अधिस्वीकृत पत्रकारांना 'शिवनेरी'चा गारेगार प्रवास लवकरच मोफत मिळणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-May-2018
Total Views |
 

 
 
मुंबई : राज्यातील अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना राज्य परिवहन अर्थातच, एसटी महामंडळाच्या ‘शिवशाही’, ‘शिवनेरी’ आदी वातानुकूलित बसमध्ये मोफत प्रवासाची सवलत लवकरच देण्यात येणार आहे. काल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला तत्वत: मान्यता देण्यात आली. गेले कित्येक महिने अनेक पत्रकार संघटनांकडून याकरिता मागणी होत होती.
 
राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी सुरु करण्यात येईल, अशी माहिती दिवाकर रावते यांनी दिली. सध्या एसटीच्या साध्या, सेमी लक्झरी इ. गाड्यांमध्ये अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना मोफत प्रवास सवलत आहे. ही सवलत अन्य आरामदायी गाड्यांनाही लागू करावी,अशी विविध पत्रकार संघटनांची मागणी होती. याबाबत दिवाकर रावते म्हणाले की, एसटीच्या ‘शिवशाही’, ‘शिवनेरी’सह इतर सर्व अत्याधुनिक आणि आरामदायी गाड्यांमध्ये अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना मोफत प्रवास सवलत देण्याबाबत माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने अधिस्वीकृत पत्रकारांची संख्या तसेच संभाव्य खर्चाची माहिती एसटी महामंडळास सादर करावी. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर प्रस्ताव सादर करुन मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर ही सवलत योजना तातडीने लागू केली जाईल. एसटी महामंडळामार्फत विविध घटकांना प्रवास सवलत योजना राबवण्यात येतात. या विविध सवलत योजनांचा संपूर्ण खर्च आता परिवहन विभागामार्फत करण्यात येणार आहे. सर्व विभागांच्या सवलत योजनेचे दायित्व आता परिवहन विभाग स्वीकारणार असून मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय अंमलात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकारांच्या सवलत योजनेचा खर्च आतापर्यंत माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात येत होता. मात्र, आता हा खर्चही परिवहन विभागामार्फत करण्यात येणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@