अन् युद्ध सुरु झाले...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-May-2018
Total Views |

कौरवांनीच युद्धाला सुरुवात केली. कौरवांचे सेनापती भीष्म आघाडीवर होते. दु:शासन पांडवांच्या सैन्याकडे निघाला. धृष्टद्युम्न आणि पांडव यांनी त्यांच्या हल्ल्यास विरोध केला, अतिशय भयानक दृश्य होते ते! सगळीकडून कानठळ्या बसतील असे आवाज येत होते. मोकाट सुटलेला सिंह जसा डरकाळ्या फोडतो, तशा आवाजात भीमगर्जना करत होता.
 
दुर्योधनाचे भाऊ भीमाचा हल्ला रोखण्याचा प्रयत्न करत होते. बारा जण भीमावर अक्षरश: तुटून पडले! हे बघून भीमाची मदत करायला द्रौपदीचे पुत्र, अभिमन्यू, नकुल, सहदेव आणि धृष्टद्युम्न पुढे आले. तुंबळ युद्ध सुरु झाले. जणू दोन अरण्य वादळाच्या धुमश्चक्रीत सापडली होती! सूर्य मध्यावर आला, तरी युद्धाचा जोर ओसरला नव्हता!
 
भीष्म पण पांडवांच्या दिशेने पुढे गेले. त्यांची गाठ अर्जुनाशी झाली. अर्जुनाच्या गांडीव धनुष्याला तर विश्रांतीच नव्हती. तो बाणांमागून बाणांचा वर्षाव करत होता. इकडे सात्यकी आणि कृतवर्मा यांचीही जुंपली होती. कोसलराज बृहद्बल अभिमन्यूशी लढत होता. त्याने अभिमन्यूच्या ध्वजाचे तुकडे केले, म्हणून अभिमन्यू संतापला होता. दोघांत घमासान युद्ध सुरु झाले. भीम आणि दुर्योधन एकमेकांशी लढत होते. दु:शासन आणि नकुल भिडले होते. दुर्मुखाने सहदेवाला छेडले. शल्य युधिष्ठिरावर धावून गेले. धृष्टद्युम्न आणि द्रोण यांचे युद्ध सुरु होते. दुपारची वेळ झाली तसे युद्ध थांबले. त्यावेळी पांडवांचे खूप नुकसान झाल्याचे दिसत होते. अनेक वीर ठार झाले होते. भीष्म तर तुफानासारखे कत्तल करत पुढे सुटले होते. त्यांचे रक्षण करायला पाच वीर दुर्योधनाने पाठवले, दुर्मुख, कृतवर्मा, कृप, विविंशति आणि शल्य! भीष्मांच्या हालचाली इतक्या चपळ होत्या की ते दिसतच नव्हते. जणू काही वीजच तळपत होती! आवेशाने अभिमन्यू त्यांच्यासमोर आला. त्याने आपल्या अनेक तीक्ष्ण बाणांनी शल्य, कृतवर्मा आणि भीष्म यांना जखमा केल्या. त्या तरुणाचा पराक्रम पाहून, सर्व शत्रू चकित झाले. त्याने भीष्मांच्या ध्वजाचे तुकडे केले. तो क्रुद्ध झालेल्या देवासारखा भासत होता. पांडवांकडील अनेक वीर त्याच्या मदतीला आले. विराट व त्याचे पुत्र, धृष्टद्युम्न, भीम, कैकेय बंधू, आणि सात्यकी!
 
विराटपुत्र उत्तरकुमार एका कुशल योद्ध्याप्रमाणे मोठ्या हत्तीवर स्वार होऊन शल्याशी लढत होता. एके काळी कौरवांच्या सैन्याला भिऊन, पळून गेलेला हा उत्तर आता मात्र खूप धीट झाला होता. त्याने शल्याचे घोडे मारून टाकले. शल्य पण खूप संतापला होता. त्याने उत्तर याला भाला फेकून मारला. तो तीक्ष्ण भाला उत्तरकुमाराचे चिलखत भेदून, त्याच्या छातीत घुसला आणि उत्तरकुमार हत्तीच्या मानेवर मरून पडला!
 
हे पाहून त्याचा मोठा भाऊ श्वेत शल्यावर त्वेषाने तुटून पडला. शल्यावर बाणाचा वर्षाव करून त्याने बाणांची अभेद्य भिंतच उभी केली! शल्य मृत्यूच्या जबड्यात सापडलेला पाहून, भीष्म मदतीला आले. भीष्मांनाही तो आवरेना! श्वेताने त्यांचा ध्वज तोडला, घोडे मारून टाकले, भीष्म रथहीन झाले. अखेर भीष्मांनी एक तीक्ष्ण भाला त्याला फेकून मारला जो त्याचे चिलखत भेदून त्याच्या हृदयात घुसला आणि श्वेत पण मरून पडला! आता सूर्य मावळत आला होता. दोन्ही सेनापतींनी आपापली सैन्ये मागे घेतली. कौरवांना मोठे यश प्राप्त झाले होते, तर पांडवांसाठी हा मोठ्या अपयशाचा दिवस होता. उत्तरकुमार आणि श्वेत हे मोठे योद्धे मारले गेले. भीष्मांनी सैन्याचा फार मोठ्ठा संहार केला होता.
 
दुर्योधन तर आनंदाने वेडाच झाला होता! हे युद्ध पितामह भीष्म आपल्याला लवकरच जिंकून देतील अशी त्याला आशा वाटू लागली. युधिष्ठिर मात्र खूप निराश आणि दु:खी झाला होता. झालेली इतकी मोठी कत्तल पाहून, त्याला कसेतरीच वाटत होते. तो कृष्णाकडे येऊन म्हणाला, “आपले सैन्य कसे नष्ट होत आहे ते पाहा, भीष्म खूप भीतीदायक आहेत. ते एखाद्या वणव्यासारखे आपले सैनिक जाळून टाकत आहेत! मी एका दुबळ्या क्षणी या युद्धाला ‘हो’ म्हणालो हा माझा मूर्खपणाच झाला! मी पुन्हा वनवासात जायला तयार आहे. राज्याच्या हव्यासापायी इतकी मनुष्यहानी होऊ देण्याचा अधिकार मला नाही! एक भीमच काय तो त्वेषाने लढत आहे, पण भीष्म आणि द्रोण यांच्यापुढे त्याचा किती निभाव लागणार? त्यांच्याकडे दिव्य अस्त्रे आहेत. ती जर त्यांनी वापरली तर भीम तरी काय करणार? मी खूप निराश झालोय!”
 
कृष्णाने युधिष्ठिराचे सांत्वन केले. तो म्हणाला, “अरे असे निराश होऊन कसे चालेल? मी इथे आहे, सात्यकी, धृष्टद्युम्न आणि इतर वीर आहेत. तू काळजी करू नकोस. महान भीष्मांना शिखंडी नक्की मारणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे!”
 
 
 
 
 
- सुरेश कुळकर्णी 
 
@@AUTHORINFO_V1@@