वेगाची जीवघेणी धुंद...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
हल्ली प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यातील घडामोडी जाणून घेण्यात जास्तच रस असल्याने सोशल मीडियाचा वापर अतिप्रमाणात वाढला आहे. त्यात ‘सोशल सर्कल’मधील आपले स्थान काहीतरी वेगळे असल्याची मानसिकता दिवसेंदिवस अधिक वृद्धिंगत होत आहे. त्यामुळे सातत्याने प्रत्येकजण काही ना काही वेगळे करून ‘सोशल सर्कल’मध्ये ‘हिट’ होण्याच्या प्रयत्नात असतो. नागपूरच्या तलावात आठ मित्रांनी केलेले फेसबुक लाईव्ह असेल किंवा केवळ मित्रांना दाखविण्यासाठी वेगाने गाडी चालवण्याची स्पर्धाही दिवसेंदिवस वाढत आहे. आपण केलेले वेडे धाडस आपल्याला प्रसिद्धी देईल, या वेडापायी अनेक जण जीवाशी खेळ करतात. त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. पिंपरीच्या रस्त्यावर घडलेला प्रकार हा याच वेडाचा भाग होता. कार चालवताना इन्स्टाग्रामवर ‘लाईव्ह’ करण्याच्या नादात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली. शिवम जाधव (२१) असे या तरुणाचे नाव आहे. कार चालवत असताना आपल्या कारचा वेग मित्रांना दाखवण्याची हौस शिवमच्या जीवावर बेतली. शिवम जाधव ताशी  १२० ते  १४० किमी वेगाने कार चालवत होता. अपघात इतका भयंकर होता की, शिवमचा जागीच मृत्यू झाला. यावेळी त्याच्यासोबत असणारा आतेभाऊ हृषिकेश पवार जखमी झाला आहे. रविवारी पहाटे पाच वाजता हा अपघात झाला.
 
 
शिवम आपला आतेभाऊ हृषिकेशसोबत कारने प्रवास करत होता. दोघेही पिंपरीला चालले होते. यावेळी शिवम वेगाने कार चालवत होता. आपण ताशी १२० ते १४०  किमी वेगाने कार चालवत असल्याचे त्याला आपल्या मित्रांना दाखवायचे होते. यासाठी त्याने हृषिकेशला आपला मोबाईल दिला आणि इन्स्टाग्राम ‘लाईव्ह’ करण्यास सांगितले. ‘लाईव्ह’ सुरू झाले तेव्हा शिवम त्याच वेगाने कार चालवत होता. कार पिंपरी ग्रेडसेपरेजटजवळ आली असता, नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाच्या पिलरला धडकल्याने अपघात झाला. अपघात इतका भयानक होता की, शिवम जाधवचा जागीच मृत्यू झाला. हृषिकेश पवार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
 
त्यामुळे तरुणांनी केवळ वेगाच्या शुल्लक धुंदीपोटी आपले आयुष्य धोक्यात घालायचे का, याचा गांभीर्याने विचार करायला हवा. 
 
निर्णयाचे स्वागतच...
 
इलेक्ट्रिक आणि हायब्रिड गाड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने ९  हजार ४०० कोटी रुपयांची मदत करण्याचा प्रस्ताव आखला आहे. यामध्ये जे कोणी पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्या मोडीत काढून इलेक्ट्रिक गाड्या वापरण्याची तयारी दर्शवतील, त्यांना अडीच लाख रुपयांपर्यंत सरकारकडून सवलत मिळू शकते. तसेच इलेक्ट्रिक किंवा हायब्रिड वाहनांचे पार्टस् बनविणार्‍या उत्पादकांनाही सवलती देण्याचा प्रस्ताव आहे. या नवनिर्णयाचे सर्वात आधी स्वागतच. दिवसेंदिवस वाढत जाणारे प्रदूषण आणि इंधनाचे वाढलेले दर यामुळे भविष्यात या गाड्यांची गरज भासणार आहेच. त्यासाठी आत्तापासूनच देण्यात आलेले प्रोत्साहन हे स्वागतार्ह आहे. हायब्रिड आणि इलेक्ट्रिक गाड्या वापरणार्‍यांची संख्या आज फार नसली तरी भविष्याचा विचार केल्यास इंधन बचत आणि प्रदूषण यांना रोखण्यासाठी हायब्रिड कार हाच उत्तम पर्याय ठरणार आहे.
 
 
दीड लाखापर्यंतच्या इलेक्ट्रिक मोटारसायकल खरेदी करणार्‍यांनाही ३० हजार रुपयांची सूट मिळेल. सरकारने तयार केलेल्या मसुद्यामध्ये हा प्रस्ताव आहे. इलेक्ट्रिक वाहनांकडे वळणार्‍या टॅक्सी किंवा बस चालक-मालकांच्या समूहाला आणखी सवलत मिळेल. इलेक्ट्रिक कार खरेदी करून टॅक्सीसारखा वापर करणार्‍यांना दीड ते अडीच लाखापर्यंत सवलत मिळू शकते. १५ लाखांपर्यंत किंमत असलेल्या वाहनांना ही सवलत देण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये जे कोणी पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्या सोडून इलेक्ट्रिक गाड्या वापरण्याची तयारी दर्शवतील, त्यांनाही दीड ते अडीच लाख रुपयांपर्यंत सरकारकडून सवलत मिळू शकते. यासाठी त्यांच्याकडे मान्यताप्राप्त स्क्रॅपिंग सेंटरचं प्रमाणपत्र असणे आवश्यक असेल.
 
 
पुढील पाच वर्षांमध्ये प्रवासी वाहने आणि मोटारसायकलवर सवलत देण्यात सरकारचे दीड हजार कोटींहून जास्त पैसे खर्च होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे एकूण बजेटमधून १ हजार कोटी रुपये देशभरात इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्यात खर्च करण्याचा सरकारचा विचार आहे. देशभरात महामार्गांवर प्रत्येकी २५  किलोमीटरवर चार्जिंग पॉईंटस् उभारण्याचा प्रस्ताव असून यामध्ये मुंबई-पुणे महामार्गाचा समावेश आहे.  
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@