कॅन कनेक्ट फाऊंडेशन’ची मानवता कॅन्सर सेंटरला ७ कोटी रुपयांची देणगी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2018
Total Views |
 
 

वर्षभर कर्करोग निदानात्मक चाचण्या मोफत

 

 
 
नाशिक : सर्वेक्षणानुसार कर्करोग रुग्णांच्या संख्येत भारत आता जगात तिसर्‍या क्रमांकावर आहे. ही बाब खूप गंभीर आहे. ५० टक्क्यांहून अधिक रुग्णांमध्ये कर्करोग खूप उशिरा कळतो. कर्करोगाचे निदान करण्याकडे सगळेच दुर्लक्ष करतात, हे यामागचे मुख्य कारण असते. कर्करोगाबद्दलची कमी जागृती आणि निदानासाठी केल्या जाणार्‍या तपासणीचा खर्च यामुळे कर्करोग निदानास उशीर होतो. उपचारासाठी लागणारा आर्थिक खर्च अधिक असल्याने ६० टक्के रुग्णांना तपासणी व उपचारासाठी अडचण येते. यामुळे आर्थिक अडचणी व कर्जबाजारीपणा येतो.
 
कर्करोग झालेल्या रुग्णाच्या कुटुंबाचा मासिक खर्च ४० टक्क्यांहून अधिक वाढतो. यामुळे उपचार घेणे अवघड बनते. वैद्यकीय विमा सरकारी योजनांमध्येसुद्धा उपचार घेण्यासाठी नियम व अटी पाळाव्या लागतात. त्यामुळे जवळपास ८ पैकी २ रुग्ण पैशांअभावी पूर्ण उपचार घेऊ शकत नाही. हीच बाब समोर आली असताना आता यावर मात करण्याचा प्रयत्न ’कॅन कनेक्ट फाऊंडेशन’च्या आर्थिक सहकार्याने एचसीजी मानवता हॉस्पिटल करणार आहे. 'कॅन कनेक्ट फाऊंडेशन’ ही एक सेवाभावी संस्था आहे, जी तळागाळातल्या लोकांसाठी काम करते. तिचा मुख्य उद्देश कॅन्सर रुग्णांना कमीतकमी खर्चात निदान व उपचार उपलब्ध करून देणे हा आहे.
 
सीडीसीबद्दल ही जगातली एकमेव संस्था आहे, जिथे तज्ज्ञांकडून आधुनिक जनुकीय चाचण्यांच्या आधारे कॅन्सर रुग्णांवर उपचार केले जातात. ‘कॅन कनेक्ट फाऊंडेशन’ यांनी एच.सी.जी. मानवता कॅन्सर सेंटरच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त ७ कोटी रुपयांची आर्थिक मदत देऊ केली आहे. या माध्यमातून कर्करोग रुग्णांना निदान तपासणी मोफत करून मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या तपासण्यांमध्ये रक्ताच्या सर्व तपासण्या, एक्स रे, सोनोग्राफी, सिटी स्कॅन, एमआरआय स्कॅन, बायोप्सी इ. चा समावेश आहे. याशिवाय कर्करोग रुग्णाला निदानासाठी पेट-सिटी स्कॅन करण्याकरता जे १८ हजार रु. खर्च येत होता, त्याऐवजी आता मात्र ७ हजार ५०० रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे मोफत कॅन्सर निदान, तपासणी, उपचारांचे मार्गदर्शन करण्यास मोठी मदत होणार आहे.
 
आजाराकडे होणारे दुर्लक्ष तसेच केवळ तपासणी न केल्याने आजार बळावून अनेक रुग्ण मृत्यूशी झगडतात. खास करून स्तन व गर्भाशयमुख कॅन्सर आजाराने महिला ग्रस्त असतात. यात शहरी महिलांच्या तुलनेत ग्रामीण भागातील महिलांचे मोठे प्रमाण आहे, परंतु त्यांच्याकडून याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. १५ ते ४४ वयोगटातील कॅन्सर पीडितांची संख्या मोठी असून एका वर्षात ६७ हजार ४७७ महिला या आजारामुळे मृत्युमुखी पडतात. यामुळे ही बाब गंभीरतेने लक्षात घेता सामाजिक बांधिलकीतून एच.सी.जी. मानवता कॅन्सर सेन्टर व ’कॅन कनेक्ट फाऊंडेशन’ यांच्या वतीने १४ मे २०१८ पासू वर्षभरासाठी सर्वात मोठी मदत कर्करोग रुग्णांसाठी उपलब्ध होईल. आगामी वर्षात दर महिन्याला ६०० ते ७०० रुग्णांना याचा फायदा होईल, अशी माहिती एचसीजी मानवता हॉस्पिटलचे एम. डी. व चिफ सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. राज नगरकर व ’कॅन कनेक्ट फाऊंडेशन’ च्या स्नेहा दातार यांनी दिली. यामुळे कॅन्सरसंबंधित रुग्ण या नाशिक शहरामध्ये या उपक्रमाचा लाभ घेऊ शकतील, महाराष्ट्रात कर्करोग निदानासाठी राबविला जाणारा हा सर्वात मोठा उपक्रम ठरणार आहे. आर्थिक बचतीसोबत कर्करोग निदानाचा लाभ जास्तीत जास्त घटकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@