गरज दृष्टिकोन बदलण्याची

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-May-2018   
Total Views |
 

असं म्हणतात की, बाहेरच्या जगात वावरताना पुस्तकी ज्ञानापेक्षा तुमचं व्यावहारिक ज्ञान जास्त उपयोगी पडतं. त्या ज्ञानाचा तुम्ही कधी आणि कसा उपयोग करून घेता, यावरून तुमची खरी क्षमता, पात्रता ठरत असते. अर्थात, यामुळे पुस्तकी ज्ञानाला दुय्यम दर्जा द्यायचा, असे नाही, तर आजच्या युगात तुम्ही ‘स्मार्ट’ असणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण, यशस्वी होण्यासाठी जिद्द, मेहनत ही हवीच. परंतु, त्याच्या जोडीला तुम्हाला तुमची एक वेगळी प्रतिमा तयार करता आली पाहिजे. तुमच्यातलं वेगळंपण, वेगळी कौशल्ये तुम्हाला सिद्ध करून दाखवता आली पाहिजे. नवनवीन प्रयोग करून, तज्ज्ञांच्या मदतीने अवघड वाटणारी समीकरणं सोपी करून दाखवता आली पाहिजे. आता यामध्ये शेती व्यवसायाचं उदाहरण देता येईल. भारत देश हा कृषिप्रधान देश आहे परंतु, गेल्या काही वर्षांपासून पडणारा अवकाळी पाऊस, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, शेतमालाला मिळणारी कमी किंमत, या एक ना अनेक कारणांमुळे शेतीव्यवसाय, शेतकरी यांच्याविषयी एक नकारात्मक प्रतिमा तयार झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक तरुण परंपरांगत शेती व्यवसायाकडे पाठ फिरवू लागला. अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासूनच असली तरी आजच्या शेतकरी कुटुंबातील तरुणांचा या व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. ग्रामीण भागातील लग्‍नाच्या वयात आलेल्या तरुणींना आपला भावी जोडीदार हा शेतकरी नसावा, अशी अटदेखील घालू लागल्या आहेत. अशी विचारसरणी निर्माण व्हायला जबाबदार आहे ती परिस्थिती. पण, म्हणून या सर्वांचं खापर शेतकर्‍यांवर फोडून चालणार नाही. आता ही झाली पहिली बाजू. पण याची दुसरी बाजूदेखील समजावून घेतली पाहिजे. मुळातच आपल्या आजूबाजूला चांगल्या-वाईट, सकारात्मक, नकारात्मक अशा दोन्ही गोष्टी घडत असतात. पण, आपण नकारात्मक बाबींमध्ये जास्त गुंतून जातो. आज पुस्तकी ज्ञानापासून वंचित राहिलेला किंवा लिहिण्या-वाचण्यापुरतं शिक्षण घेतलेला एखादा शेतकरी जेव्हा कल्पकतेच्या जोरावर, मेहनत करून एखाद्या उत्पन्नातून लाखोंचे उत्पन्न मिळवतो, त्यावेळेस त्या शेतकर्‍याचं नवल वाटतं. अलीकडे अशा शेतकर्‍यांच्या यशोगाथा नेहमीच वाचण्यात, ऐकण्यात येत असतात, तर मग अशा शेतकर्‍यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवायला काहीच हरकत नाही.
 
 
 
000000000000000000000000000000000000000000000000
 
 
विद्यार्थ्यांचा कल बदलतोय...
 
आपल्याला जे आवडतं, जिथे आपलं मन रमतं त्याच गोष्टी प्रत्येकाने करायल्या हव्यात. कारण, दुसर्‍यांच्या सांगण्यावरून, स्वतःमधल्या असलेल्या क्षमतेचा, कलागुणांचा विचार न करता निवडलेला पर्याय सहसा योग्य ठरत नाही. नशिबाने का होईना, आज शालेय शिक्षण संपल्यानंतर पुढच्या करिअरची दिशा ठरविण्याची मुभा ही आजच्या मुलांना दिली जाते. आपल्या मुलांनी काय करावं याचा निर्णय त्यांनी स्वतः घेतला पाहिजे, अशी विचारसरणी पालकांमध्ये निर्माण झाली आहे. पण, पूर्वी परिस्थिती थोडी वेगळी असायची. निव्वळ मिळालेल्या टक्क्यांच्या जोरावर किंवा मोठ्या भावंडांनी कोणती शाखा निवडली, त्यावरून त्याचा पुढचा प्रवास ठरवला जायचा. महत्त्वाची बाब म्हणजे, आज इतके अभ्यासक्रम, पर्याय उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना करिअरचे अनेक मार्ग खुले झाले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून शिक्षण विभागातर्फे दहावीच्या परीक्षेनंतर कलचाचणी घेतली जाते. यातून विद्यार्थ्यांचा कल नेमका कशामध्ये आहे, हे उमगते. राज्याच्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या कलचाचणीमध्ये मुंबई महानगर क्षेत्रातील तब्बल ४६ हजार मुलांनी शेतीच्या अभ्यासात रस दाखवला आहे. या कलचाचणीचे निष्कर्ष विभागाने नुकतेच जाहीर केले. राज्याप्रमाणेच मुंबईतील सर्वाधिक विद्यार्थ्यांचा कल हा वाणिज्य शाखेकडे आहे. राज्यातील इतर भागांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे विदर्भ, मराठवाड्यातील विभागांबरोबरच कोल्हापूर, पुणे या भागांपेक्षाही कृषी क्षेत्राकडे कल असलेले विद्यार्थी मुंबईत जास्त आहेत. घरातील अनेक पिढ्या शेतावर राबूनदेखील होणारी आर्थिक ओढाताण पाहून ग्रामीण भागातील मुलांना शहरातील नोकर्‍या खुणावत असल्या तरी, सिमेंट काँक्रिटच्या जंगलात वाढलेल्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई या शहरांतील मुलांना मात्र कृषी क्षेत्र खुणावत आहे. सांगायचा मुद्दा हाच की, शेती व्यवसाय हे आव्हान असले तरी त्यातून चांगल्या पिकाचं उत्पन्न, आर्थिक उत्पन्न मिळू शकतं. अर्थात यासाठी थोडा कालावधी लागेल, यात काही वाद नाही. पण जरा सहनशक्ती ठेवली तरी घेतलेल्या मेहनतीचं फळ मात्र निश्‍चितच मिळेल. यासाठी कृषीविषयक शिक्षण देणार्‍या अभ्यासक्रमामध्ये आवश्यक ते बदल करायला हवेत. आधुनिक तंत्रज्ञान, तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले की शेतीला नक्‍कीच ’अच्छे दिन’ येतील.
 
 
 
 
 
- सोनाली रासकर 
 
@@AUTHORINFO_V1@@