वारली चित्रकलेचा साधक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-May-2018
Total Views |




चित्रांतील जिवंतपणामुळे आता आतापर्यंत वनवासी पाड्यांपुरतीच मर्यादित असलेली वारली चित्रकला तुमच्या-आमच्या आयुष्याचा भाग बनली. वारली चित्रकलेला जागतिक दर्जा, स्थैर्य आणि प्रतिष्ठा लाभली. वारली चित्रकलेला जगभरात मानाचे स्थान प्राप्त करून देणारा हा साधक होता, जिव्या सोमा म्हशे.

मांजरपाटाच्या कापडावर शेणाचा लेप देऊन तयार केलेला कॅनव्हास... सुरुवातीला तांदळाच्या पीठाने आणि नंतर नंतर जसा शहरांशी संपर्क आला तसे फेव्हिकॉल-पांढर्‍या रंगाच्या मिश्रणातून साकारलेले त्रिकोण, काटकोन, पंचकोन... त्यांना दिलेले निरनिराळे आकार... शिकारीची दृश्ये, सुगीचा हंगाम, नृत्य, मिरवणुकीची चित्रे... पंचतारांकित हॉटेलांपासून ते अगदी एलिट क्‍लासपर्यंतच्या ड्रॉईंग रूमच्या भिंती सजवणारी वारली चित्रकारी... डिश, फ्लॉवर पॉट, टी-शर्ट, साड्या, कुर्ते ते अगदी पेनावरसुद्धा नांदणारी... वेड्यावाकड्या पद्धतीने काढलेल्या हडकुळ्या आकृत्यांमध्ये अगदी रशिया, इटली, जर्मनी, जपान, चीन, इंग्लंड, बेल्जियम या जगभरातल्या देशांनाही भुरळ घालण्याचे सामर्थ्य लाभलेली... जिव्या सोमा म्हशे यांना कधी वाटलेही नसेल की, फक्त एवढ्याच ऐवजाच्या जोरावर आपण इतके मोठे होऊ. पण ते झाले. देशातच नव्हे तर परदेशातल्या कलाप्रेमींनाही त्यांच्या वारली शैलीतील चित्रांनी भुरळ घातली. पण कोण होते जिव्या सोमा म्हशे? ज्या समाजाला आजही आधुनिकतेचा स्पर्श झालेला नाही, जिथले जीवन आजही शतकानुशतकांच्या भूतकाळातच जगले जाते, त्या मातीत जन्मलेला हिरा म्हणजे जिव्या सोमा म्हशे. १३ मार्च १९३१ हा त्यांचा जन्मदिन, तर १५ मे २०१८ या दिवशी लौकिकार्थाने भूतलावर त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. पण १५ मे हा खरेच त्यांचा अखेरचा दिवस असेल? तर लौकिकार्थाने नाही. कारण, ‘मरावे परी कीर्तीरूपे उरावे’ ही म्हण ज्या मोजक्याच लोकांना सत्यात उतरवता येते, त्यापैकीच एक म्हणजे जिव्या सोमा म्हशे.

आताच्या पालघर आणि तत्कालीन ठाणे जिल्ह्यातल्या तलासरी तालुक्यातील धामणगावात जिव्या सोमा म्हशे यांचा जन्म झाला. वयाच्या सातव्या वर्षी त्यांच्या डोक्यावरचे आईचे छत्र हरपले. आई गेल्याचा आघात सहन न झालेल्या संवेदनशील मनाच्या जिव्याची त्यामुळे वाचाच गेली. रोजच्या जगण्याचा संघर्ष सुरू झाला. ते अबोल झाले. तोच संघर्ष त्यांच्या चित्रांत उतरला. मनातल्या संवेदना, भावना चित्रांच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागल्या. चित्रांतील जिवंतपणामुळे आता आतापर्यंत वनवासी पाड्यांपुरतीच मर्यादित असलेली वारली चित्रकला तुमच्या-आमच्या आयुष्याचा भाग बनली. वारली चित्रकलेला जागतिक दर्जा, स्थैर्य आणि प्रतिष्ठा लाभली. वारली चित्रकलेला जगभरात मानाचे स्थान प्राप्त करून देणारा हा साधक होता, जिव्या सोमा म्हशे. धामणगावात जरी त्यांचा जन्म झाला असला तरी अकराव्या वर्षी ते गंजाड येथे आले. १० व्या शतकातली वारली चित्रशैली, मध्यंतरी कालौघात बंद पडलेली आणि पुन्हा १७ व्या शतकात साकारली गेलेली वारली चित्रकला... जिव्या सोमा म्हशे यांनी इथूनच आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवली. रुढी, परंपरा आणि अंधश्रद्धांचा प्रचंड पगडा असलेल्या, अठराविश्‍वे दारिद्य्राने गांजलेल्या आपल्या वनवासी समाजाच्या या चित्रकलेचा त्यांनी ध्यास घेतला. वनवासी समाजातील महिला लग्न समारंभाच्या काळात घरांच्या भिंतीवर पारंपरिक पद्धतीने वारली चित्रे काढत असत. ही चित्रे काढण्याची परवानगी फक्त सुवासिनी स्त्रियांनाच होती. जिव्या सोमा म्हशे यांनी मात्र ती परंपरा मोडीत काढली. भिंतींवरील ही चित्रकारी त्यांनी कागदावर, कॅनव्हासवर आणली. त्याचीही मोठी गोष्ट आहे.

