भरतदादा : एक समर्पित अन् आत्मीय पसाय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-May-2018
Total Views |
 

 
केशवस्मृती सेवासंस्था समुहाचे प्रमुख भरतदादा अमळकर यांची आज षष्ट्यब्दीपूर्ती होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वातील गुणवैशिष्ट्यांवर हा दृष्टिक्षेप...
 
 
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात षष्ट्यब्दीपूर्ती हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. सांसारिक जबाबदार्‍या पूर्ण होत आलेल्या असतात, व्यवसायात स्थैर्य प्राप्त होऊन एक नावलौकिक प्राप्त झालेला असतो, आर्थिक संपन्नता मिळविलेली असते, नातवंडांना खेळवण्याचे दिवस आलेले असतात. या सगळ्याचा परिपाक म्हणजे वैयक्तिक आयुष्यात अपेक्षित समाधानाचा स्तर गाठलेला असतो. सर्वसामान्य व्यक्तीसाठी ही स्थिती म्हणजे आयुष्याची कृतार्थता ! अशावेळी जबाबदारीमुक्त नीरवानीरवीच्या दुसर्‍या इनिंगचे चित्र रंगविले जाते. या सर्व दृष्टीकोनातून भरतदादाला कृतार्थता प्राप्त झालेली असणारच. परंतू त्याच्या सारख्या व्यक्तींकरीता ’साठी’ म्हणजे आयुष्याची इतिकर्तव्यता नव्हे तर सेकंड इनिंगमध्ये अधिक जोमाने व खर्‍या अर्थाने सच्चिदानंदाची अनुभूती देणार्‍या वेगळ्या नवीन प्रवासाची निश्चिती होय. भरत अमळकर देखील याच मानसिकतेत आज असतील याची मला खात्री वाटते.
 
 
माझा व भरतचा संबंध तीस वर्षांचा. विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून माझा उमेदवारीचा काळ आणीबाणी पूर्वीचा तर भरतचा आणीबाणी दरम्यानचा. अनेक बंधंनांमुळे व मर्यादांमुळे आमच्यासारखे त्यावेळी सत्याग्रहात सहभागी होवू शकले नाहीत. परंतु भरतने मात्र विद्यार्थीदशेत आणीबाणीविरोधातील सत्याग्रहात पुढाकार घेतला. भरतला घरातूनच संघ विचाराचे व सामाजिक कार्याचे बाळकडू आई-वडिलांकडून मिळाले. विद्यार्थी परिषद व संघविचाराने प्रेरित होऊन अनेक सामाजिक कामात त्याने सक्रिय सहभाग दिला आहे अन् आजही देत आहे.
 
 
गेल्या तीस वर्षात एकत्र काम करीत असतांना विविध प्रसंगातून मी भरतला ओळखतोय. मला जाणवलेले त्याच्याजवळचे काही महत्त्वाचे गुण म्हणजे नेतृत्व, वक्तृत्व, दूरदृष्टी, समर्पित भाव, संघभावना व स्पष्टवक्तेपणा. या गुणसंपदेचा मूळस्त्रोत भरतच्या करारी आईमध्ये सापडतो. एका अर्थाने भरतच्या व्यक्तिमत्त्व विकासात त्याच्या आईचा मोठा वाटा आहे. ज्या घरातील स्त्री कर्तृत्त्ववान व करारी असते, त्या घरातील पुढील पिढीची जडणघडण भक्कम अन् चांगलीच होते. कुटुंबातील सख्ख्या-चुलत अशा सर्व नातेवाईकांना आत्मिय प्रेमाने बांधून ठेवण्याचे कसब जर अशा माऊलीकडे असेल तर दुधात साखरच ! भरतच्या घरातही असे बांधलेले कुटुंब व त्यांची एकी वारंवार अनुभवता येते. अर्थात, यात नंतरच्या पिढीतील भरतचे ’कॉन्ट्रीब्युशन’ वाखाणण्यासारखे आहे.
 
 
कै. डॉ. अविनाश आचार्य यांच्यासारख्या प्रेरणादायी मार्गदर्शकाच्या सान्निध्यात आल्यानंतर भरतनी जळगाव जनता सहकारी बँक, विवेकानंद प्रतिष्ठान व तद्नंतर केशवस्मृती प्रतिष्ठान अशी वाटचाल करत महत्त्वाचे योगदान दिले आहे. डॉ. आचार्यांचा मानसपुत्र म्हणून त्याची ओळख आहे. विवेकानंद प्रतिष्ठान नावाची शैक्षणिक चळवळ उभी करत असतांना भरतने घेतलेल्या अपरिमित कष्टांची अन् वेळप्रसंगी दाखवलेल्या स्पष्टवक्तेपणाची यानिमित्ताने नोंद घेतली पाहिजे. केशवस्मृती प्रतिष्ठानच्या विविध प्रकल्पांच्या जडण-घडणीत त्याचे मोठे योगदान
आहे.
सामाजिक कार्यात अनेक प्रकारच्या अडचणी असतात. सुरुवातीच्या काळात आर्थिक अडचणींचा डोंगर असतो. काळाच्या ओघात प्रकल्प जेव्हा स्थिर होत जातो आणि नावलौकिक प्राप्त करतो तेव्हा व्यक्तीस्वभावांच्या प्रश्नांना सुरुवात होते. अशावेळी संस्थेच्या भल्यासाठी प्रमुख व्यक्तींनी प्रसंगी कटु वाटणारी पण कणखर भूमिका घ्यायची असते. अशी भूमिका यशस्वीरित्या पार पाडतांना भरतला मी अनेकवेळा पाहिले आहे.
 
