलवाणी होऊन जाते. मग एक तर अन्य रक्तपेढ्या पालथ्या घालणे किंवा त्या विशिष्ट रक्तगटाच्या लोकांचा शोध घेऊन त्यांचा पाठपुरावा करणे, यावाचून काही गत्यंतर नसते. अर्थात हे सर्व करुनही काम होईलच याची मात्र काहीच शाश्वती नाही. मग यावर उपाय काय ? उपाय एकच. कुठल्याही रुग्णाला, कुठल्याही काळात रक्तघटकांचा तुटवडा भासु नये किंबहुना आवश्यक ते रक्तघटक सहजपणे उपलब्ध असावेत अशी स्थिती रक्तपेढ्यांची असायला हवी आणि अर्थातच त्यासाठी रक्तदात्यांनी सातत्याने रक्तदान करत रहायला हवे. पण समजा, इथे पुण्यात रक्तदानविषयक जागृती मोठ्या प्रमाणावर असल्याने रक्तदाते नियमितपणे रक्तदान करीत आहेत, मात्र तशीच स्थिती अन्यत्र असेल असे नाही. पण रक्तघटकांची आवश्यकता तर तिथेही निर्माण होऊ शकतेच. मग अशा वेळी काय करायचे ? अशा वेळी करता येण्यासारखी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे ज्या रक्तपेढीकडे मोठ्या प्रमाणावर रक्तघटकांचा साठा आहे, त्या रक्तपेढीने जिथे रक्तघटकांचा तुटवडा आहे, तिथे रक्तघटकांचा पुरवठा करणे. यालाच आंतर-रक्तपेढी आदान-प्रदान (Inter Blood Bank Bulk Transfer) असे म्हटले जाते.

वाटायला हे सोपे वाटते पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे अगदी अलिकडे म्हणजे २०१५ पर्यंत अशा पद्धतीने रक्तपेढीव्दारा रक्तपेढीला रक्तघटक देण्याला सरकारी पातळीवरुन अनुमतीच नव्हती. त्यामुळे अगदी दोन/तीन वर्षांपूर्वीपर्यंत ज्या रक्तपेढीकडे रक्तघटकांचा तुटवडा आहे, त्यांस काही विशिष्ट कालावधीत ’आमच्याकडे रक्त उपलब्ध नाही’ असे सांगण्यावाचून दुसरा पर्यायच नव्हता. २०१५ साली निघालेल्या या नवीन अधिसूचनेमुळे मात्र रक्तघटकांचा तुटवडा भासणाऱ्या अशा अनेक रक्तपेढ्यांना मोठाच दिलासा मिळाला आहे. रक्तसंकलन व वितरणसंख्येचा विचार करता पुण्याची जनकल्याण रक्तपेढी ही बऱ्यापैकी मोठी रक्तपेढी असल्याने स्वाभाविकच ’आंतर-रक्तपेढी आदान-प्रदानास’ सरकारी पाठबळ मिळाल्यानंतर लगेचच अनेक रक्तपेढ्यांकडुन ’जनकल्याण’ ने असा रक्तपुरवठा करण्यासंबंधी विचारणा सुरु झाली आणि अर्थातच ’जनकल्याण’नेही या सर्वांना सकारात्मक प्रतिसाद तर दिलाच शिवाय या रक्तपेढ्यांना पुढे मोठ्या प्रमाणावर रक्तघटकांचा पुरवठादेखील केला. गेल्या दोन-तीन वर्षांतच जनकल्याण रक्तपेढीने शहरांतील अनेक रुग्णालयांची व रक्तसाठवणूक केंद्रांची गरज पूर्ण करत असतानाच नगर, सोलापूर, उदगीर, गुलबर्गा, नागपूर, अकोला, नांदेड, वसई व मुंबई अशा महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख विभागांमध्ये आणि पुण्यातीलही काही रक्तपेढ्यांना रक्तघटकांचा पुरवठा केलेला आहे.

रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा भासण्याचा काळ हा बहुतेक वेळा उन्हाळ्याच्या व दिवाळीच्या सुट्ट्यांचा असतो. दोन कारणांमुळे या काळात रक्ताची चणचण भासते. एक तर सुट्ट्यांमुळे रक्तदान शिबिर घेणारा संयोजक आणि रक्तदान करणारा रक्तदाता हे दोघेही रक्तदान शिबिर घेण्यास सामान्यत: अनुत्सुक असतात, त्यामुळे शिबिरांची संख्या खालावते आणि दुसरे म्हणजे सुट्ट्या असल्याने याच दिवसांत रुग्णालयांमध्ये काही शस्त्रक्रियांचे आयोजनही केले जाते, त्यामुळे मागणी एकदम वाढते. एका बाजुला संकलन कमी आणि दुसरीकडे मागणीत वाढ अशा दुहेरी अडचणींमुळे स्वाभाविकच रक्तघटकांचा तुटवडा निर्माण होतो. विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यात तर या दिवसांत रक्तसंकलनास हवामानाच्या दृष्टीनेही अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असते. या परिस्थितीतही गरजू रुग्ण आवश्यक त्या रक्तघटकांपासून वंचित राहु नये या हेतुने या भागांतील रक्तपेढ्यांनी पुण्याच्या जनकल्याण रक्तपेढीस साद घातली. तसे पाहता जनकल्याण रक्तपेढीने गेल्या अनेक वर्षांपासून सुट्ट्यांच्या कालावधीत रक्ताचा ओघ कमी होणार नाही यासाठी नियोजनबद्ध रितीने प्रयत्न करुन दर वर्षी स्वत:स या तुटवड्यापासून चार हात लांब ठेवले आहे. पण आता तर या अन्य रक्तपेढ्यांच्याही मागण्यांचा विचार करत ’केवळ इथल्या गरजेपुरते रक्तसंकलन करुन भागणार नाही तर अन्य गरजू रक्तपेढ्यांचा विचार करुन नेहमीपेक्षा थोडे अधिक संकलन या अडचणीच्या काळातही झाले पाहिजे’ याकरिता विशेष प्रयत्न केले गेले. पुण्यातील रक्तदाते आणि शिबिरसंयोजकांना खरोखरीच विनम्र अभिवादन करायला हवे, कारण या प्रयत्नांना मिळालेला त्यांचा प्रतिसाद इतका सकारात्मक होता की त्या आधारावर एप्रिलसारख्या ’खडतर’ महिन्यातही जनकल्याण रक्तपेढी सुमारे २८०० रक्तपिशव्या संकलित करु शकली. वर उल्लेख केलेले एकाच दिवसातील रेकॉर्ड ब्रेक रक्तवितरण हेही मे महिन्यातले आहे, यावरुनच या दिवसांतही रक्तपेढीने केलेले रक्तसंकलन सहज लक्षात यावे. शिवाय इतके वितरण बाहेरच्या रक्तपेढ्यांना करताना दैनंदिन म्हणजेच स्थानिक वितरणावर कुठेही परिणाम झालेला नाही, हेही विशेष.

