याचे मोल कसे करावे ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


 
 
‘पैसे देऊन सेवा मिळवणे ‘ हा या युगाचा नवा मंत्र आहे. घरातले सर्वजण, आपापल्या, शाळा – महाविद्यालय, नोकरी – धंदा, अन्य actvities, यामध्ये busy. घरातील ज्येष्ठ महिला इतक्या सर्वांची नाश्ता – जेवण व्यवस्था लावण्यास, प्रकृतीच्या छोट्या मोठ्या तक्रारींमुळे असमर्थ! त्यामुळे, स्वयंपाकाच्या मावशी, केरवारे, भांडी घासणे, कपडे धुणे या कामासाठी एखादी बाई, dusting साठी कोणीतरी अशा अनेक व्यवस्था घरात आवश्यक ठरतात. त्या त्या कामासाठी ठरलेला पगार देऊन आपण या सेवा मिळवतो.

या व्यतिरिक्तही काही सेवा असतात. उदा. घरच्या चारचाकीचे driver काका, घरपोच जिन्नस देणारा दुकानदार, इस्त्रीचे आणि ड्राय क्लिनिंगचे कपडे ने – आण करणारा लॉंड्रीवाला इत्यादी. वर वर पाहता शुद्ध देवाण घेवाण असते या सर्व व्यवहारांमध्ये. त्यांच्याकडून सेवा मिळते आणि त्या बदल्यात आपण त्यांना मोबदला देतो.

एखादे दिवशी घरातले लहान मूल आजारी असते आणि ती single mother थांबू शकत नसते घरात. थोड्या वेळासाठी का होईना office ला जाणे भाग असते तिला. अशा वेळी स्वयंपाकाच्या मावशी धावून येतात मदतीला. ‘ जा तुम्ही office ला बाई. मी थांबेन तुम्ही येईतो छोट्यापाशी ‘ हे तिचे शब्द शांतता देतात थोडी जीवाला. काम आवरून घाईघाईने परत आल्यावर समजते की, तिने छोट्याला मऊ भात शिजवून खाऊ घातलाय आणि झोपवलं पण आहे. या तिच्या कामाचे मोल एका आईच्या डोळ्यात तरळणारे कृतज्ञतेचे अश्रूच असू शकतात.

काही काही घरांमध्ये तर ड्राइव्हर काका म्हणजे पु. लं. च्या ‘ नारायणाचे ‘ या युगातील पुनर्जन्मच असतात. घरातल्या आज्जींना हात घरून कार मधून उतरवणे आणि लिफ्टपर्यंत पोचवणे, वहिनींच्या मैत्रिणींकडून पाक कलेच्या विविध नमुन्यांची ने – आण करणे, नुकत्याच कॉलेज कुमारी झालेल्या साहेबांच्या कन्यकेच्या, पेट्रोल न भरल्याने सुरु न होणाऱ्या, दोन चाकीमध्ये पेट्रोल आणून भरणे, घरातल्या छोटूच्या football मध्ये हवा भरून देणे, साहेबांचे महत्त्वाचे कागद सांभाळून आणणे आणि नेणे, कधी कधी रोख रक्कम आणि धनादेश सुद्धा नेणे - आणणे, यादी कितीही मोठी होऊ शकते. प्रत्येक घराची ही यादी वेगवेगळी असेल आणि हे सर्व मुख्य driving चे काम कुठेही compromise न करता होते हे विशेष नाही कां? नेहमीच्या पगाराव्यतिरिक्त ह्या कामांसाठी वेगवेगळे मोल द्यायचे शक्य आहे कां? आर्थिकदृष्ट्या शक्य असेलही कदाचित पण असे मोल ठरवताच नाही येणार! ठरवण्याचा प्रयत्नसुद्धा करू नये. ज्या विशुद्ध भावनेने हे घडते त्याचा अपमान तरी करू नये! कारण असे ‘ नारायण ‘ घरचेच एक होऊन गेलेले असतात.

नात्याची माणसे महत्त्वाची असतातच पण जवळ असतीलच असं नाही! अंतराच्या दृष्टीनेही आणि मनाच्या दृष्टीनेही. पण पगारी कामाच्या पलीकडे पोचलेली ही माणसे जवळ पण असतात त्यामुळे जास्त ओळखीची पण असतात. विसंबून राहता येईल अशी असतात. त्यांचे मोल करण्यापेक्षा, त्यांचे मोल जाणणे एवढेच आपण करू शकतो.