वारली चित्रे प्रामुख्याने वनवासी समाजाची संस्कृती आणि नित्यनैमित्तिक जीवनातील दृश्यांबद्दलची असत. त्यात कन्सारी देवता, पिशाच्चपरिहार विधी इत्यादींना प्राधान्य असे. याशिवाय भौमितिक रचनाबंध, शिकारीची दृश्ये, सुगीचा हंगाम, पाखडणे, नृत्य, मिरवणूक यांचाही समावेश असे. पुरुषांचा कमी सहभाग असलेली ही कला आताआतापर्यंत प्रामुख्याने वारली महिलांनीच जोपासली. काही वर्षांपूर्वी वारली चित्रकलेचे काही नमुने मानववंशशास्त्रज्ञांनीही गोळा केले; परंतु या कलेस खरी प्रसिद्धी दिल्लीच्या भारतीय हस्तव्यवसाय व हातमाग निर्यात निगमने दिली. त्यांनी डहाणू तालुक्यातील गंजाड खेड्यातील चार स्त्री-कलाकारांना १९७४ साली विशेष निमंत्रण देऊन दिल्लीला बोलाविले. कधीही प्रवास न केलेल्या या स्त्रियांबरोबर त्याच गावातला जिव्या सोमा म्हशे हा हौशी वारली तरुण कलाकारही गेला. त्याच्या मदतीने या स्त्री-कलावंतांनी काही कलाकृती काढल्या. चित्रकामासाठी कागद वापरावा म्हणजे ती चित्रे अधिक आकर्षक व नाजूक दिसतील आणि त्यांची विक्रीही होईल असे निगमने सुचविले; पण रूढीप्रिय महिलांनी त्याला नकार दिला. जिव्या सोमा म्हशे यांनी मात्र ही कल्पना उचलली आणि आतापर्यंत स्त्रियांची मक्तेदारी असलेल्या वारली समाजाच्या चित्रकलेत आमूलाग्र बदल घडविला.

‘पद्मश्री’ पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेल्या जिव्या सोमा म्हशे यांच्या चित्रांतला हुकमी आगळेपणा, स्वतंत्रपणा पाहिला की, त्यांच्या कलेच्या उंचीचा वेध आपले मन घेऊ लागते. त्यांच्या रेखाटनांमध्ये असलेला प्रवाहीपणा, मुक्तपणा आणि जोरकसपणा क्षणाक्षणाला जाणवतो. जिव्या सोमा म्हशे यांच्या चित्रांची खासियत म्हणजे वनवासी समाजाचे पारंपरिक जगणे रेखाटत असतानाच त्यांनी त्यात नाविन्याची भरही घातली. उदाहरणार्थ वनवासी समाजाच्या लग्नात काढतात तसा चौक आणि त्यांची देवता, वाघाचे चित्र काढल्यानंतर सर्वात वर रेल्वेच्या डब्यांचे चित्रही त्यांनी रेखाटल्याचे दिसते. वनवासी समाजातील लोकांच्या जगण्यात ही रेल्वे आली कुठून? तर जिव्या सोमा म्हशे यांनी ज्यावेळी पहिल्यांदा दिल्लीपर्यंतचा रेल्वे प्रवास केला, त्यावेळचा आपला अनुभव त्यांनी आपल्या चित्रात रेखाटण्याचा प्रयत्न केला. पारंपरिकतेला नाविन्याची जोड देणारी चित्रकला हीच जिव्या सोमा म्हशे यांची ओळख आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारावर चितारलेली अनेक वारली चित्रशैलीतील चित्रे आपल्याला दिसतात. आज विद्यापीठात जगभरातील हजारो विद्यार्थी, शिक्षक येत असतात, तेव्हा त्यांच्या दृष्टीस प्रथमतः ही चित्रकारी पडते. ही चित्रे जरी जिव्या सोमा म्हशे यांनी चितारलेली नसली तरी त्यांनी वारली चित्रकलेला देश-परदेशात जो लौकिक मिळवून दिला, ते पाहता मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलाचे मुख्य प्रवेशद्वार वारली चित्रकारीने सजले जावे, हे जिव्या सोमा म्हशे यांच्या कलेचे आणि यशाचेच परिमाण समजायला हवे. आज जिव्या सोमा म्हशे आपल्यात नसले तरी त्यांनी जो दिमाख वारली चित्रकारीला मिळवून दिला तो वारसा या माध्यमातून समर्थपणे चालल्याचे दिसते. आता शासनाने जिव्या सोमा म्हशे यांच्या नावाने वारली चित्रकला शिकवणारी संस्था उभारली पाहिजे. जिथे वनवासी समाजातीलच कलाकार आपली कला शिकवतील. म्हणजे या संस्थेतून जिव्या सोमा म्हशे यांच्यासारखी अनेक रत्ने घडतील आणि वारली चित्रकलेचा वारसा आणखी पुढे पुढे वाढत जाईल.


@@AUTHORINFO_V1@@