यथेच्छसि तथा कुरु।

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

भगवद्गीतेच्या अंतिम म्हणजे अठराव्या अध्यायात 63 वा श्लोक आहे-
इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया।
विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु।।
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, माझ्यासारख्या सर्वज्ञ ईश्वराने तुला हे अत्यंत गोपनीय व रहस्ययुक्त ज्ञान सांगितले आहे. या उपरोक्त शास्त्राचा सम्यक्‌ विचार करून, या ज्ञानाची परिपूर्ण आलोचना करून, तुझी जशी इच्छा असेल तसेच कर.
 
प्रसंग आहे, कुरुक्षेत्रावरील महायुद्धाचा. अजून युद्ध सुरू व्हायचे आहे. एकीकडे कौरवांची तर दुसरीकडे पांडवांची सेना आहे. मधोमध भगवान श्रीकृष्ण व महारथी अर्जुन आहेत. आप्तस्वकीयांशी लढण्याच्या कल्पनेने अर्जुन गर्भगळीत होतो. संमोहग्रस्त होतो आणि युद्ध करणे किती पापदायक आहे वगैरे कारणे श्रीकृष्णाला सांगू लागतो. श्रीकृष्ण त्याची यथेच्छ निर्भर्त्सना करतो. तरीही अर्जुन मानत नाही आणि यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून जे ज्ञान प्रस्फुटित होते, ते म्हणजे आपल्या सर्वांच्या परिचयाची भगवद्गीता! जगातील अंतिम सत्याचे ज्ञान सांगून झाल्यावर, मग भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला, आता तुला वाटेल ते कर, अशी सूचना करतात. पुढचा कथाभाग आपणा सर्वांना ज्ञात आहे.
 
प्रख्यात चिंतक, अर्थशास्त्री आणि पत्रकार एस. गुरुमूर्ती यांना हा श्लोक वाचल्यावर प्रश्न पडला. गीतेच्या अखेरच्या अध्यायात शेवटी शेवटी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला हे जे सांगितले, ते त्यांना आधीच सांगता आले असते. ‘पूर्ण विचारान्ती जे करायचे ते कर’ किंवा ‘मी म्हणतो, युद्ध कर’ अशी आज्ञाही देता आली असती आणि ती आज्ञा अर्जुनाने नाराजीने का होईना पण निमूटपणे पाळलीही असती. भगवान श्रीकृष्णाने हे सांगण्यास इतका वेळ का घेतला? हा प्रश्न घेऊन गुरुमूर्ती बर्‍याच विद्वान लोकांकडे गेले, पण त्यांना काही याचे उत्तर मिळाले नाही. शेवटी गुरुमूर्ती यांनीच स्वत: उत्तर शोधून काढले. ते म्हणतात- गीता सांगण्याच्या आधी, अर्जुन संभ्रमावस्थेत होता. संमोहात होता. नीरक्षीरविवेक गमावून बसला होता. श्रेयस्‌ आणि प्रेयस्‌ काय याचे त्याचे ज्ञान मायेने झाळोळले होते. अशा स्थितीत, त्याला ‘विचारपूर्वक तुला जे योग्य वाटेल ते कर’ असे सांगणे, संकटाला आमंत्रण देण्यासारखेच होते. संभ्रमावस्थेत, विवेकहीन स्थितीत, मनुष्य ‘विचार’ करू शकत नाही. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने प्रथम अर्जुनाचा संभ्रम, संमोह, अविवेक, माया दूर केली. त्यांच्या जेव्हा लक्षात आले की, आता अर्जुन मोहमुक्त झालेला आहे, तेव्हाच त्यांनी त्याला आचरणाचे स्वातंत्र्य दिले. एस. गुरुमूर्तींचे हे प्रतिपादन कुणालाही पटेल असेच आहे.
काय आहे की, स्वातंत्र्य- मग ते, आचाराचे असो की विचाराचे असो, निरपेक्ष नसते. त्याची तुमच्याकडून काही अपेक्षा असते. ती अपेक्षा तुम्ही पूर्ण केली तरच ते आचरण शोभून दिसते, अन्यथा तुमची ती कृती विनाशाला आमंत्रण देणारी ठरते.
 
हे सर्व आठवायचे कारण म्हणजे, गेल्या पंधरवड्यापासून कलाकारांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य, कलेची मूल्ये, समाजासाठी कला की कलेसाठी समाज इत्यादी वैचारिक विषयांवर बुद्धिवंतांच्या वर्तुळात घनघोर चर्चा सुरू आहे. निमित्त घडले ते ‘न्यूड’ नावाच्या मराठी चित्रपटाचे. दिग्दर्शक रवी जाधव यांचा हा चित्रपट आर्थिकपेक्षा वैचारिकच जास्त चालला, अजूनही चालत आहे. दोन्ही बाजूंनी बोलणारे लोक आहेत. एकमेकांना मूर्ख, प्रतिगामी, बुरसटलेल्या विचारांचे, स्वैराचारी वगैरे उपाध्यांनी विभूषित करीत आहेत. दोन्ही पक्षांचे प्रतिपादन किंवा युक्तिवाद अगदीच तथ्यहीन आहे असेही म्हणता येणार नाही. काही ना काही तथ्यांश नक्कीच आहे. मानवी देहाचे चित्रण करण्यासाठी चित्रकाराकडे, पैशाच्या मोबदल्यात (परिस्थितीमुळे) जाणार्‍या महिला मॉडेलच्या मनातील विचार, तिची मानसिकता, तिच्या अंतर्मनातील द्वंद्व वगैर जे काही असेल, त्यावर आधारित हा चित्रपट आहे म्हणतात. त्यावरून हे वैचारिक रणकंदन सुरू आहे. या गदारोळात काही मूलभूत आणि मूल्यवान सिद्धांतांचेही मंथन सुरू आहे. कला म्हणजे काय? कलाकार ती कुठल्या माध्यमातून प्रकट करतो? कशाला करतो? स्वान्त सुखाय की समाजाच्या प्रबोधनासाठी? असे बरेचसे प्रश्न या निमित्ताने चर्चेत आले आहेत.
 
