Tech भारत : आर्टिफिशिअल इन्टेलिजन्सचे भवितव्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-May-2018   
Total Views |


 
 
एखादा रोबोट आपल्याशी बोलत असतो, आपण सांगू ते काम करत असतो असे रंगवलेले चित्र हिंदी, हॉलीवूड चित्रपट तसेच मालिकेत आपण अनेकदा पहिले असेल. तो रोबोट माहिती तंत्रज्ञानाच्या आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स शाखेचा एक अविष्कार आहे. मात्र रोबोट तसाच असतो, असे नाही! त्याचे स्वरूप वेगवेगळे असू शकते. कधी तो सिरी, गुगल असिस्टंट अथवा कोर्टाना सारख्या मोबाईल अॅपच्या स्वरुपात आपल्याशी बोलत असतो. याचा अनुभव आपल्यातील अनेकांनी घेतला असेलच. आर्टिफिशिअल इन्टेलिजन्सचे विश्व तसे खूप मोठ्ठे आहे. त्याबद्दल जाणून घेऊ या.
 
काय आहे आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स?

यंत्राने एखादी गोष्ट मानवाप्रमाणे समजून घेणे, आणि त्यानुसार ती करणे हे मुख्य उद्दिष्ट ठेवून आर्टिफिशिअल इन्टेलिजन्सची थिअरी मांडण्यात आली होती, आणि त्यानुसार हे क्षेत्र विकसित होत आहे. आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स ही कंप्युटर क्षेत्राची एक शाखा आहे. यात स्पीच रिकग्निशन म्हणजे आवाजाच्या माध्यमातून प्रश्नांची उत्तरे देणे, योजना आखणे, समस्या सोडविणे, माहितीचे पृथ:करण करणे अशा विविध सुविधा आज दिल्या जात आहेत. हे तंत्रज्ञान आज काही क्षेत्रात प्रभावीपणे वापरले जात आहे. मात्र येणाऱ्या दशकात आर्टिफिशिअल इन्टेलिजन्सने अनेक क्षेत्रांना प्रभावित केलेले असेल. त्याचा वाढता वापर पाहता ते कोणत्या क्षेत्रात कुठली भूमिका बजावेल हे बघितले पाहिजे.
ऑटोमोबाईल उत्पादन


ऑटोमोबाईल क्षेत्रात आर्टिफिशिअल इन्टेलिजन्सचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची चर्चा आहे. चालक विरहित कारची संकल्पना यामुळे प्रत्यक्षात उतरणार आहे. मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर करून यात कार विकसित केल्या जाणार आहेत. या क्षेत्रातील मोठी कंपनी ऑडी या वर्षाखेर चालक विरहित कार बाजारपेठेत आणणार आहे. ही कार या क्षेत्राचा कायापालट करेल. त्यामुळे कदाचित मोठ्याप्रमाणात अशा कार बाजारपेठेत क्रांती घडवतील.
वैद्यकीय सेवा आणि सुविधा


काही वर्षांनी वैद्यकीय सेवा मिळविण्यासाठी अनेक रुग्णालये रुग्णांच्या माहितीची कंप्युटरद्वारे चाचणी करून प्रत्येक आजाराचा भविष्याचा स्कोप ठरवतील. छोट्या-मोठ्या आजारांसाठी थेट डॉक्टरकडे न जाता आर्टिफिशिअल इन्टेलिजन्सच्या सहाय्याने त्याचे उपचार घरी केले जाऊ शकतात,त्यासाठी असे अनेक अॅप्स यासाठी विकसित केले जाऊ शकतात. माहितीचे पृथ:करणकरून हे अॅप्स तुमच्या आजरासंबंधी अनेक माहिती रोजच्या रोज देऊ शकतात. त्याचबरोबर डॉक्टरेतर वैद्यकीय टीमसाठी सुद्धा हे अॅप्स निर्णय प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात उपयोगी ठरतील. येत्या काहीवर्षांत आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स वैद्यकीय क्षेत्रात महत्वाची भूमिका नक्कीच बजावेल.


डेटा वैज्ञानिक


माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात माहिती सुरक्षितता आणि माहितीचे पृथ:करण या बाबींना अनन्य साधारण महत्व आहे. तेव्हा डेटा वैज्ञानिक ही संकल्पना मोठ्या प्रमाणात महत्वाची भूमिका बजावणारी आहे. २०२० पर्यंत यांचा प्रभाव या क्षेत्रात प्रचंड वाढणार आहे. एखाद्या यंत्राला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर त्याने देणे, त्याचबरोबर समस्येचे समाधान करून देणे यावर आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स लोकप्रिय होणार आहे, या पार्श्वभूमीवर या क्षेत्राचे व्यवस्थापन करण्यासाठी अनेक डेटा वैज्ञानिकांची आवश्यकता भासेल. आज आहेत त्याच्या ४ पट डेटा वैज्ञानिक याकाळात लागतील.
 
 
आज आर्टिफिशिअल इन्टेलिजन्समध्ये काम करणाऱ्या अनेक कंपन्या कुशल डेटा वैज्ञानिकांच्या शोधात आहेत. त्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत जाणारी आहे. त्याचबरोबर आर्टिफिशिअल इन्टेलिजन्सच्या वाढत्या वापराबरोबरच त्यातून निर्माण होणारा डेटा देखील वाढेल. यासर्वाचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी तेव्हा अर्थातच डेटा वैज्ञानिकांवर असेल.
 
 
आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स या क्षेत्राचा प्रभाव नक्कीच प्रत्येक क्षेत्रात वाढत जाणार आहे. याचे परिणाम फायद्याचे किंवा तोट्याचे देखील असू शकतात. मात्र यामुळे जग तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक नवीन उंची नक्कीच गाठेल. यासाठी काही क्षेत्रावर घडणाऱ्या प्रभाव/ परिणामाची प्राथमिक स्वरुपात माहिती देण्याचा हा प्रयत्न होता. पुढच्या आठवड्यात नवीन विषयासह भेटूच. आपण Tech भारत वाचत राहा.
- हर्षल कंसारा
@@AUTHORINFO_V1@@