केवळ संकलन झाले म्हणजे काम झाले असे नव्हे. दूर दूरच्या ठिकाणी रक्तघटक पाठवताना प्रवासादरम्यान त्यांची गुणवत्ता सांभाळली जाणे हेही खूपच गरजेचे असते. म्हणजेच पूर्ण प्रवासात या रक्तघटकांची शीतसाखळी (cold chain) सांभाळणे हे अत्यावश्यक असते, किंबहुना यात जर काही गडबड झाली तर सर्वच खटाटोप व्यर्थ ठरण्याची भीती असते. त्यामुळे शीतसाखळी सांभाळली जाण्यासाठीही रक्तपेढीमार्फ़त विशेष प्रयत्न केले जातात. रक्तपेढीकडे असलेल्या अद्ययावत उपकरणांमुळे (portable refrigerators) आणि वाहनामुळे हा प्रश्न सोडवता आलेला आहे. त्यामुळे नागपूर किंवा गुलबर्ग्यासारख्या दूरच्या ठिकाणीही रक्तघटकांची शीतसाखळी सांभाळून सेवा देणे आजवर शक्य झालेले आहे.

वर उल्लेख केलेल्या रक्तपेढ्यांपैकी एखाद्या रक्तपेढीचा प्रतिनिधी जेव्हा फ़ोनवर ’सर, आम्हाला तुमची गरज आहे. शक्य तितक्या लवकर रक्तघटक पाठवा,’ असे म्हणतो आणि अशा वेळी त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे जेव्हा योग्य वेळेत तिकडे रक्तघटक पाठवले जातात तेव्हा त्यातून मिळणारे समाधान शब्दांत वर्णन न करता येण्यासारखे असते. या रक्तपेढ्यांकडुनही त्या त्या वेळी मिळणारे प्रतिसाद हृदयस्पर्शी असतात. आज मुंबईसारख्या राजधानीच्या ठिकाणी होणाऱ्या ’यकृत प्रत्यारोपणा’सारख्या महत्वाच्या शस्त्रक्रियेसाठी मोठ्या संख्येने लागणारे रक्तघटक हे पुण्याच्या जनकल्याण रक्तपेढीतून पाठवले जात आहेत, किंबहुना ते प्राधान्याने येथून मागवले जात आहेत. अर्थात या श्रेयाचे खरे मानकरी आमचे नियमित रक्तदाते आणि शिबिरसंयोजकच आहेत, याची आम्हाला नित्य जाणीव आहे. समाजाने आमच्याकडे विश्वासाने सुपूर्त केलेली ठेव – त्यावर योग्य ते संस्कार करीत – जशीच्या तशी गरजू व्यक्तीपर्यंत सर्वदूर सुरक्षितपणे पोहोचविली जाणे हा विषय केवळ एखादी वस्तु पोहोचविण्याचा नाही तर ज्या भावनेने या रक्ताचे दान केले गेलेले आहे त्या भावनेचेदेखील हे संक्रमण आहे, अशी आमची धारणा आहे. या अनोख्या संक्रमणामुळे पुण्यातील रक्तदात्यांची नागपूर, गुलबर्ग्यासारख्या अतिदूर ठिकाणीदेखील नकळतपणे रक्ताची नाती निर्माण झाली आहेत. पुण्यातील एखाद्या महाविद्यालयीन तरुणामुळे कदाचित अकोल्यातील एखादा संसार पुन्हा सावरला असेल किंवा पुण्यात आय.टी. कंपनीत काम करणाऱ्या युवतीच्या रक्तामुळे कदाचित उदगीरमधील एखाद्या मातेला प्रसुतिदरम्यान पुनर्जन्मही मिळाला असु शकेल.

’हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेल्याचे’ आपण काव्यातून ऐकतो. ही साधी काव्यात्म कल्पनादेखील नकळत आपल्यामधील राष्ट्रीयतेच्या भावनेला जागृत करते. अगदी याच न्यायाने नकाशाच्या एका टोकाला संकलित झालेले रक्त दुसऱ्या टोकाला असलेल्या आपल्याच कुठल्यातरी बंधू वा भगिनीस नवजीवन देत असल्याचे वास्तव हेही एका अर्थाने राष्ट्रबांधणीचेच काम करते आहे.

’आंतर-रक्तपेढी आदान-प्रदान’ इतके व्यापक आहे !
- महेंद्र वाघ
@@AUTHORINFO_V1@@