मुळात कला ही निर्विकार, निर्गुण असते. सोन्यासारखी. लाकडासारखी. आपण सोने दाखवू शकत नाही. आपण लाकूड दाखवू शकत नाही. जास्तीत जास्त आपण सोन्याचा दागिना किंवा एखादा आकार दाखवू शकतो. लाकडाची वस्तू दाखवू शकतो. लाकूड नाही. मग लाकूड आणि सोने अस्तित्वातच नाही का? नाही. ते अस्तित्वात असते, पण कुठला तरी आकार किंवा गुण घेतल्याशिवाय त्याचे ‘असणे’, आपल्या कर्मेंद्रियांना, ज्ञानेंद्रियांना आकळत नाही. तसेच कलेचे आहे. ती कुठल्या ना कुठल्या माध्यमातून व्यक्त झाली तरच आकळते. अव्यक्त कला आकळण्यासाठी जी मन:स्थिती लागते, ती एखाद्यालाच साध्य झालेली असते. कलाकाराच्या मनातील संकल्पना मूर्त स्वरूपात साकार होण्यासाठी त्याला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य हवे. त्या स्वातंत्र्याला कुणाही समाजाने मर्यादा घालता कामा नये, असा या कलाकारांचा आग्रह असतो. मान्य. अगदी शंभर टक्के मान्य. पण, ज्या समाजात ही कला प्रकट करायची आहे, तो समाज तितका परिपक्व आणि जाणता आहे का, याचाही विचार करायला नको का? मला ती कला येते म्हणून मी ती केव्हा प्रकट करायची, कशी प्रकट करायची, याचे मला स्वातंत्र्य आहे आणि त्यानुसार मी स्वेच्छेने ते करणार, अशी भूमिका जर कुणी कलाकार घेत असेल तर ती आडमुठीच म्हणावी लागेल.
 
  
म्हणजे, त्या पाच विद्वान आणि सिंहाच्या गोष्टीसारखेच होईल की! पाच विद्वानांपैकी चार जणांना एकेक संजीवन कला येत होती आणि तिचा वापर करून त्यांनी एका मृत सिंहाला जिवंत केले. पाचवा मात्र विवेकी होता. त्यांनी या चौघांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण हे चौघे ‘अभिव्यक्तिस्वातंत्र्या’चे घोर पुरस्कर्ते होते. त्यांनी आपापली कला प्रकट केली. दरम्यान, तो पाचवा विवेकी भावी संकट ओळखून जवळच्या झाडावर चढून बसला. इकडे तो सिंह जिवंत झाला आणि बर्‍याच दिवसांपासून भुकेला असल्याने त्याने त्या चारही विद्वानांना, त्याला जिवंत करणार्‍यांना खाऊन फस्त केले. भगवान श्रीकृष्णानेही सर्वप्रथम अर्जुनाचा संभ्रम दूर केला आणि तो नीट दूर झालेला आहे हे पाहूनच मग त्याला ‘अभिव्यक्तिस्वातंत्र्या’चा उपयोग करण्याची सूचना केली. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे जेव्हा, भारतातील प्राचीन मंदिरांवरील मिथुन शिल्पे आणि काही ग्रंथांमधील वर्णने यांचे दाखले देतात, तेव्हा त्यांना एवढेच सांगावेसे वाटते की, त्या काळातील समाजव्यवस्था, त्या समाजाची मानसिकता, जाण आजच्या समाजासारखी होती का, हे आधी बघा.
 
 
आजच्या भारतीय समाजाला तुमचे हे स्वातंत्र्य पचणार आहे का हे बघा आणि मगच तुमच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याला स्वैर सोडा. वास्तव हे आहे की, तशी स्थिती आज नाही आहे. हा समाज एकेकाळी खूप समृद्ध, संपन्न, विवेकाची जाण असणारा होता. परंतु, हजार वर्षांच्या गुलामगिरीने, अमानुष आघातांनी हा समाज जखमी झालेला आहे, संशयी झाला आहे, आत्मकेंद्रित झाला आहे. जगाचा इतिहास सांगतो की, या अशा आक्रमणांनी जगातील बहुतेक सर्व संस्कृती, सभ्यता नष्ट झाल्या आहेत. परंतु, भारतीय समाज कसाही का असेना, जिवंत राहिला आहे. स्वातंत्र्यानंतर या समाजाला आपलेपणाची वागणूक मिळेल असे वाटत होते. पण ती आशा फोल ठरली आहे. स्वातंत्र्यानंतरही त्याच्यावर आघात होतच गेले. त्याच्या जखमांवर मीठ चोळणे सुरूच राहिले. त्याने तरी काय करावे? त्याला थोडी उसंत नको का द्यायला? हा विवेक, हा संयम जर कलाकारांनी ठेवला तर त्याला ‘न्यूड’सारख्या चित्रपटाऐवजी, दुसर्‍या एखाद्या विषयाला धरून आपल्या कलेचे प्रकटीकरण करण्याची इच्छा होईल. हे घडत नाही म्हणून हा सर्व गोंधळ, गदारोळ होत असतो, हे आपण समजून घेतले पाहिजे.
@@AUTHORINFO_V1@@