पावसाळा तोंडावर आला तरी नाल्यातील गाळ नाल्यातच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-May-2018
Total Views |

अन महापौर म्हणतात, मुंबईची तुंबई झाल्यास सरकार जबाबदार
नालेसफाईबाबत नगरसेवक, नागरिकांच्या तक्रारी

 
 
मुंबई : मुंबई महापालिकेचे पावसाळापूर्व नालेसफाईचे कामे सुरु आहेत असा दावा पालिका दावा करत आहे. एकीकडे पावसाळा तोंडावर येऊन उभा राहिला तरी नाल्यातील गाळ नाल्यातच आहे, काही ठिकाणी सफाईचा दिखावा केला आहे, काही ठिकाणी सफाईच्या कामाला सुरवातच झाली नाही अशी स्थिती आहे. तर दुसरीकडे पावसाळ्यात मुंबईची तुंबई झाल्यास राज्य शासन जबाबदार राहील, असा आरोप करत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सत्ताधारी पक्षाची नालेसफाईची जबाबदारी झटकून हात मोकळे केले आहेत.
 
महापौर महाडेश्वर यांनी आज पश्चिम उपनगरातील वांद्रे ते दहिसरपर्यंतचे नाले, मिठी नदी, ओशिवरा नदी या ठिकाणी भेट देऊन पावसाळ्यापूर्वी सुरू असलेल्या नालेसफाई कामांची पाहणी केली. यावेळी महाडेश्वर यांनी दोन -तीन नाले, नदीच्या ठिकाणी अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपमहापौर हेमांगी वरळीकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, प्रभाग समिती अध्यक्ष सदानंद परब, माजी नगरसेवक दीपक भूतकर, माजी नगरसेवक मोरजकर, नगरसेवक राजू पेडणेकर, हर्षद कारकर, शीतल म्हात्रे, रिद्धी खुरसुंगे, माजी नगरसेवक भास्कर खुरसुंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
नालेसफाईच्या दौऱ्याची सुरुवात बीकेसी ब्रिज वरून झाली तिथे मिठी व वाकोला नदीचा संगम आहे. १ एप्रिल पासून येथील सफाई काम सुरु आहे. या कामाला दीड महिना झाला परंतु नाल्यातील गाळ नाल्यातच टाकला जात आहे. पाहणी दौरा सुरु असताना पोकलेन मशीनने नाल्यातील गाळ काढून तेथेच टाकला जात आहे. तो नाल्याच्या बाहेरही टाकला जात नाही. तिथेच टाकल्यामुळे सांडपाण्याच्या प्रवाहा सोबत तो गाळ पुन्हा पुढे वाहून जात आहे. एकूणच नाल्यातील गाळ नाल्यातच राहत आहे. इतर ठिकाणीही परिस्थिती समाधानकारक नाही. तर अचानक भेट दिली तिथे कामच सुरु झाले नाही असे असतानाही मुंबईत सरकारी प्राधिकरण असलेल्या मेट्रो, एमएमआरडीए आदीकडून पालिकेची परवानगी न घेताच ठिकठिकाणी मेट्रोची व अन्य विकासकामे सुरू आहेत. पालिकेच्या मलनि:सारण व पर्जन्य जलवाहिन्यांची तोडफोड करण्यात आल्याने जर उद्या मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबले तर त्याला पालिका नव्हे तर राज्य सरकार, एमएमआरडीए,मेट्रो रेल्वे हे जबाबदार असतील, असा आरोप महापौर विश्ववनाथ महाडेश्वर यांनी केला आहे.
 
मुंबईत आतापर्यंत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी ६०%, पावसाळ्यात २०% आणि पावसानंतर २०% याप्रमाणे नालेसफाईची कामे करण्यात येत होती ; मात्र यंदा पावसाळ्यापूर्वी ७०% , पावसाळ्यात १५% आणि पावसाळ्यानंतर १५% याप्रमाणे नालेसफाई करण्यात येणार आहे.परंतु यंदा पावसाळ्यापूर्वी मुंबई महापालिकेने जरी ५०% नालेसफाई झाल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात ३०% ते ४०% इतकीच सफाई झालेली आहे, असे सांगत महापौरांनी पालिकेचा सफाई कामांची आकडेवारी फोल ठरवली आहे.
 