 
डॉ. आचार्य यांनी त्यांच्या हयातीतच पुढील पिढीतील आपल्या सवंगड्यांना सर्व प्रकल्पांची जबाबदारी सोपविली होती व त्यामुळेच ’सामूहिक निर्णय’ तत्त्वाचा स्वीकार करुन प्रमुख कार्यकर्ते सर्व प्रकल्प अत्यंत समर्थपणे चालवित आहेत. सामाजिक व शैक्षणिक संस्थांमधून दीर्घकालीन सातत्यासाठी शाश्वत व्यवस्था निर्माण करण्याची कर्तव्यदक्षता प्रचलित नेतृत्वाने दाखविणे अपेक्षित असते. मात्र समाजातील वास्तव वेगळेच दिसते. काही व्यक्तींना अशा संस्थांतील मालकीहक्क व नेतृत्व तहहयात हवे असते. यामुळे संस्था कुंठीत होते. शाश्वत अस्तित्व धोक्यात येते. केशवस्मृती प्रतिष्ठानमध्ये मात्र डॉ. आचार्यांनी जी व्यवस्था निर्माण केली ती आदर्शवत आहे. त्यांच्यानंतर त्याच पद्धतीने भरतदादा केशवस्मृती प्रतिष्ठानचे नेतृत्त्व समर्थपणे करीत आहे. गेल्या काही वर्षात प्रतिष्ठानच्या सर्व प्रकल्पात आर्थिक स्वावलंबन, सक्रिय कार्यकर्त्यांची संख्या, सामूहिक निर्णय पद्धती, शास्त्रीय व्यवस्थापन अशा काही महत्त्वाच्या गोष्टी भरतच्या पुढाकाराने शक्य झाल्या आहेत. त्यामुळेच निव्वळ खान्देशातच नव्हे तर महाराष्ट्रात केशवस्मृती परिवार वेगळ्या नावलौकिकास प्राप्त झाला
आहे.
 
 
भरतच्या या सर्व वाटचालीत सौ. हेमा अमळकर यांचे महत्त्वाचे योगदान आहे. हेमाताईस देखील सामाजिक कामाची आवड असून मूळ प्रेरणा समान असल्यामुळेच या दांपत्याची कौटुंबिक, व्यावहारिक व सामाजिक वाटचाल परस्परपूरक राहीली आहे. हेमाताई भरत एवढीच तोलामोलाची यशस्वी कार्यकर्ती आहे याबद्दल आम्हास अभिमान वाटतो.
 
 
साठीनंतरची सेकंड इनिंग म्हणजे प्रगल्भ झालेली मनोधारणा होय, जे जे संचित जमा झाले आहे ते इथेच अर्पण करण्याची आंतरिक इच्छा होय व त्याचबरोबरीने हाती असलेल्या काळाची मर्यादा जाणवू लागल्यामुळे प्रत्येक गोष्ट अधिक वेगाने करण्याची प्रबळ जाणीव होय. अर्थात, मन धावत असले तरी निसर्गाच्या नियमानुसार शारीरिक बंधने येतातच. अशावेळी मन व शरीराची सांगड घालण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. तसे न केल्यास आंतरिक कुचंबणा अन् त्यातून चिडचिड होते. ती स्वास्थ्यासाठी टाळली पाहिजे हा या निमित्ताने भरतला एक न विचारता दिलेला सल्ला होय. संघविचाराने समाज परिवर्तन करुन सशक्त समाज निर्माण करण्यासाठी पसायदान मागणार्‍या आणि जवळच्या सर्व सहकार्‍यांसाठी आत्मियतेचे पसाय देणार्‍या भरतला कृतार्थ सेकंड इनिंगसाठी उत्तम आरोग्य व प्रदीर्घ आयुष्य लाभावे हीच सदिच्छा.
 
जीवेत शरदः शतम्
अनिल राव
- अध्यक्ष, जळगाव जनता सहकारी बँक
मो. ९४२३९७३१९९
@@AUTHORINFO_V1@@