ही नेहमीच्या portfolio पेक्षा केलेली, वेगळी कामे पूर्ण निरपेक्ष असतात अशा भाबड्या समजुतीत कोणीच असणार नाही. पण या प्रत्येक कामाचे मोल मिळेलच अशा विचाराने ही घडतात असे म्हणणे अन्यायाचे ठरेल. गरज असते म्हणून पगारी कामे केली जातात आणि गरज असते म्हणूनच पगारी माणसे ठेवली जातात हे सत्यच आहे. दोन्हीकडे सारख्याच तीव्रतेची गरज असते. ‘ एव्हढे तर केलेच पाहिजे, पैसे मोजतोय त्याला\तिला महिन्याला पगाराचे ‘ असे निदान त्यांनी तरी म्हणू नये ज्यांना जेंव्हा आपल्या टेबल किंवा counter बरोबर कधीतरी दुसऱ्याचे टेबल किंवा counter सांभाळावे लागते तेंव्हा किती त्रासाचे आणि अन्यायाचे वाटते!

ह्या सेवा कधीही prepaid नसतात. postpaid असतात. केलेल्या जादा कामांबद्दल मोबदला मिळेलच याची शाश्वती असते कां? महिना संपला की कळणार असते ते!

रोजच्या दैनंदिन गरजेच्या अनेक वस्तू आपण पैसे देऊन विकत घेतो. एखादी नेहमीची भाजीवाली, आपल्याला उशीर झाला तिच्याकडे जायला तर पालेभाजीची चांगली ताजी जुडी आपल्यासाठी बाजूला काढून ठेवते, नेहमीचा फळवाला, आज ताजा माल नाहीये, घेऊ नका – उद्या देतो तुम्हाला म्हणून आवर्जून सांगतो, कचरा नेणारा, वेगळा दिसणारा कागद, काही महत्त्वाचा असेल म्हणून परत द्यायला येतो, अशा वेगवेगळ्या घटना आपल्या आयुष्यात घडतात ज्यांची सांगड त्या त्या व्यक्तींना मिळणाऱ्या पैशांशी घालता येत नाही.

ह्या अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत पण एखादी हवाई सुंदरी (air hostess) जेव्हा अपवादात्मक संकटाच्या प्रसंगात आपल्या प्राणांच्या मोबदल्यात अनेक प्रवाशांचे प्राण वाचवते तेव्हा तिने, तिला मिळणाऱ्या पगाराच्या मोबदल्यात, आपले कर्तव्य केले असे आपण मनातही आणू शकत नाही. मरणोपरांत तिला मिळणारा एखादा पुरस्कार बाकीच्यांना प्रेरणा मिळावी म्हणून असतो आणि तिचा त्याग, धाडस आणि कर्तव्यनिष्ठा या गुणांना केलेले अभिवादन असते. तिने केलेल्या कार्याचे ते मोल नसते. कारण असे मोल करणे अशक्यच असते.

आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या अशा अनेक माणसांची उदाहरणे आपल्याला आठवतील. मोली कामावरच्या लोकांनी केलेली ‘ अनमोल ‘ कामे. याची परतफेड, तीही माणसेच आहेत ही एकच जाणीव मनात सतत ठेवून, कदाचित करता येऊ शकेल. माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं हे एक सूत्र कायम लक्षात ठेवलं तरच अशा कामांचे ‘ मोल ‘ करता आले नाही तरी, ते जाणले जाऊ शकते. ‘माये’ साठीच आपण सर्व काम करतो. पण देवाणघेवाण करता करता तयार होते खरे खुरे मायेचे नाते, ज्याचे मोल करणारा तराजू अस्तित्वातच नाही! रक्ताच्या नात्यांपेक्षा सुद्धा ही नाती हल्ली जवळची झाली आहेत. एकमेकांच्या अडचणीत वेळेवर मदतीला धावून जाणारी ‘ अनमोल ‘ नाती!
 
- शुभांगी पुरोहित 
@@AUTHORINFO_V1@@