आता उर्वरित नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करून घेणे पालिका प्रशासनाचे काम असून सत्ताधारी पक्ष म्हणून शिवसेना ही नालेसफाईची कामे प्रशासनाकडून करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू ; मात्र जर अतिवृष्टी झाली , समुद्राला मोठी भरती आली आणि मुंबईत पूरस्थिती निर्माण झाल्यास आपण परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा आटोकाट प्रयत्न करू, त्यापेक्षा जास्त काहीही करू शकणार नाही,असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
 
नालेसफाईची कामे आमच्या विभागात नीटपणे करण्यात आलेली नाहीत, अशा तक्रारी शिवसेनेचे नगरसेवक राजू पेडणेकर, शीतल म्हात्रे,हर्षद कारकर आदी नगरसेवकांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे केल्या ; मात्र पालिका पर्जन्य जलवाहिनी विभागाचे प्रमुख अधिकारी विद्याधर खणकर यांच्यसह अभियंते व कंत्राटदार यांनी , सदर नाल्यांची सफाई करण्यात आल्याचे फोटो महापौर यांना दाखवत नगरसेवकांना खोटे पाडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. यावेळी,दहिसर नदी पात्रातही कंत्राटदाराने सफाई केली नसल्याची तक्रार राधारमण इमारतीमधील स्थानिक रहिवाशी वैशाली पवार- जोशी यांनी, महापौर यांच्याकडे केली. मी दररोज या दहिसर नदी परिसरात जॉगिंगला येत असते पण मला या ठिकाणी कंत्राटदाराकडील एकही पोकलेन मशीन नदी पात्राची सफाई करताना दिसली नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला. तसेच आर/ मध्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांनीही, दहिसर नदीच्या पात्राची खोली खूप जास्त असून यक नदीत वरकरणी सफाई झाली आहे,असा दावा करीत कंत्राटदाराला गोत्यात आणले त्यावर महापौर यांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच महाराष्ट्र नगर , वांद्रे (पूर्व) येथील वाकोला नदी पात्रात गेल्या दीड वर्षांपासून सफाई काम झालेले नसल्याच्या तक्रारी पत्रकारांशी बोलताना केला.
 
सफाईला मुहूर्त मिळेना
 
नालेसफाई पाहणी दौरा सुरु असताना महाराष्ट्र नगर, वांद्रे(पूर्व) येथील वाकोला नदीच्या पात्राच्या दोन्ही बाजूला भूमाफियांनी भरणी टाकून अतिक्रमण केल्याचे व अनधिकृत बांधकामे, झोपड्या बांधल्याचे आढळून आले. याठिकाणी नदीच्या पत्रामध्ये कचऱ्याचे ढीगच्या साचले असून येथे गेल्या वर्षभरापासून येथे नाले सफाईच झाली नसल्याचे स्थानिक रहिवाशी सोमती कुडियाल यांनी सांगितले.
 
नागरिकांमध्ये जनजागृती आवश्यक
 
वाकोला नदी पात्राची सफाई पाहणी करताना महाराष्ट्र नगर येथील परिसरात नदीच्या पात्रात रहिवाशांनी मोठ्याप्रमाणावर कचरा टाकला आहे. कचऱ्याच्या प्लॅस्टिक पिशव्यांचा खच साचला आहे. पात्राच्या झोपडपट्टी भागांतील एका बाजूला जेथून मोठी जलवाहिनी गेली होती त्यालगतच एक व्यक्ती उघड्यावर शौचाला बसली होती. तसेच दौरा सुरु असताना काही नागरिकांनी झोपडपट्टीतील कचऱ्याचा डबा आणून नदी पात्रात कचरा टाकला. याबाबत सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.तसेच याबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
 
कंत्राटदाराला नोटीस
वाकोला ब्रिज येथेही वाकोला नदी पात्रातही सफाईकामाला सुरुवात न झाल्याचे पाहून महापौर यांनी , संबंधित कंत्राटदार एम. बी. ब्रदर्सला नोटीस देण्याचे आदेश पालिका अधिकाऱ्यांस दिले. या ठिकाणी कंत्राटदाराने सफाई कामाला सुरुवात न केल्याने व महापौर यांनी नोटीस देण्याचे आदेश दिल्याने अधिकाऱ्याने तत्काळ १५ दिवसात सफाई काम करून घेण्यात येईल, असे आश्वासन महापौर यांना दिले.
 
@@AUTHORINFO_V1@@